शिंदे गटातील २२ आमदार नाराज आहेत आणि त्यातील बहुतांश आमदार भाजपत विलीन होण्याची शक्यता असल्याचा उल्लेख करत सामनातल्या रोखठोक सदरात भाजप नेत्याच्या हवाल्यानं मोठं विधान करण्यात आलंय. शिंदे यांचा रामदास आठवले होईल, असाही उल्लेख या सदरात करण्यात आलाय.
ADVERTISEMENT
रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या सामनातल्या रोखठोक सदरातून शिंदे गट आणि एकनाथ शिंदेंवर टीका करण्यात आलीये. रोखठोकमध्ये म्हटलंय की, “मुख्यमंत्रीपदी शिंदे ही भाजपने केलेली तात्पुरती व्यवस्था आहे. त्यांची मुख्यमंत्रीपदाची वर्दी कधीही उतरवली जाईल, हे आता सगळ्यांना समजून चुकले आहे. शिंदे यांच्या ‘तोतया’ गटास अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत उतरवायला हवे होते. पण भाजपनेच ते टाळले.”
शिंदे गटातील २२ आमदार नाराज?
रोखठोकमध्ये पुढे म्हटलंय की, “महाराष्ट्राच्या ग्रामपंचायत, सरपंच निवडणुकीत यश मिळाल्याचा शिंदे गटाचा दावा खोटा आहे. शिंदे गटाचे किमान 22 आमदार नाराज आहेत. यातील बहुसंख्य आमदार स्वतःला भाजपात विलीन करून घेतील असे स्पष्ट दिसते. त्यानंतर शिंदे यांचे काय होणार, असे मी त्यांच्याच एका नेत्यास विचारले तेव्हा तो म्हणाला, ‘शिंदे यांचा रामदास आठवले होईल.’ हे विधान बोलके आहे.”
संजीव भोर पाटलांचा शिंदे गटात प्रवेश : राष्ट्रवादी लक्ष्य की विखे पाटलांना आव्हान?
“एकनाथ शिंदे यांनी स्वतःबरोबर महाराष्ट्राचे मोठे नुकसान केले. त्यामुळे महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही. शिंदे यांना तोफेच्या तोंडी देऊन भाजप स्वतःचे राजकारण करत राहील. भाजपचे नेते सरळ सांगतात, ‘शिंदे यांनाही उद्या भाजपातच विलीन व्हावे लागेल व त्या वेळी ते नारायण राणे यांच्या भूमिकेत असतील.’ असे घडले तर शिंदे यांनी काय मिळवले?”, असा सवाल ‘रोखठोक’मधून करण्यात आलाय.
रोखठोकमध्ये भाजप नेत्यासोबतचा संवाद, एकनाथ शिंदेंबद्दल काय?
रोखठोकमध्ये भाजप नेत्यासोबतचा संवादही छापण्यात आलाय. यात म्हटलंय की, “भाजपचे एक ज्येष्ठ नेते ‘सह्याद्री’वर भेटले. ते हसत हसत म्हणाले, ‘सरकार शिंदे गटाचे चाळीस आमदार चालवीत आहेत व मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयावर त्यांचाच ताबा आहे. आमदारांच्या हट्टापुढे आपले मुख्यमंत्री हतबल आहेत. इतर आमदारांची कामे होत नाहीत.’
“मग तुम्ही भाजपचे लोक हे सहन का करता?”
‘सहन करण्याचा प्रश्नच नाही. शिंदे सरकारची स्थिती ओल्या बाळंतिणीसारखी आहे. थोडा वेळ देऊ त्यांना.’
“पुढे काय?”
‘पुढचं पुढे.’
“मुख्यमंत्री शिंदे यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. भारतीय जनता पक्षाने शिंदे व त्यांच्या काही लोकांना ‘ईडी’ वगैरेच्या फासातून तूर्त वाचवले, पण या सगळ्यांना कायमचे गुलाम करून ठेवले. सरकारचे सर्व निर्णय उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस घेतात व मुख्यमंत्री शिंदे ते निर्णय जाहीर करतात. आता दिल्लीसही फडणवीस एकनाथ शिंदेशिवाय जातात”, असं म्हणत शिंदे गट आणि एकनाथ शिंदेंवर टीका करण्यात आलीये.
ADVERTISEMENT