बीड – बीडमधील टिकटॉक स्टार पूजा चव्हाण हिच्या आत्महत्याप्रकरणी तिच्या वडिलांनी अखेर मौन सोडलं आहे. याबाबत त्यांनी ‘मुंबई तक’ला पहिली प्रतिक्रिया देताना असं म्हटलं आहे की, ‘आमच्यावर कोणताही राजकीय दबाव नाही. पण मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की, माझ्या मुलीच्या बदनामी करणाऱ्या बातम्या थांबवा, नाहीतर मी स्वत: आत्महत्या करेन.’
ADVERTISEMENT
पूजा चव्हाण हिचे वडिल लहू चव्हाण यांनी आपल्या मुलीच्या आत्महत्येला कुणालाही जबाबदार ठरवलेलं नाही. मुलीने पोल्ट्री फार्मसाठी घेतलेलं कर्ज आणि व्यवसायात झालेलं नुकसान यामुळे ती तणावात होती आणि त्यामुळेच तिने हे टोकाचं पाऊल उचललं असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
गेल्या काही दिवसापासून पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येबाबत विविध स्वरुपाची माहिती समोर येत होती. या प्रकरणी विरोधी पक्षाकडून एका मंत्र्यावर देखील निशाणा साधला जात होता. मात्र, असं असूनही पूजा चव्हाण हिच्या कुटुंबातील एकाही व्यक्तीने याबाबत काहीही वक्तव्य केलं नव्हतं. मात्र, आता या प्रकरणाबाबत तिच्या वडिलांनी ‘मुंबई तक’शी बोलताना अनेक गोष्टीचा खुलासा केला. पाहा पुजाचे वडिल नेमकं काय-काय म्हणाले.
हे देखील वाचा: पूजा चव्हाण आहे तरी कोण?
पाहा पूजा चव्हाणच्या वडिलांची प्रतिक्रिया जशीच्या तशी
प्रश्न: पूजा चव्हाणबाबत जे काही घडलं त्याकडे तुम्ही कसं पाहाता?
पुजाच्या वडिलांचं उत्तर: पूजा ही खूप चांगली मुलगी होती. लोकं जे बदनाम करत आहेत तसं काहीही नाही. कोणतंही राजकारण नाही. लोकं म्हणतात राजकारणाखाली दबून तुम्ही बोलत नाही का? तर तसं काहीही नाही. आमच्यावर काहीही दबाव नाही. आम्ही ज्यावेळेस पुण्याला गेलो रात्री तिथे जेव्हा आम्ही विचारपूस केली. तिच्यासोबत जो मुलगा राहत होता त्याने स्पष्टपणे सांगितलं की, ती गॅलरीवर बसली होती आणि दीडच्या सुमारास ती खाली पडली. मी म्हणालो ती कशी काय पडली? तर ती चक्कर येत असल्याचं सांगत होती आणि तोवर ती खाली पडली. त्याचं म्हणणं असं आलं आहे. त्यामुळे मी कुणावर आरोप करु? मी कुणाचं नाव घेऊ?
प्रश्न: पुजाने असं टोकाचं पाऊल का उचललं असेल?
पुजाच्या वडिलांचं उत्तर: त्याचं काय आहे की, तिच्या डोक्यावर 25 ते 30 लाख एवढं कर्ज होतं. पप्पाचं चांगलं व्हावं यासाठी तिने बँकेतून कर्ज वैगरे काढलं होतं. यानंतर त्यांनी पोल्ट्रीसाठी बांधकाम केलं आणि एक पोल्ट्रीही सुरु केली होती. पण त्याचवेळेस कोरोना आला. कोरोना आल्यामुळे आम्ही कोंबड्या फुकट वाटल्या… फुकट म्हणजे न्यूजमध्ये पाहून घ्या तुम्ही, गेल्या वर्षीच्या न्यूजमध्ये. त्यावेळेस माझा 25 लाखाचं नुकसान झालं. एक रुपया देखील मिळाला नाही. सरकारने 1 रुपया देखील दिला नाही. सरकारला आम्ही निवेदन दिलं की, काही तरी मदत करा.. पण सरकारने काहीही मदत केली नाही. ते देखील आम्ही सहन केलं.
ते सहन करुन आम्ही उसने-पासने, मित्रांकडून आणि इतरांकडून पैसे घेऊन आम्ही धंदा पुन्हा उभा केला. त्यामुळे कसं तरी आमचा धंदा पुन्हा चालू लागला. तरी आता हे बर्ड फ्ल्यू आलं. बर्ड फ्लूमुळे 30 ते 35 किलो रुपयांनी माल द्यावा लागला. 50 रुपयांना एक किलो खरेदी आहे आणि आता आमचा माल जातोय 30 रुपयांनी. परत तीच पद्धत झाली. आमच्याकडे काहीही राहिलं नाही. त्यामुळे आमच्यासमोर खूप मोठं संकट उभं राहिलं. त्यावेळी पूजा मला म्हणाली की, काय करावं पप्पा… मी तेव्हा तिला म्हटलं… की, घाबरू नको. माझी एलआयसी आहे 25 लाखाची. मी तिथे अर्ज दिलेला आहे. तेव्हा तिथले साहेब म्हणाले तीन-चार दिवसात तुम्हाला 4 लाखापर्यंत कर्ज देता येईल. जास्त देता येणार नाही. मी म्हटलं ठीक आहे. चार लाख तरी द्या, मला धंदा उभा करायचाय.
ही बातमीही पाहा: टीकटॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या, राज्याचे मंत्री अडचणीत?
त्यावेळी पूजा मला म्हणाली की, माझं काही मन लागेना इथं. मला खूप ताण जाणवतो इथे. मी पुण्याला जाऊन थोडे क्लासेस वैगरे करते. तर मी पण म्हटलं ठीक आहे बेटा… जा तू. तेव्हा तिला मी 25 हजार देखील दिले खर्चासाठी.. एक आठ-दहा दिवस मी रोज तिला फोन करायचो. ज्या दिवशी घटना घडली त्यादिवशी मी तिच्याशी दुपारी देखील बोललो. मी तिला विचारलं की, पूजा काय चाललंय तुझं? तर मला म्हणाली की, काही नाही बरं आहे. तर मी तिला विचारलं देखील पैसे वैगरे पाहिजेत का? तर म्हणाली की, नको… आहेत तुम्ही दिलेले. लागले तर सांगते.
पण त्याच दिवशी रात्री 2 वाजता मला फोन आला तिच्या मित्राचा. त्यात तो म्हणाला की, पूजा बाल्कनीतून खाली पडली आणि तिच्या डोक्याला मार लागला. मी म्हटलं बाबा… खूप लागलंय की थोडं लागलंय? तर तो म्हणाला जास्त लागलंय तुम्ही लवकरात लवकर या… मी क्षणाचाही अवधी न लावता लगेच निघालो. तिथे मी साडे आठ की नऊ वाजता पोहचलो. गेलो तर तिथे पूजाचा मृतदेह होता. काय करणार तिथे, माझ्या काही लक्षात आलं नाही. मला एकदम चक्कर आल्यासारखं झालं. त्यानंतर सगळं चॅनलमार्फत सुरु आहे. काय झालंय… कसं झालंय… काय करणार त्याला?
अधिक वाचा: मुख्यमंत्र्यांनी ‘त्या’ सर्व ऑडिओ क्लिप्स ऐकाव्यात-फडणवीस
प्रश्न: मीडियामध्ये ज्या चर्चा सुरु आहेत त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता
पुजाच्या वडिलांचं उत्तर: ही बाहेरची जी काही चर्चा सुरु आहे ती विनाकारण आमची बदनामी करण्यासाठी सुरु आहे. एवढी बदनामी करतायेत, माझी तुमच्या माध्यमातून हीच विनंती आहे की, ‘ही बातमी बंद करा.’ माझ्या विरोधात, माझ्या मुलीच्या विरोधात काहीही करु नका. नाहीतर मी आत्महत्या करणार सरळसरळ जाऊन. माझी बदनामी बंद करा.
दरम्यान, पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर तिच्या वडिलांनी दिलेल्या या प्रतिक्रियेला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT