संपूर्ण लॉकडाउनला फडणवीसांचा विरोध, सर्वपक्षीय बैठकीत मांडले महत्वाचे १२ मुद्दे, जाणून घ्या…

मुंबई तक

• 04:17 PM • 10 Apr 2021

राज्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. रुग्णसंख्येत होणारी वाढ पाहता आता लॉकडाउनशिवाय पर्याय नसल्याचंही उद्धव ठाकरेंन बोलून दाखवलं. आता लॉकडाउन न लावल्यास पुढे परिस्थिती गंभीर होईल असंही मुख्यमंत्री म्हणाले. परंतू विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण लॉकडाउनला आपला विरोध असल्याचं सांगत राज्य सरकारला काही महत्वाच्या सूचना केल्या […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

राज्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. रुग्णसंख्येत होणारी वाढ पाहता आता लॉकडाउनशिवाय पर्याय नसल्याचंही उद्धव ठाकरेंन बोलून दाखवलं. आता लॉकडाउन न लावल्यास पुढे परिस्थिती गंभीर होईल असंही मुख्यमंत्री म्हणाले. परंतू विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण लॉकडाउनला आपला विरोध असल्याचं सांगत राज्य सरकारला काही महत्वाच्या सूचना केल्या आहेत.

हे वाचलं का?

गरिबांचा विचार न करता केलेल्या लॉकडाउनला आमचा विरोध – चंद्रकांत पाटील

राज्य सरकारने गरिबांना मदत न करता लॉकडाउनचा निर्णय घेतला तर जनतेचा रोष तयार होईल. त्यासाठी राज्य सरकारने आरोग्य व्यवस्था मजबुत करण्यासाठी अधिक प्रयत्न करायला पाहिजेत असं फडणवीस यांनी सुचवलं. या बैठकीत फडणवीस यांनी महत्वाचे मुद्दे मांडले.

१) सध्या कोरोना चाचण्यांचे अहवाल तीन ते दहा दिवस या अंतराने येत आहेत. पूर्वीप्रमाणे ते २४ तासांत येतील, यावर लक्ष केंद्रीत करावे. अहवाल लवकर येत नसतील तर आपण कोरोनाविरुद्धची लढाई प्रभावीपणे लढू शकणार नाही.

२) सर्व प्रयोगशाळांची एक बैठक घेऊन त्यांना स्पष्ट निर्देश दिले पाहिजेत. घरातील एक व्यक्ती पॉझिटिव्ह असेल तर घरातील इतर सदस्यांनाही पॉझिटिव्ह रिपोर्ट लगेच दिले जात आहेत. यातून आपल्या कोरोनाविरूद्धच्या लढाईत बाधा उत्पन्न होते.

३) सरकारी रूग्णालयात रेमिडेसिवीर उपलब्ध आहेत, असे सांगितले जात असले तरी खाजगी रूग्णालयात ते उपलब्ध नाहीत. काही कंपन्या राज्य सरकारला ते द्यायला तयार आहेत. त्यामुळे सरकारने चर्चा केली तर ते राज्यात सहज आणि तत्काळ उपलब्ध होईल.

४) ऑक्सिजनच्या संदर्भात मोठी कमतरता आहे. यात खूप जास्त लक्ष घालण्याची गरज आहे. ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात उपलब्ध करण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्याची गरज आहे.

५) महाराष्ट्राचा जो संसर्ग दर आहे, तो पाहता रूग्णालयात दाखल होणारे रूग्ण आणि सुटी दिलेले रूग्ण याचे सुयोग्य व्यवस्थापन करावे लागेल. त्यातून अधिक बेड निर्मित करावे लागतील. ज्या सुविधा बंद केल्या, त्या पुन्हा निर्माण कराव्या लागतील.

६) पूर्वीच्या काळात शहरी भागात संसर्ग प्रमाण अधिक होते आणि ग्रामीण भागात कमी. आता तसे राहिलेले नाही. त्यामुळे ग्रामीण भागात सुद्धा सुविधा वाढविण्यावर प्राधान्याने लक्ष दिले पाहिजे.

७) निर्बंध असले पाहिजेत. पण, जनतेचा उद्रेक सुद्धा विचारात घ्यावा. यातून मार्ग काढण्यासाठी छोटे व्यवसायीक, रिटेलर्स, केशकर्तनालय आणि इतरही व्यवसायीकांची भावना विचारात घ्यावी लागेल. कारण, सातत्याच्या आर्थिक संकटाने ते आता खचले आहेत.

त्यांच्या समस्यांचा, विविध घटकांच्या आर्थिक संकटाचा विचार आता झाला नाही आणि आपण निर्बंध लावले, तर ते लोक पुन्हा रस्त्यावर उतरतील आणि मग आपण काही करू शकणार नाही. त्यामुळे त्यांना काही तरी मदत तातडीने द्यावी लागेल.

८) लॉकडाउनमध्ये कोणतं क्षेत्र चालू शकतं, कोणतं पर्यायांसह चालू शकतं यासाठी एक सूत्र ठरवलं जाण्याची शक्यता आहे. जे क्षेत्र बंद करायचं आहे त्यांना काय मदत कतरता येईल याचा प्रामुख्याने विचार करावा लागेल. हे घटक आता खचले तर पुन्हा कधीही सावरु शकणार नाहीत.

९) सरकार वीजेचे कनेक्शन कापते आहे. वीज मंडळाच्या स्थितीवर नंतर चर्चा होऊ शकते. पण, आज पँडेमिकची स्थिती लक्षात घेता जनतेला दिलासा देणे, याला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे. आता जर त्यांना सरकार मदत करू शकली नाही, तर केव्हा करणार?

१०) मंदिरांबाहेरचे फुलवाले, केश कर्तनालय अशा घटकांचा विचार राज्य सरकारला करावाच लागेल. संपूर्ण नुकसानभरपाई सरकार देऊ शकत नसली तरी किमान ते जगू शकतील, हा तरी विचार राज्य सरकारने करावा.

११) आपण लोकांना सारे मिळून समजावून सांगू. पण, लोकांचे म्हणणे काय, हे सुद्धा राज्य सरकारला समजून घ्यावे लागेल.

१२) राजकारण करू नका, हा सल्ला आम्हाला देताना सत्ता पक्षातील मंत्री रोज मुलाखती देत सुटत असतील, तर आमच्याकडून एकतर्फी सहकार्याची अपेक्षा करणे, योग्य ठरणार नाही. जनभावनेचा विचार आणि कोरोनाचा प्रतिबंध यातील सुवर्णमध्य साधणारा निर्णय असावा, अशी आमची भूमिका आहे.

    follow whatsapp