रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होताना दिसत आहे. युक्रेनमधील अनेक नागरिकांनी दुसऱ्या देशांत स्थलांतर केलं असून, युद्धामुळे अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, गुरुवारी (३ मार्च) रशियाने भारताच्या विनंतीवरून खार्किव्हमध्ये काही तासांसाठी युद्ध थांबवल्याचं वृत्त व्हायरल झालं. या वृत्तावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने खुलासा केला आहे.
ADVERTISEMENT
रशिया-युक्रेन यांच्यातील संघर्ष अजून सुरूच आहे. दिवसेंदिवस दोन्ही देशांतील संघर्ष वाढतच असून, रशियाकडून युक्रेनमधील हल्लेही वाढले आहेत. २४ फेब्रुवारी रोजी रशियाने अचानक आक्रमण केल्यानं युक्रेनमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. अचानक सुरू झालेल्या हल्ल्यामुळे अनेक नागरिक कीव्ह, खार्किव्हसह युक्रेनमधील अनेक शहरांत अडकून पडले. यात भारतीय विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती.
उद्या पुतिनना आदेश द्या असं सांगाल,आम्ही युद्ध थांबवा असं सांगू शकतो का?- सरन्यायाधीश रमण्णा
मागील आठ दिवसांपासून रशिया-युक्रेन युद्ध सुरू असून, युक्रेन शेजारील राष्ट्रांमध्ये दाखल होणाऱ्या भारतीयांना मायदेशी आणलं जात आहे. याच दरम्यान, गुरूवारी पंतप्रधान मोदींच्या विनंतीवरून रशियाने खार्किव्हमध्ये सहा तासांसाठी युद्ध थांबवल्याचं वृत्त सोशल मीडियाद्वारे पसरलं. अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर पडण्यासाठी मार्ग करून देण्यात आल्याचंही सांगितलं गेलं. अनेकांनी याबद्दल ट्विटही केले आहेत. पंतप्रधान मोदींनी पुतिन यांच्याशी बोलून युद्ध सहा तासांसाठी थांबवलं, असं काही जणांनी ट्विट करून म्हटलं. मात्र, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबद्दल वेगळाच खुलासा केला.
परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी रशियाचा उल्लेख न करता सांगितलं की, “कुणीतरी बॉम्ब हल्ले रोखले किंवा हल्ले थांबवण्यासाठी आम्ही बोललो, असं म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे,” अशी माहिती बागची यांनी दिली.
गुरूवारी अनेकांनी रशियाने भारतासाठी युद्ध थांबवल्याच्या आशयाची ट्विट्स केली. चीन, अमेरिका, ब्रिटनसारखी राष्ट्रे युक्रेनमध्ये पाऊल ठेवण्यास घाबरत असताना भारताने ६० टक्के भारतीयांना बाहेर काढलं. आता पंतप्रधान मोदी हे पुतिन यांच्याशी बोलले आणि भारतीय विद्यार्थी सुरक्षित ठिकाणी पोहोचतील यासाठी ६ तासांसाठी युद्ध थांबवलं, अशा स्वरुपाची ट्विट अनेकांनी केली आहेत.
महाराष्ट्र भाजपच्या ट्विटर हॅण्डलवरूनही अशाच स्वरूपाचं ट्विट करण्यात आलेलं आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी बोलल्यावर हे शक्य झालं. रशियन एअरफोर्स विमान व सैनिकी वाहनाने बाहेर काढण्याचं जाहीर केलं”, असा दावा महाराष्ट्र भाजपने केला होता.
ADVERTISEMENT