मागील दोन दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोआहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. विविध नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने दुर्घटना घडत आहेत. जिल्ह्यातील 2 घटनेचे व्हिडीओ समोर येत आहेत. जे अतिशय मन हेलावणारे आहेत. एका घटनेत ट्रॅक्टर वाहून गेला तर दुसऱ्या घटनेत पार्क केलेली सुमो जीप वाहून गेली. यात दुर्दैवाने ट्रॅक्टरसोबत 3 जण वाहून गेल्याची माहिती मिळते आहे.
ADVERTISEMENT
अमरावती जिल्ह्यात पावसाचं धुमशान, पुरात वाहून गेल्या दोन गाड्या
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात अतिवृष्टीमुळे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक भागात पुरात गाडी घातल्याने अनेकांनी आपले जीव संकटात टाकले आहे. काही ठिकाणी तर पाण्याचा प्रवाह इतका जास्त होता की, अवजड वाटणारे वाहनं देखील खेळण्यातील गाड्यांप्रमाणे वाहून गेले. त्यात जीवितहानी देखील झाल्याची नोंद आहे. अशाच दोन घटना अमरावती जिल्ह्यात घडल्या आहे.
नदी कडेला उभी असलेली गाडी गेली वाहून
अमरावती जिल्ह्यातील मोशी तालुक्यातील महादेवांच्या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी काही भक्त आले होते. त्यांनी आपली गाडी नदीच्या कडेला लावली होती. अचानक आलेल्या पावसामुळे नदीला पूर आला. पाण्याच्या प्रवाह इतका वाढला की मालू नदीने रौद्ररूप धारण केले आणि बाजूला उभी असलेली गाडी त्यात वाहून गेली. अक्षरशः खेळण्यातील गाडीप्रमाणे ती गाडी वाहून गेली. सुदैवाने गाडीत कोणी नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही सर्व घटना कॅमेरात कैद झाली आहे.
पुरातून गाडी घालणं आलं जीवाशी
तर दुसरी घटना जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वरी येथील आहे. नांदगाव वरून जावरा गावाला जाणाऱ्या पुलावरून पाणी वाहत होते. पुलावरून तीन ते चार फूट वर पाणी वाहत होते. त्यादरम्यान एका ट्रॅक्टर चालकाने ट्रॉलीसह ट्रॅक्टर पुलावरून नेण्याचा प्रयत्न केला. ट्रॅक्टरमध्ये एकूण पाच जण होते. व्हिडीओ काढणारा व्यक्ती त्याला दिशा सांगत होता. मात्र क्षणातच ट्रॅक्टर पाण्यात वाहून गेला. ट्रॅक्टरमध्ये बसलेले 2 जण पोहत बाहेर आले पण ट्रॉलीमध्ये बसलेले तिघेजण वाहून गेले. तिघांचा शोध सध्या प्रशासन घेत आहेत. वाहत्या पाण्यात गाडी घालण्याचा धाडस करू नये, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येतं आहे.
ADVERTISEMENT