फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना एका आंदोलकाने क्रांतीची घोषणा देत अंडं फेकून मारल्याचा प्रकार समोर आला आहे. फ्रान्समधील लियॉनमध्ये सोमवारी ही घटना घडली. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
ADVERTISEMENT
राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे सोमवारी लियॉनमध्ये फ्रेंच पाककला, हॉटेल आणि खाद्यपदार्थ व्यापाराला प्रोत्साहन देणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान हा प्रकार घडला. लियॉन मॅगच्या फुटेजमध्ये एका व्यक्तीने राष्ट्राध्यक्षांना अंडं फेकून मारलं.
राष्ट्राध्यक्ष एमॅन्युएल मॅक्रॉन हे गर्दीतून चालत येत होते. त्यांच्या आजूबाजूला सुरक्षा रक्षकांचा वेढा होता. याचवेळी एका आंदोलकाने क्रांती जिंदाबाद अशी घोषणा देत राष्ट्राध्यक्षांच्या दिशेनं अंड फेकलं. हे अंडं राष्ट्राध्यक्षांच्या खांद्याला लागून न फुटताच मागच्या दिशेनं पडले.
अचानक अंडं फेक झाल्यानं राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या आजूबाजूचे सुरक्षा रक्षक सर्तक झाले आणि त्यांनी राष्ट्राध्यक्षांना सुरक्षेचा वेढा दिला. आंतरराष्ट्रीय खानपान कार्यक्रमात झालेल्या या घटनेनंतर एका व्यक्तीला अटक करण्यात आली असल्याचं फ्रेंच माध्यमांनी म्हटलं आहे.
राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या कार्यालयाच्या प्रवक्त्याने घडलेल्या या सर्व प्रकारावर कोणतंही उत्तर दिलं नाही. राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यावर अशापद्धतीने झालेला हा पहिलाच हल्ला नाही. यापूर्वी जनूमध्ये दक्षिण फ्रान्समध्ये वॉकआऊटदरम्यान एका व्यक्तीने मॅक्रॉन यांच्यावर कानशिलात लगावली होती. त्या व्यक्तीला चार महिन्यांचा तुरूंगवास भोगावा लागला.
ADVERTISEMENT