योगेश पांडे, नागपूर
ADVERTISEMENT
नागपूरमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:च्या सर्व्हिस रिव्हॉलवरने गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र, आत्महत्येचं कारण फारच खळबळजनक असल्याचं आता समोर आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत प्रमोद मेरगुवार या पोलीस कर्मचाऱ्याला आधी कोरोनाची लागण झाली. यावर उपचार केल्यानंतर तो बरा देखील झाला. पण त्यानंतर त्याला म्युकोरमायकोसिस (Black Fungus) ची लागण झाली होती. त्यामुळे त्याला एक डोळा देखील गमवावा लागला होता.
एक डोळा गमवल्यानंतर दुसरा डोळासुद्धा होता जवळजवळ 80 टक्के खराब झाला होता. याच सगळ्या गोष्टीमुळे त्रस्त होऊन प्रमोद याने गोळी झाडून आत्महत्या केली असावी अंदाज व्यक्त केला जातो.
झिंगाबाई टाकळी परिसरात राहणाऱ्या प्रमोद मेरगुवार याच्या आत्महत्येच्या वृत्तामुळे एकच हळहळ व्यक्त करण्यात आली आहे. मृतक पोलीस कर्मचारी प्रमोद मेरगुवार हे ग्रामीण पोलीसमध्ये होते. काही काळापासून त्यांना शहरात पोस्टिंग दिली गेली होती. पण त्याच दरम्यान, त्यांना कोरोनाची लागण झाली आणि त्यानंतर म्युकोरमायकोसिसची लागण झाल्याने त्याचा परिणाम त्याच्या दोन्ही डोळ्यांवर झाला.
यादरम्यान, त्याचा एक डोळा पूर्णपणे निकामी झाला तर दुसरा डोळा देखील 80 टक्के खराब झाला होता. अचानक उद्भवलेल्या या संकटाने खचलेल्या प्रमोद यांनी आत्महत्या करत स्वत:चं आयुष्य संपवलं.
पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या केली त्यामुळे पोलिस विभागामध्ये खळबळ उडालेली आहे.
म्युकोरमायकोसिस: ‘साहेब अॅम्फोटेरिसिन बी’ इंजेक्शनचा तुटवडा होऊ देऊ नका, नाहीतर…’
म्युकोरामायसिस म्हणजेच ब्लॅक फंगलची लागण नेमकी कशामुळे होत आहेत?
डॉ. लहाने यांचं म्हणणं आहे की, फंगल इंफेक्शन हे जुनंच आहे. पण कोरोनामुळे याचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. कोरोना रुग्णांवर उपचारासाठी जे स्टेरॉईड वापरले जात आहेत त्यामुळे रुग्णांची शुगर लेव्हल (रक्तातील साखर) वाढते. या व्यतिरिक्त काही औषधे रुग्णाची प्रतिकारशक्ती कमी करतात. अशावेळी रुग्णांना सहजपणे फंगल इंफेक्शन होतं. ब्लॅक फंगस हे थेट संक्रमित व्यक्तीच्या मेंदूपर्यंत पोहोचतं. अशा परिस्थितीत रुग्णाचा मृत्यू होतो. काही केसेसमध्ये रुग्णाला वाचवण्यासाठी त्याचे डोळे कायमचे काढून टाकावे लागतात.
नीती आयोगाशी संबंधित डॉक्टर व्ही के पॉल म्हणतात, सामान्य परिस्थितीत मधुमेह असणाऱ्या रूग्णांमध्ये म्युकोरमायकोसिस आढळून येतं. परंतु जर कोणाची शुगर लेव्हल नियंत्रणात नसेल आणि त्याला कोरोनाची बाधा झाली तर धोका जास्त असतो. अशा परिस्थितीत उपचारासाठी बहुधा स्टेरॉइड्स वापरल्या जातात.
ADVERTISEMENT