पुणे : पुणे आणि परिसराला रविवारी संध्याकाळनंतर मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. त्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते. अचानक आलेल्या तुफान पावसामुळे काही भागांतील रस्त्यांचे कालवे झाले होते. आधीच सुरु असलेली पुणे मेट्रोची कामे आणि त्यात झालेल्या पावसामुळे शहराच्या वाहतुकीवर परिणाम झाला होता. शहरभरात वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या.
ADVERTISEMENT
शहरातील अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले. सोबतच छोटे-मोठे नालेही भरून वाहू लागले. अतिवृष्टी सदृश्य पावसामुळे बावधन परिसरामध्ये हाहाकार उडाला होता. राम नदी ही मागील काही वर्षात पहिल्यांदाच दुथडी भरून वाहिली. पावसामुळे या भागातील खोलगट भागांतील अनेक घरात पाणी शिरले. काही ठिकाणी तर पाच फूटापर्यंत पाणी साचले होते.
बावधन भागातील रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की, परिसरात बंद करून उभ्या असलेल्या चारचाकी कार सुद्धा ३० ते ४० फूट लांबपर्यंत वाहून गेल्या. बावधन गावामध्ये अनेक बांधकामे झाली आहेत, त्यामुळे जुने ओढून आले यांची दिशा बदलून टाकले आहे. यामुळे पावसाचे पाणी घरांमध्ये घुसल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, पुण्याच्या या अवस्थेला महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचे मत पुण्याचे माजी महापालिका आयुक्त महेश झगडे यांनी व्यक्त केले. तसेच त्यांनी उपाययोजनांचा दिलेला प्रस्तावही प्रशासनाने फेटाळून लावला, असाही आरोप झगडे यांनी केला. आपल्या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी याबाबत सविस्तर भाष्य केले.
ते म्हणाले, काल झालेल्या पुण्याच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर एका नागरिकाने २०११ चे वृत्त पाठविले. अशी दुर्दशा होण्याचे प्रमुख कारण म्हणजे योग्य शहर नियोजन नसणे, आहे त्याची अंमलबजावणी न करणे, गंभीर चुका करणे इ. आहेत. यासाठी १९८७ पासून पुणेकर दुर्दैवी चक्रात फसले आहेत. यास प्रामुख्याने मनपा प्रशासन जबाबदार. परिस्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना करण्याचा मी २०११ प्रस्ताव दिला होता. प्रशासनाच्या दबावामुळे स्टँडींगने फेटाळून जनतेविरुद्ध कृत्य केले. चालू द्या!
पुण्यातील कोणत्या भागांमध्ये पाणी साचले होते?
१) चंदननगर पोलिस स्टेशन
२) वेदभवन, कोथरुड
३) वनाज जवळ कचरा डेपो, कोथरुड
४) लमाण तांडा, पाषाण
५) सोमेश्वर वाडी, पाषाण
६) वानवडी, शितल पेट्रोल पंप
७) बी टी ईवडे रोड
८) काञज उद्यान
ADVERTISEMENT