राज्यातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. दोन्ही गटाचे वकील रोजदार युक्तीवाद करत आहेत. शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा याबाबत आज निर्णय येण्याची शक्यता आहे. या सुनावणीपूर्वीच शिंदे गटाचे आमदार आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदे यांची शिंदे गटाचे पक्षप्रमुख म्हणून निवड करण्यात आल्याचं अब्दुल सत्तार म्हणाले आहेत. महत्त्वाचं म्हणजे ४० आमदार आणि १६ खासदारांनी या निवडीला समर्थन दिलं आहे, तसा ठरावही पास करण्यात आल्याचं सत्तार म्हणाले आहेत.
ADVERTISEMENT
अब्दुल सत्तार नेमकं काय म्हणाले?
एकनाथ शिंदे यांनी जेव्हापासून बंड केले आहे तेव्हापासून एकनाथ शिंदे गटाचे पक्षप्रमुख कोण असणार याबाबत चर्चा होती. मात्र ज्या पदाला आतापर्यंत शिंदे गटाने हात लावला नव्हता, त्यावरही आता शिंदे गटाकडून खुलासा करण्यात आला. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अब्दुल सत्तार यांनी हे वक्तव्य केलं आहे.
”सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू असताना न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात शिंदे गटाचे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांची नावाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. राष्ट्रीय कार्यकारणीत हा निर्णय घेण्यात आला आहे. शिंदे गटाचे आमदार, खासदार, जिल्हाप्रमुख या सर्वांच्या सहमतीने हा निर्णय घेण्यात आला आहे” असं अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे काय म्हणाले?
”शिवसेना हा आमचा पक्ष आहे आणि ही सगळी फुटीरवादी लोक शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले आहेत आणि त्यामुळे हा पक्ष आमचाच आहे आणि चिन्हही आम्हालाच राहील. आई जगदंबेला मी प्रार्थना करतोय” असं शिवसेना नेते चंद्रकांत खैरे म्हणाले.
पुढे खैरे म्हणाले ”आज आम्हाला सुप्रीम कोर्टात न्याय मिळेल असा विश्वास आहे. तर यांच्याकडे खोक्याचा पैसा आहे त्यामुळे हे सगळ्या बस बुक करताय मात्र खरा शिवसैनिक घरची भाकरी खाऊन स्वतः दसरा मेळाव्याला येईल” असंही खैरे म्हणाले आहेत.
ADVERTISEMENT