पुजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी महाराष्ट्राचे वनमंत्री संजय राठोड यांनी अखेरीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपली राजीनामा सोपवला आहे. पुजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी राठोड यांचं नाव जोडलं गेल्यानंतर जवळपास १५ दिवस ते लोकांसमोर आले नव्हते. यानंतर बंजारा समाजाचं श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी संस्थानात राठोडांनी शक्तीप्रदर्शन करत राजीनामा टाळण्याचा प्रयत्न केला. परंतू हेच शक्तीप्रदर्शन त्यांच्या अंगलट आल्याचं बोललं जातंय. गेल्या काही दिवसांपासून आपली राजीनामा टाळण्याचा प्रयत्न करत असलेल्या संजय राठोड यांचा आजच राजीनामा का घेतला गेला याला अत्यंत महत्व आहे.
ADVERTISEMENT
संजय राठोड यांच्या विरोधात कोणकोणते मुद्दे तयार झाले की ज्यामुळे त्यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावाच लागला हे आपण जाऊन घेऊयात…
१) पुजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणाशी नाव जोडलं जाणं –
७ फेब्रुवारीला २२ वर्षांची टीकटॉक स्टार पुजा चव्हाणने पुण्यात आत्महत्या केली. या प्रकरणात पुणे पोलीस आत्महत्येचा तपास करत होते. मात्र या प्रकरणात संजय राठोड आणि पुजा चव्हाण यांचे फोटो व काही कथित ऑडीओ क्लिप समोर आल्यानंतर विरोधकांकडून राठोड यांचा राजीनामा घेतला जावा यासाठी दबाव वाढत होता.
अवश्य वाचा – पूजाची आत्महत्या ते राठोड यांचा राजीनामा, वाचा काय काय घडलं?
२) पोहरादेवीमधलं शक्तीप्रदर्शन भोवलं –
सुमारे १५ दिवस संजय राठोड लोकांसमोर आले नाहीत. दरम्यानच्या काळात राज्यात कोरोनाच्या केसेसमध्ये वाढ होत असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकांना बाहेर फिरताना गर्दी करु नका असं आवाहन केलं. तसेच राज्य सरकारने राजकीय पक्षांच्या सभा व सर्व धार्मिक सोहळ्यांवर बंदी घातली. मात्र याचवेळी संजय राठोड यांनी २३ फेब्रुवारीला पोहरादेवी संस्थानात पुजेसाठी हजेरी लावून शक्तीप्रदर्शन केलं.
यावेळी राठोड यांचे हजारो समर्थक पोहरादेवी संस्थानाच्या भागात हजेर होते. शक्तीप्रदर्शन करुन राठोड यांनी आपल्या पाठीमागे बंजारा समाजाचा पाठींबा असल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला. परंतू असं करत असताना खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिलेले आदेश धाब्यावर बसवल्यामुळे राठोड यांच्याविरोधातली नाराजी वाढली.
३) पक्षांतर्गत विरोध –
राठोड यांनी राजीनामा द्यावा यासाठी विरोधीपक्ष जोर धरत होता. भाजपाने रस्त्यावर येऊन राठोड यांच्या राजीनाम्यासाठी निदर्शनंही केली. याचसोबत शिवसेनेतूनच एक गट हा राठोडांच्या विरोधात होता. विदर्भातील खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख यांचा एक गट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटला होता. राठोड यांचं प्रकरण पक्षाची आणि मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन करत असल्याचं मत या गटाने मांडलं होतं. २०१९ मध्येही याच गटाने राठोड यांना पुन्हा मंत्रीपद दिलं जाऊ नये यासाठीही प्रयत्न केले होते.
४) अधिवेशनाआधीच विरोधकांच्या हातातला मुद्दा काढून घेण्याचा प्रयत्न –
१ मार्चपासून महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. या अधिवेशनात विरोधी पक्षात असलेल्या भाजपने संजय राठोड प्रकरणावरुन महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेला पूर्णपणे घेरण्याची तयारी केली होती. अशा परिस्थितीत राठोड यांचा राजीनामा न घेतल्यास विरोधपक्ष कामकाज चालू देणार नाही अशी भीती सरकारला होती. त्यामुळे अधिवेशनाआधीच राठोड यांचा राजीनामा घेत विरोधकांच्या हातातला एक आयता मुद्दा काढून घेण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
ADVERTISEMENT