राज्यासह अनेक ठिकाणी कोरोनामुळे परिस्थिती चिंताजनक झाली आहे. पुण्यात देखील कोरोनाबाधितांची संख्या मोठी आहे. अशातच पुण्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या एका आरोपी महिलेचा आठव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. मोक्क्याच्या गुन्ह्यात आरोपी असलेली दीप्ती काळे या आरोपी महिलेचा मृत्यू झाला आहे.
ADVERTISEMENT
दीप्ती काळे या महिला आरोपीने ससून रुग्णालयामधून पळून जात होती. यावेळी आठव्या मजल्यावरून खाली पडून तिचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
सहायक पोलिस आयुक्त सुषमा चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, बांधकाम व्यावसायिकाला बलात्काराच्या गुन्हयात अडकवण्याची धमकी देऊन 46 गुंठे नावावर करून घेतलं. त्यानंतर आणखी 56 गुंठे द्यावी अशी मागणी केली होती. तर त्यानंतर शहरातील प्रसिद्ध सराफ व्यावसायिक बळवंत मराठे यांना आत्महत्येस प्रवृत्त केलं होतं. यासह अनेक गुन्ह्यात दीप्ती सरोज काळे या महिलेवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती.
काही दिवसांपूर्वी दीप्ती काळेचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्याच दरम्यान तिच्यावर आज मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. या सर्व घडामोडी घडत असताना आज दुपारच्या सुमारास ससून रुग्णालयाच्या आठव्या मजल्यावर असलेल्या एक बाथरूम मधून पाईपच्या मदतीने खाली उतरत होती. त्यामध्ये तिचा तोल जाऊन खाली पडली. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेप्रकरणी बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे.
ADVERTISEMENT