शिवसेनेतल्या फुटीपासून शिंदे गट आणि भाजपविरुद्ध आक्रमक झालेल्या ठाकरे गटातले आमदार भास्कर जाधव यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता दिसत आहे. भास्कर जाधव यांच्याविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. नवी मुंबईतल्या एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
नवी मुंबईतील शिवसैनिक ए.के. मढवी यांना पोलिसांकडून तडीपार करण्यात आलं आहे. तर खासदार राजन विचारे यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आलीये. या घटनांच्या निषेधार्थ ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’च्या वतीने बुधवारी (१९ ऑक्टोबर) तडीपार मोर्चा काढण्यात आला होता.
या मोर्चाला ठाकरे गटातल्या इतर नेत्यांबरोबर भास्कर जाधव हेही उपस्थित होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना नारायण राणे, नितेश राणे, निलेश राणे यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या विधानांवर आक्षेप घेत नवी मुंबईतल्या एनआरआय पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. पोलिसांनी याप्रकरणी भास्कर जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
‘आपण यांना पाहिलंत का?’, भास्कर जाधवांच्या विरोधात बॅनरबाजी
भास्कर जाधव यांच्या कोणत्या विधानावर आक्षेप
भास्कर जाधव यांच्या काही विधानांवर तक्रारदाराने आक्षेप घेतला आहे. ‘भास्कर जाधव माध्यमांशी बोलताना म्हणाले की, नारायण राणे आणि नारायण राणेंची नालायक कार्टी, गुंड तसेच कावळा कितीही दुधामध्ये धुतला तरी तो राजहंस होत नाही. तो कावळाच असतो. गुंड गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले नालायक राणेंच्या तोंडी तुम्ही लागू नका. त्यांना तुम्ही काहीही घाला ते घाणच ओकणार, असा उल्लेख केला’, असं नारायण राणे समर्थक तक्रारदाराने म्हटलंय.
भास्कर जाधव रडारवर असल्याची का होतेय चर्चा?
भास्कर जाधव यांच्याविरुद्ध गेल्या काही दिवसांत तिसरा गुन्हा दाखल झाला आहे. ठाण्यात झालेल्या महाप्रबोधन यात्रेनंतर भास्कर जाधव, सुषमा अंधारे यांच्यासह काही नेत्यांविरुद्ध गुन्हा दाखले झालेला आहे. त्यानंतर कुडाळमधल्या सभेनंतरही भास्कर जाधवांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे भास्कर जाधव विरोधकांच्या रडारवर असल्याची चर्चा सुरू झालीये.
घरावर हल्ला! भास्कर जाधव भडकले; फडणवीसांचं नाव घेत म्हणाले, ‘आम्हाला मारा, पण माघार घेणार नाही’
सत्तांतर आणि शिवसेनेतल्या बंडानंतर भास्कर जाधव सातत्यानं शिंदे गटातले नेते, भाजप आणि नारायण राणे यांना लक्ष्य करत आहेत. भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची घटनाही घडलीये. भास्कर जाधव सरकार आणि शिंदे गट-भाजप युतीवर टीका करत असल्यानं त्यांच्याविरुद्ध अशाच स्वरूपाची कारवाई केली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर केली जात आहे.
ADVERTISEMENT