नागपूर शहरात सध्या आकर्षणाचा बिंदू ठरत असलेल्या डबल डेकर पुलावर शनिवारी एक स्फोटकांनी भरलेला ट्रक बेवारस पद्धतीने आढळून आल्यामुळे मोठी खळबळ माजली. पुलावर स्फोटकांनी भरलेला ट्रक बेवारस पद्धतीने आढळून आल्यामुळे अनेकांच्या मनात घातपाताचा संशय आला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले, यावेळी पोलीस तपासात या घटनेचे उलगडा झाल्यानंतर सर्वांचा जीव भांड्यात पडला.
ADVERTISEMENT
राणा प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत कागदपत्रांवरुन चालकांना मोबाईल नंबर शोधला. परंतू हा मोबाईलही बंद येत असल्यामुळे पोलिसांच्या चिंतेत भर पडली. परंतू काही वेळाने ट्रकचा चालक घटनास्थळी आला आणि या प्रकरणाचा उलगडा झाला. ट्रकचा चालक डबल डेकर पुलावरुन जात असताना त्याचा ट्रक मध्येच बंद पडल्यामुळे तो मेकॅनिकला शोधण्यासाठी ट्रक रस्त्यावर तसात सोडून गेल्याचं तपासात निष्पन्न झालं.
तसेच या ट्रकमधली स्फोटकं ही खाणीत स्फोट करण्यासाठी होती हे देखील कागदपत्रांवरुन स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांचा जीव भांड्यात पडला. दरम्यान पोलिसांनी या घटनेनंतर मेकॅनिककडून ट्रक दुरुस्त करुन घेत ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT