गुंतवणूकदारांना मोठ्या परताव्याचं आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी विशाल फटेला बार्शीच्या सत्र न्यायालयानं १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. फटे गेल्या काही दिवसांपासून फरार होता. तो काल पोलिसांना शरण आला, त्यानंतर त्याला आज कोर्टात हजर करण्यात आलं होतं. जिल्हा व सत्र न्यायाधीश अजितकुमार भस्मे यांच्यासमोर आज सुनावणी झाली.
ADVERTISEMENT
शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून मोठ्या परताव्याचं आमिष दाखवत बार्शी येथील गुंतवणूकदारांची विशाल फटे यानं फसवणूक केल्याचा आरोप गुंतवणूकदारांनी केला होता. अनेक गुंतवणूकदारांनी फाटेविरोधात पोलिसांत फसवणुकीची तक्रारही दाखल केली आहे. या सगळा प्रकार समोर आल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून फटे हा अज्ञातवासात गेला होता. मात्र, काल त्याच्या स्वतःच्या युट्यूब चॅनेलवरुन त्यानं व्हिडिओ पोस्ट करत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.
“विशाल फटे यानं लोकांना विविध आश्वासनं दिली होती. त्यानुसार सुरुवातीला त्यानं काही परतावा दिला. परंतू ज्यावेळी त्याला परतावा देणं अशक्य झालं, त्यानंतर तो ९ जानेवारीपासून गायब झाला होता. आता तो समोर आला आहे. तसंच त्यानं गुंतवणूकीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी कंपन्या स्थापन केल्याची माहिती हाती आली आहे. या कंपन्यांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी त्याची पोलीस कोठडी गरजेची होती. त्यानुसार, आम्ही कोर्टाकडं १४ दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. यासंदर्भातील आमचा युक्तीवाद ऐकून कोर्टानं फटेला दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली”, अशी माहिती आजच्या सुनावणीनंतर सरकारी वकीलांनी दिली.
काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
विशाल फटे याने अनेक लोकांची करोडोंची फसवणूक केल्याची तक्रार आहे. फटेने तब्बल ८१ गुंतवणूकदारांची १८ कोटी ७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार आहे. फटे याच्यासह ४ जाणांवर गुन्हा करण्यात आला आहे. फटे याचे वडील अंबादास फटे आणि भाऊ वैभव फटे याला १६ जानेवारील अटक केली असून २० जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. विशाल फटे हा लोकांना अमिश दाखवून पैसे लुटायचा त्याने हे पैसे कोणाकडून घेतले आणि कुठे गुंतविले याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
ADVERTISEMENT