पटना: बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना डोरांडा ट्रेझरीशी संबंधित चारा घोटाळ्यात तब्बल पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एसके शशी यांनी हा निकाल दिला आहे. तसेच त्यांना 60 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. दुसरीकडे लालूंच्या वकिलाने सांगितले की, ‘लवकरच जामिनासाठी पुढील अर्ज केला जाईल. मात्र, जामीन मिळेपर्यंत लालूंना तुरुंगातच राहावे लागणार आहे.’
ADVERTISEMENT
चारा घोटाळ्याशी संबंधित याआधी देखील चार प्रकरणांमध्ये लालूंना पूर्वीच दोषी ठरवण्यात आलं आहे. यामध्ये लालू सध्या जामिनावर आहेत. याप्रकरणी त्यांना हायकोर्टातून जामीन मिळाला होता. कनिष्ठ न्यायालय किंवा ट्रायल कोर्टाने त्यांना दिलासा दिलेला नव्हता.
15 फेब्रुवारी रोजी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने लालू यादव आणि इतर आरोपींना 139.5 कोटी रुपयांच्या डोरंडा ट्रेझरीच्या चारा घोटाळ्यात दोषी ठरवले. तेव्हा न्यायालयाने शिक्षा जाहीर केली नव्हती. आज न्यायालयीन कामकाज ऑनलाइन पद्धतीने सुरु झाले. ज्यामध्ये लालू प्रसाद यादव हे देखील ऑनलाइनच सहभागी झाले होते.
कोणत्या प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना किती शिक्षा?
राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) सुप्रीमो लालू यादव यांना चारा घोटाळ्यातील अन्य 4 प्रकरणात (दुमका, देवघर आणि चाईबासा) यापूर्वीच दोषी ठरवण्यात आले आहे. यामध्ये त्यांना एकूण 14 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याचवेळी त्यांना आतापर्यंत 60 लाख रुपये दंड देखील भरावा लागला आहे.
चारा घोटाळ्यासह आणखी एका केसमध्ये लालूप्रसाद यादव दोषी, 139 कोटींचा अपहार
चाईबासा येथून जे पहिलं प्रकरण (37 कोटींची बेकायदेशीर रक्कम काढली) समोर आलं होतं त्यात लालूंना पाच वर्षांची शिक्षा झाली आहे. त्यानंतर देवघर कोषागारप्रकरणी (79 लाख रुपये बेकायदेशीर रक्कम काढली) 3.5 वर्षांची शिक्षा झाली. त्यानंतर चाईबासाच्या (33.13 लाखांची बेकायदेशीर रक्कम काढणे) दुसऱ्या प्रकरणात आणखी पाच वर्षांची शिक्षा झाली. यानंतर लालूंना दुमका कोषागार प्रकरणात (3.13 कोटी रुपये बेकायदेशीर रक्कम काढणे) यात तब्बल सात वर्षांची शिक्षा झाली आहे. आता डोरंडा कोषागर प्रकरणात दोषी आढळल्याने लालू प्रसाद यादव यांच्या शिक्षेत आणखी पाच वर्षांची भर झाली आहे.
ADVERTISEMENT