Ganesh Chaturthi 2022 : गणेश उत्सव कधी सुरू होणार? कशी करायची बाप्पाची स्थापना?

मुंबई तक

• 02:56 AM • 27 Aug 2022

हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे प्रत्येक महिन्यात दोनदा चतुर्थी येते. मात्र श्रावण महिन्याची अमावस्या झाल्यावर म्हणजेच भाद्रपद महिना लागल्यावर जी पहिली चतुर्थी येते त्या चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. गणेश चतुर्थी असं या चतुर्थीला म्हटलं जातं आणि भाद्रपद महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला बाप्पा घरोघरी विराजमान होतात. सार्वजनिक मंडळांमध्येही बाप्पा येतात. दहा दिवस गणेश उत्सव चालतो. गणेश उत्सव कधी आहे? काय […]

Mumbaitak
follow google news

हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे प्रत्येक महिन्यात दोनदा चतुर्थी येते. मात्र श्रावण महिन्याची अमावस्या झाल्यावर म्हणजेच भाद्रपद महिना लागल्यावर जी पहिली चतुर्थी येते त्या चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. गणेश चतुर्थी असं या चतुर्थीला म्हटलं जातं आणि भाद्रपद महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला बाप्पा घरोघरी विराजमान होतात. सार्वजनिक मंडळांमध्येही बाप्पा येतात. दहा दिवस गणेश उत्सव चालतो.

हे वाचलं का?

गणेश उत्सव कधी आहे? काय आहे शुभ मुहूर्त?

२०२२ मध्ये गणेश उत्सव ३१ ऑगस्टला येतो आहे. गणपती हा ६४ कलांचा अधिपती आहे. तसंच गणपती बुद्धी, समृद्धीची देवता आहे. तसंच सगळ्या देवांमध्ये सर्वात आधी पूजेचा मान मिळतो तो गणपतीलाच. १० दिवस गणेश उत्सव चालतो. त्यानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशीला बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन केलं जातं. कृत्रीम तलाव, नदी, तलाव, समुद्रात गणपती बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन केलं जातं. भाद्रपद शुक्ल गणेश चतुर्थी ३० ऑगस्ट रोजी दुपारी ३:३४ वाजता सुरू होईल आणि ३१ ऑगस्ट रोजी दुपारी ३:२३ वाजता समाप्त होईल. ३१ ऑगस्ट रोजी दुपारी ३.३० वाजेपर्यंत गणपतीच्या मूर्तीच्या स्थापनेचा शुभ मुहूर्त आहे. यंदा गणेश चतुर्थी बुधवारी आहे आणि बुधवार हा दिवस श्री गणेशाला समर्पित असतो. त्यामुळे यंदाच्या गणेश चतुर्थीचे महत्त्व आणखी वाढले आहे.

गणेश पूजेचा मुहूर्त कधी आहे?

सकाळी ११.२४ ते दुपारी १ वाजून ५४ मिनिटं

गणेश विसर्जन कधी होणार?

९ सप्टेंबर २०२२ या दिवशी अनंत चतुर्दशी आहे. त्याच दिवशी बाप्पाला निरोप दिला जाईल

Ganesh Utsav 2022 : लाडक्या बाप्पाच्या प्रसादासाठी असे बनवा खव्याचे मोदक, खाणारेही म्हणतील वा वा!

गणेश चतुर्थीच्या दिवशी घरी बसवण्यात आलेल्या मूर्तीला काय अर्पण कराल?

गणेश चतुर्थीला घरी बसवण्यात आलेल्या बाप्पाच्या मूर्तीला दुर्वा वाहिला जातात. २१ दुर्वांची एक जुडी असते. अशा २१ जुड्यांची माळ गणपतीला घालण्याची प्रथा आहे. मोदक हे गणपतीला प्रिय आहेत. त्यामुळे या दिवशी मोदकांचा नैविद्य दाखवावा. याच दिवशी बाप्पाला शेंदूरही वाहिला जातो. तसंच पूजा करणाऱ्या प्रत्येकाने शेंदूर कपाळाला लावण्याचीही प्रथा आहे.

गणेश चतुर्थीचं महत्त्व काय आहे?

पौराणिक कथेनुसार, भगवान गणेशाची निर्मिती माता पार्वतीने चंदनाच्या लेपापासून केली होती. शक्तीची देवता असल्याने माता पार्वतीने श्री गणेशाला एवढे सामर्थ्य आणि शक्ती दिली की अनेक मोठ्या देवांनाही युद्धात गणेशाचा सामना करता आला नाही. अखेर भगवान शिवप्रभूंनी नकळतपणे श्री गणेशाचा शिरच्छेद केला.

माता पार्वतीला याबाबत समजलं तेव्हा त्यांचा क्रोध अनावर झाला. त्यांनी गणेशाला पुन्हा जिवंत करण्याची मागणी केली. त्यानंतर शिवप्रभूंनी हत्तीचं डोकं गणेशाच्या धडावर ठेवले आणि त्यामुळे गजमुखी श्रीगणेशाची निर्मिती झाली. गणेश चतुर्थीच्या या शुभ दिवशी भगवान शिवप्रभूंनी कोणत्याही देवाच्या पूजेआधी श्री गणेशाची पूजा केली जाईल असा आशीर्वाद दिला. त्यामुळे कोणत्याही देवाच्या आधी श्री गणेशाची पूजा केली जाते. ज्ञान आणि शक्तीचे प्रतीक म्हणून नेहमी श्री गणेशाची पूजा केली जाते.

    follow whatsapp