मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकी देणारं पत्र आलं आहे. या पत्रात त्यांना जिवे मारण्याची धमकी आली असून त्यांना शिव्याही देण्यात आल्या आहेत तसंच त्यांच्याविषयी अश्लील भाषाही वापरण्यात आली आहे. रायगडहून हे पत्र पाठवण्यात आलं आहे. आता या प्रकरणी किशोरी पेडणेकर पोलीस ठाण्यात जाऊत तक्रार करणार आहेत.
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात जो सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला त्याचाही उल्लेख किशोरी पेडणेकर यांना देण्यात आलेल्या धमकीच्या पत्रात करण्यात आला आहे. अजित पवार यांनीच महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यास सांगितल्याचा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे. धमकीचं पत्र हे रायगडहून आलं आहे. किशोरी पेडणेकर यांच्या फोटोवर काट मारण्यात आली असून तो फोटोही या पत्रात चिकटवण्यात आला आहे.
महापौर किशोरी पेडणेकर यांच्या परिवाराला धमकीचं पत्र, जिवे मारण्याची धमकी
धमकीचं पत्र आल्यानंतर किशोरी पेडणेकर या पोलिसात तक्रार दाखल करणार आहेत. पत्रात अश्लील भाषेचा वापर करून किशोरी पेडणेकर यांना शिवीगाळही करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या पत्रात किशोरी पेडणेकर यांना जिवे मारण्याची तसंच बलात्कार करण्याचीही धमकी देण्यात आली आहे. या पत्रात अजित पवार यांचा उल्लेख करण्यात आला आहे. अजित पवार यांनीच महाविकास आघाडी सरकार पाडायला सांगितलं असा उल्लेख यात आहे.
गेल्यावर्षीही किशोरी पेडणेकर यांना धमकी देण्यात आली होती. ती धमकीही जिवे मारण्याचीच होती. मुंबईच्या महापौर म्हणून कार्यरत असताना त्यांना दोनवेळा धमकीचं पत्र आलं होतं आता असं पत्र येण्याची ही तिसरी वेळ आहे.
राज्यात एकनाथ शिंदे यांनी जे बंड पुकारलं आहे त्यानंतर महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी त्यांना उद्या विश्वासदर्शक ठराव मांडण्यास राज्यपालांनी सांगितलं आहे. अशात किशोरी पेडणेकर यांना धमकीचं पत्र आल्याने आणि त्यात अजित पवार यांनी हे सरकार पाडण्यास सांगितल्याचा उल्लेख असल्याने खळबळ माजली आहे. तसंच या प्रकरणामुळे अजित पवारांविषयीच्या चर्चाही राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोना झाला असून ते सध्या क्वारंटाईन आहेत.
याआधी गेल्या वर्षी जून महिन्यातच किशोरी पेडणेकर यांना धमकी देणारं पत्र आलं होतं. त्यातही अश्लील भाषेचा उपयोग करण्यात आला होता. भाजपचे नेते आशिष शेलार आणि किशोरी पेडणेकर यांच्यात त्यावेळी वाद रंगला होता. त्याचवेळी हे पत्र आलं होतं. माझ्याबद्दल या पत्रात असेल उल्लेख करण्यात आले आहेत जे मला वाचूनही दाखवता येणार नाही असं किशोरी पेडणेकर यांनी त्यावेळी सांगितलं होतं.
ADVERTISEMENT