IT Raid on Yashwant Jadhav : ‘या’ कारणामुळे यशवंत जाधव आले आयकर विभागाच्या रडारवर

दिव्येश सिंह

• 12:45 PM • 26 Feb 2022

नवाब मलिक यांच्याविरुद्ध ईडीने केलेल्या कारवाईनंतर मुंबई महापालिकेतील महत्वाचे शिवसेना नेते आयकर विभागाच्या रडारवर आले आहेत. स्थायी समितीचे अध्यक्ष आणि नगरसेवक यशवंत जाधव यांच्या घरावर शुक्रवारपासून आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. यशवंत जाधव आणि त्यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव हे याआधीच आयकर विभागाच्या रडारवर आले आहेत. यामिनी जाधव या भायखळा विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेनेच्या आमदार आहेत. […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

नवाब मलिक यांच्याविरुद्ध ईडीने केलेल्या कारवाईनंतर मुंबई महापालिकेतील महत्वाचे शिवसेना नेते आयकर विभागाच्या रडारवर आले आहेत. स्थायी समितीचे अध्यक्ष आणि नगरसेवक यशवंत जाधव यांच्या घरावर शुक्रवारपासून आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. यशवंत जाधव आणि त्यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव हे याआधीच आयकर विभागाच्या रडारवर आले आहेत. यामिनी जाधव या भायखळा विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेनेच्या आमदार आहेत.

हे वाचलं का?

स्थायी समिती अध्यक्ष या नात्याने यशवंत जाधव यांनी काही कंत्राटदारांना चुकीच्या पद्धतीने कंत्राट दिल्याच्या तक्रारी आयकर विभागाकडे आल्या होत्या. या तक्रारीच्या आधारावरच आयकर विभागाची ही कारवाई सुरु असल्याचं कळतंय.

यशवंत जाधव हे शिवसेना नेतृत्वाच्या जवळचे नेते मानले जातात. आयकर विभागाच्या मते मुंबई महापालिकेत कंत्राट देत असताना यशवंत जाधव यांनी कंत्राटदारांकडून मोठ्या प्रमाणात लाच स्विकारल्याचं कळतंय. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही ठराविक कंपन्या आणि कंत्राटदार यांना महापालिकेकडून विविध कामांसाठी कंत्राट मिळत गेली. स्थायी समितीचे अध्यक्ष या नात्याने यशवंत जाधव यांनी ही कंत्राट पास केली, यासाठी मोठ्या प्रमाणात पैशांची अफरातफर झाल्याचा आयकर विभागाला संशय आहे.

शुक्रवारी आयकर विभागाने यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांच्या मालमत्तांसोबतच काही कंत्राटदारांच्या ३३ ठिकाणी छापेमारी केली. मुंबई महापालिकेची निवडणुक लवकरच घोषित होणार असल्याची चिन्ह दिसत असल्यामुळे आयकर विभागाने शिवसेना नेतृत्वाच्या जवळच्या नेत्याविरुद्ध केलेली कारवाई चर्चेचा विषय ठरली आहे.

कोलकाता येथील काही बनावट कंपन्यांच्या माध्यमातून आमदार यामिनी जाधव यांच्यात झालेल्या आर्थिक व्यवहाराची माहिती आयकर विभागाला समजली होती. याबद्दल मुंबई तक ने २०२१ मध्ये ऑगस्ट महिन्यात बातमीही दिली होती. यामिनी जाधव यांच्या निवडणुक प्रतिज्ञापत्रातील माहितीमध्ये तफावत असल्याचंही आयकर विभागाने सांगितलं होतं.

यामिनी जाधव यांनी आपल्या निवडणुक प्रतिज्ञापत्रात Pradhan Dealers Pvt Ltd या कंपनीकडून १ कोटीं रुपयांचं unsecured loan घेतलं होतं. परंतू आयकर विभागाच्या तपासानुसार ही कंपनी बनावट असल्याचं समोर आलं. Pradhan Dealers Pvt Ltd या कंपनीमध्ये दोन कोलकातास्थित कंपन्यांची भागीदारी असल्याचं आयकर विभागाला समजलं होतं. Skylink Commercial Ltd आणि Supersoft Suppliers Ltd. या दोन कंपन्यांकडे प्रधान कंपनीची भागीदारी आहे. चंद्रशेखर राणे, कृष्णा बन्वारीलाल तोडी आणि धिरज चौधरी अशी या कंपनीच्या संचालकांची नावं आहेत. हे तिन्ही संचालक कोलकात्यामधील एक एंट्री ऑपरेटर उदय शंकर महावारच्या इशाऱ्यावर काम करायचे असंही आयकर विभागाच्या तपासात समोर आलं.

महावार याचं नाव याआधी नॅशनल हेराल्ड प्रकरणात समोर आलं होतं. आयकर विभागाने चंद्रशेखर राणे आणि प्रियेश जैन या दोन संचालकांचा जबाब नोंदवला असून त्यांनी आपण फक्त नावापुरते संचालक असल्याचं मान्य करुन प्रधान कंपनीचं सर्व काम महावारच पाहत असल्याचं सांगितलं. महावारनेही आपला जबाब नोंदवताना प्रधान कंपनीची मालकी यशवंत जाधव यांच्या नावावर करण्यासाठी प्रक्रियेला २०१८-१९ मध्ये सुरुवात केली आणि त्यानंतर १ जानेवारी २०२० ला ही प्रक्रिया पूर्ण केल्याचं सांगितलं आहे.

उद्या महापालिकेच्या शिपायांवरही धाड टाकतील, संजय राऊत यांची जळजळीत टीका

याच प्रधान कंपनीच्या माध्यमातून यशवंत जाधव आणि परिवारातील काही सदस्यांना आणि ओळखीच्या लोकांना १५ कोटींचं unsecured loan देण्यात आल्याच्या नोंदी आयकर विभागाला सापडल्या आहेत. हे लोक रोख रक्कमेच्या स्वरुपात देण्यात आल्याचं आयकर विभागाचं म्हणणं आहे. या १५ कोटींपैकी १ कोटींचं लोन यामिनी जाधव यांनाही मिळाल्याचं दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे तपासाअंती यामिनी जाधव यांना लोन म्हणून मिळालेले १ कोटी हे एका अर्थाने त्यांचेच पैसे असल्याचं आयकर विभागाचं म्हणणं आहे.

केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजे शिखंडींच्या हातातील हत्यारं, शिवसेनेची घणाघाती टीका

बनावट कंपनीचे संचालक म्हणून कार्यरत असलेल्या चंद्रकांत राणे यांनी दिलेल्या जबाबानुसार, ते आणि तोडी हे दोघेही फक्त नावापुरते संचालक होते. कंपनीची खरी मालकी ही उदय शंकर महावार आणि प्रियेश जैन यांच्याकडे होती. मार्च २०२० पर्यंत झालेले सर्व व्यवहार हे महावारने केले त्यानंतर कंपनीचा कारभार प्रियेश जैनने सांभाळला. यानंतर यामिनी जाधव आणि यतिन जाधव यांच्याकडे कंपनीचं संचालक पद जाणार असल्याचं आपल्याला कळलं असंही राणे यांनी आपल्या जबाबात म्हटलं आहे. २०११-१२ साली महावारने बोगर शेअर कॅपिटल उभं करण्यासाठी प्रधान कंपनीची स्थापना केली होती, ज्यानंतर ही कंपनी त्याने जाधव परिवाराला विकली.

नवाब मलिक यांच्या अटकेच्या कारवाईवर अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….

चंद्रकांत राणे यांच्यासोबतच प्रियेश जैननेही आयकर विभागाला दिलेल्या आपल्या जबाबात प्रधान कंपनीची मालकी यशवंत जाधव यांना विकल्याचं मान्य केलं आहे. त्यामुळे या प्रकरणात आता यशवंत जाधव यांच्यावर काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp