हर्षदा परब : कोरोनाच्या नवीन स्ट्रेनचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होऊ नये म्हणून मुंबईतील कोरोना रुग्णांचे 5 टक्के सॅम्पल एनआयव्हीला पाठविण्याचे आदेश मुंबई महापालिकेला देण्यात आले आहेत. आजवर फक्त युकेवरुन येणाऱ्या प्रवाशांसाठी या सुचना देण्यात आल्या होत्या. आता मात्र, ब्राझिल, दक्षिण आफ्रिकेवरुन प्रवास करुन आलेल्या रुग्णांचे नमुनेही एनआयव्हीला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
राज्यात पुन्हा एकदा कोरोनाची लाट येण्याची शक्यत आहे. अशातच देशात कोरोनाचा नवीन स्ट्रेन आढळला आहे. राज्यासह मुंबईत दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. यामध्ये प्रमुख कारणांपैकी परदेशातून येणाऱ्या व्यक्ती हे एक कारण असल्याचं काही दिवसांपूर्वीच मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने काही निर्णय घेतले आहेत. केंद्राच्या आरोग्य खात्याने पाठवलेल्या सर्क्युलरमध्ये आता दक्षिण आफ्रिका आणि ब्राझिलियन स्ट्रेन शोधण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. या सुचनेनंतर आता युके, युरोप आणि मध्य आशियाई देशातून प्रवास करुन येणाऱ्यांसह ब्राझिल आणि दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या व्यक्तींवर नजर ठेवण्यात येणार असल्याचे मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकारी मंगला गोमारे यांनी सांगितले. मुंबईत ज्यांचे रिपोर्टस पॉझिटिव्ह येतील त्यापैकी पाच टक्के सॅम्पल्स नवीन स्ट्रेनच्या चाचणीसाठी पुण्यातील एनआयव्ही संस्थेला पाठविण्याच्या सुचना मुंबई महानगरपालिकेला देण्यात आल्या आहेत.
मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांत मुंबईतून 90 सॅम्प्लस एनआयव्हीकडे नवीन स्ट्रेनच्या चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
परदेशातून प्रवास करुन येणाऱ्या व्यक्तींवर मुंबई महापालिकेची करडी नजर होतीच. गुरुवारी झालेल्या बैठकीमध्ये ब्राझिलमधून येणाऱ्या व्यक्तींना संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये ठेवण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त एक्बालसिंह चहल यांनी जाहीर केलेल आहे.
ADVERTISEMENT