मिथीलेश गुप्ता
ADVERTISEMENT
डोंबिवली: शिवसेनेच्या (Shivsena) डोंबिवली मध्यवर्ती शाखेत जोरदार राडा झाला आहे. शिवसेना कार्यकर्ते आणि शिंदे समर्थकांमध्ये हा राडा झाला आहे. शिंदे समर्थक शिवसेनेच्या डोंबिवली मध्यवर्ती शाखेत घुसले आणि शिंदे समर्थकांनी शाखेत घुसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा फोटो लावला. यामुळे दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आपापसात भिडले आहेत.
ठाकरे समर्थक विरूद्ध शिंदे समर्थक यांचा डोंबिवलीच्या शिवसेना शाखेत राडा
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे फोटो या शिवसेना शाखेतून काढण्यात आले होते. यामुळे शिंदे गटाचे समर्थक आक्रमक झाले आणि शिंदे गटातील 400 ते 500 जणांनी शिवसेना शाखेत घुसून शाखा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिला शिवसैनिक, तरुण आणि पुरुष शिवसैनिक असे सगळ्याच वयोगटातील शिवसैनिक आणि शिंदे समर्थक आपआपसात भिडले आहेत.
रामनगर पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. यावेळी दोन्ही बाजूच्या समर्थकांमध्ये धक्काबुक्की झाली आणि एकमेकांना शिवीगाळ करण्यात आली, तसेच पत्रकारांनाही धक्काबुक्की करण्यात आली. याठिकाणी डोंबिवली पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
मुख्य कार्यालयात श्रीकांत शिंदे यांचे छायाचित्र लावण्यास मात्र शिवसैनिकांना जोरदार विरोध केला. या मध्यवर्ती कार्यालयातच श्रीकांत शिंदे यांचे संपर्क कार्यालय शेजारच्या खोलीत आहे. तेथे ते लावावे का, यावरून दोन्ही गटांत नंतर बोलणी सुरू झाली. शिवसेना कोणाची यावरुन शिंदे गट व ठाकरे गट यांच्यातील राजकीय वाद चिघळत चालला आहे, त्याचे प्रत्यत आज दिसून आले. 8 ऑगस्ट पर्यंत शेवटची मुदत असल्याने सभासद नोंदणीसाठी मोठ्या हालचाली शहरात सुरु आहेत.
शिवसेेनेचे डोंबिवली शहरप्रमुख विवेक खामकर यांची अटक आणी जामीनावर सुटका यानंतर आता शिवसेना सभासद नोंदणी कार्यक्रमावरुन वाद उफाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सभासद नोंदणीच्या जाहीर कार्यक्रमाची सूचना शिंदे गटाने केल्यानंतर ठाकरे समर्थक गटाने शिवसैनिकांना कोणत्या गटाचा फॉर्म तुम्ही भरत आहात याची पडताळणी करा, असे बजावले आहे. बाळासाहेबांच्या नावे जनमानसांत संभ्रम निर्माण केला जात असल्याचे सांगत कार्यकर्त्यांना भावनिक साद घालत नोंदणी फॉर्म कोणाचे भरता याकडे कटाक्षाने लक्ष द्या असे आवाहन केले आहे.
शिवसेना कोणाची यावरुन सध्या ठाणे जिल्ह्यात ठाकरे समर्थक व शिंदे समर्थक जोरदार प्रयत्न करत आहेत. ठाणे जिल्ह्यात शिंदे यांचा पगडा जास्त असल्याने ठाकरे समर्थकांकडून शिवसेना पक्षाची ताकद येथे वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वाढदिवसाच्या दिवशी पक्षातील कार्यकर्त्यांना भावनिक साद घालत प्रतिज्ञापत्र लिहून देण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर शिंदे गटानेही कार्यकर्त्यांकडून शपथपत्र लिहून घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर सभासद नोंदणीसाठी सध्या जोरदार प्रयत्न केले जात आहेत. यासर्व घडामोडींचे डोंबिवलीत तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत.
सभासद नोंदणीवरुन वाद होऊन शिवसेनेचे डोंबिवली शहर प्रमुख खामकर यांना पोलिस कोठडीची हवा खावी लागली होती. शिंदे गटाकडून दबाव टाकला गेला तरी आम्ही वाकणार नाही असे यावेळी कट्टर शिवसैनिक व महिला आघाडीने दाखवून दिले. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातर्फे मंगळवारी सायंकाळी डोंबिवलीत सभासद नोंदणीचा भव्य शुभारंभ करण्यात येणार आहे. पूर्वेतील पूर्वेतील सर्वेश हॉल येथे हा कार्यक्रम होणार आहे. जास्तीत जास्त संख्येने कार्यकर्त्यांनी येथे जमून सभासद नोंदणी करावी असे संदेश समाज माध्यमातून व्हायरल होत आहे. याला ठाकरे समर्थक गटाकडून उत्तर दिले जात असून ठाकरे समर्थक गटाने देखील कार्यकर्त्यांना आवाहन करण्यास सुरुवात केली आहे. डोंबिवलीतील राजकीय वातावरण चिघळत चालल्यामुळे पोलिसांचा देखील येथे कस लागणार असल्याचे दिसते.
ADVERTISEMENT