हॅप्पी हायपोक्सिया: कोरोनाच्या तरुण रुग्णांसाठी ठरतो सायलेंट किलर!

मुंबई तक

• 11:42 AM • 11 May 2021

मुंबई: मागील कोरोनाची (Corona) लाट आणि या वेळेस आलेली लाट यांच्यात खूप फरक दिसून आला आहे. यावेळी तरुण मोठ्या संख्येने कोरोनाला बळी पडत आहेत. यातही हॅप्पी हायपोक्सियाच्या रुग्णांमुळे डॉक्टरांच्या अडचणी वाढल्या आहेत. कोरोनाची कमी किंवा कोणतीही लक्षणे नसलेल्या तरुण रूग्णांमध्ये ऑक्सिजनची पातळी (Oxygen Level) अचानक कमी होत असल्याचं आढळून येत आहे आणि डॉक्टरांना काही समजेपर्यंत […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: मागील कोरोनाची (Corona) लाट आणि या वेळेस आलेली लाट यांच्यात खूप फरक दिसून आला आहे. यावेळी तरुण मोठ्या संख्येने कोरोनाला बळी पडत आहेत. यातही हॅप्पी हायपोक्सियाच्या रुग्णांमुळे डॉक्टरांच्या अडचणी वाढल्या आहेत. कोरोनाची कमी किंवा कोणतीही लक्षणे नसलेल्या तरुण रूग्णांमध्ये ऑक्सिजनची पातळी (Oxygen Level) अचानक कमी होत असल्याचं आढळून येत आहे आणि डॉक्टरांना काही समजेपर्यंत रुग्णाचा मृत्यू देखील होतो. याचं कारण मल्टीऑर्गन फेल्यूअर. त्यामुळेच हा धोकदायक ‘सायलेंट हायपोक्सिया’ किंवा ‘हॅप्पी हायपोक्सिया’ (Happy Hypoxia) म्हणजे काय? यापासून बचाव करण्याचा काही मार्ग आहे? चला जाणून घेऊयात याविषयी अगदी सविस्तरपणे.

हे वाचलं का?

सगळ्यात आधी जाणून घेऊयात हायपोक्सिया नेमकं आहे तरी काय?

कोरोना संसर्गानंतर, जगभरातील बर्‍याच रुग्णांमध्ये एक विशेष लक्षण दिसून आलं आहे. रूग्णाच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी खूप कमी होते. अगदी (70-80) पर्यंत. परंतु रुग्णाला श्वास घेण्यात कोणतीही अडचण येत नाही. रुग्ण पूर्णपणे सामान्य असतो. पण, रक्तातील ऑक्सिजनची पातळी सातत्याने कमी होत असल्याने ते रुग्णासाठी खूपच हानीकारक असतं. जगभरातील डॉक्टर या लक्षणाकडे गांभीर्याने पाहण्याचा सल्ला देत आहेत.

सोप्या भाषेत, रक्त आणि शरीराच्या पेशींमध्ये ऑक्सिजनची कमतरता असण्याला हायपोक्सिया असं म्हणतात. कधीकधी याचा परिणाम संपूर्ण शरीरावर किंवा शरीराच्या विशिष्ट भागावर होऊ शकतो.

अमेरिकन नॉन प्रॉफिट संघटनेच्या मायो क्लिनिकच्या म्हणण्यानुसार ‘शरीराच्या धमन्यांमध्ये सामान्य ऑक्सिजनची पातळी 75 ते 100 मिलीमीटर दरम्यान असते. सामान्य नाडीच्या ठोक्यावर ऑक्सिमीटरवर 95 आणि 100 दरम्यान असल्यास सामान्य मानलं जाते. जर ऑक्सिमीटरचं रिडिंग हे 90 च्या खाली असेल तर ते चिंताजनक मानले जाते. यानंतर, व्यक्तीला थकवा, गोंधळ, मानसिक त्रास होऊ लागतो. यामागचे कारण असे आहे की ऑक्सिजन संपूर्ण मेंदूपर्यंत पोहोचू शकत नाही. जेव्हा ऑक्सिजनची पातळी 80 च्या खाली येते तेव्हा शरीरातील इतर भाग जसे की मूत्रपिंड, हृदय, यकृत इत्यादींवर देखील परिणाम होऊ लागतो.

महाराष्ट्र कोरोनाने सावरतोय पण Black Fungus ने घेरलं, झपाट्याने वाढत आहेत रुग्ण

जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा रक्तासह ऑक्सिजन शरीराच्या प्रत्येक भागात पोहोचतो. ऑक्सिजन रक्तापर्यंत पोचविण्याचे काम हे फुफ्फुसातून सुरू होते. फुफ्फुसांवर असंख्य सूक्ष्म रक्तवाहिन्यांचे जाळे असते. जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा ऑक्सिजन फुफ्फुसांमध्ये जातो. हाच ऑक्सिजन या रक्तवाहिन्यांमध्ये विशेष प्रक्रियेद्वारे शोषून घेतला जातो. त्यानंतर, ऑक्सिजन रक्तासह शरीराच्या प्रत्येक भागात पोहोचतो.

कोरोनाचा संसर्गामुळे फुफ्फुसांवर प्रतिकूल परिणाम होतो आणि भरपूर प्रमाणात ऑक्सिजन रक्तामध्ये पोहचत नाही. याचवेळी ऑक्सिजनच्या अभावामुळे शरीरातील इतर अवयव काम करणं थांबवतात. हायपोक्सियाची अवस्था बहुधा गिर्यारोहकांमध्ये दिसून येते. उंचीवर कमी ऑक्सिजनमुळे ही परिस्थिती उद्भवते. पण, हॅप्पी हायपोक्सिया असलेल्या कोरोना रूग्णांची स्थिती गिर्यारोहकांपेक्षा वेगळी आहे. त्यांना श्वास घेतानाही कोणतीही समस्या जाणवत नाही.

एम्समधील रुग्णांवर उपचार करत असलेल्या डॉक्टरांचं असंही म्हणणं आहे की, आपत्कालीन वॉर्डमध्ये ज्या रुग्णांची ऑक्सिजन पातळी 70 ते 80 च्या दरम्यान आहे ते रुग्णही खूप गंभीर असल्याचं दिसून येतं. पण हॅप्पी हायपोक्सियाच्या रूग्णाची ऑक्सिजन पातळी 50 असली तरी तो आरामात बसलेला आणि मोबाइल फोनवर बोलत असलेला असा रिलॅक्स अवस्थेत असल्याचं पाहायला मिळतं. अशा रुग्णांना श्वास घेण्यास कोणताही त्रास होत नाही. पण त्यांचे अवयव निकामी होण्याची एक धोकादायक स्थिती तयार होते. याला त एक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम (Acute Respiratory Distress Syndrome) किंवा एआरडीएस (ARDS) म्हणतात.

WHO च्या डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी भारतातल्या कोरोनाबाबत काय म्हटलं आहे?

तरुणांमध्येच असं का होतं?

यावर अद्याप सखोल संशोधन सुरू आहे. परंतु आतापर्यंत तरुणांमध्येच मोठ्या प्रमाणात हॅप्पी हायपोक्सिया असल्याचं दिसून आलं आहे.

  • तरुणांची प्रतिकार शक्ती चांगली असते. त्यांची ऊर्जा इतरांपेक्षा देखील अधिक असते. यामुळे वृद्धांपेक्षा त्यांची सहन करण्याची क्षमता जास्त आहे. जर वय जास्त असेल तर ऑक्सिजन पातळी 94% ते 90% मध्ये असेल तरी त्रास वाटू लागतो. याउलट, तरुणांमध्ये ऑक्सिजन पातळी 80 टक्के असली तरीही त्यांना लक्षणं जाणवत नाही. ते काही प्रमाणात हायपोक्सिया सहन करतात.

  • कोरोना 85% लोकांमध्ये सौम्य, 15% मध्ये मध्यम आणि 2% लोकांमध्ये गंभीर स्वरुपाचा असल्याचे आतापर्यंत दिसून आलेलं आहे. बहुतेक सौम्य लक्षणे तरुण लोकांमध्ये दिसतात. म्हणूनच ते रुग्णालयात दाखल होण्यास उशीर करतात. कारण त्यांना कोणतीही लक्षण जाणवत नाहीत.

AB आणि B हे ब्लड ग्रुप असणाऱ्यांना कोरोनाचा धोका अधिक, CSIR चा रिपोर्ट

अशा परिस्थितीत नेमकं काय करायचं?

वरिष्ठ डॉक्टर अनिल बंसल यांच्या म्हणण्यानुसार ‘कोरोना रूग्णाने दिवसातून अनेकदा आपल्या ऑक्सिजनची पातळी ही ऑक्सिमीटरवर तपासली पाहिजे. हॅप्पी हायपोक्सियामध्ये ओठांचा रंग बदलू लागतो. ते हलके निळे रंगाचे होतात. तर त्यांची त्वचा लाल किंवा जांभळा रंगाची होऊ लागते. सतत घाम येतो. ही सगळी रक्तातील ऑक्सिजन कमी होण्याची लक्षणे आहेत. या लक्षणांवर लक्ष ठेवून आवश्यकता भासल्यास त्वरित रुग्णालयात दाखल व्हावे.’

कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून रुग्णांवर सतत उपचार करणारे डॉक्टर विपिन वसिष्ठ म्हणतात, ‘कोरोना रुग्णाने दिवसातून बर्‍याच वेळा ऑक्सिजनची पातळी तपासली पाहिजे. बरेचदा तरूण आणि कमी लक्षणे असलेले लोक असे करत नाहीत. ऑक्सिजन पातळी 94 टक्क्यांपेक्षा कमी असणं ही धोक्याची पातळी आहे. तरुणांमध्ये क मी ऑक्सिजन पातळी असली तरी त्यांना कोणताही त्रास जाणवत नाही. पण यावेळी हॅप्पी हायपोक्सियाची स्थिती उद्भवू शकते. उदाहरणार्थ, काही रुग्ण डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय ओरल स्टेरॉइड्स घेण्यास सुरुवात करतात. अशा परिस्थितीत शरीराची नैसर्गिक प्रतिक्रिया कमी होते. आपल्याला सावध करण्यासाठी आपलं शरीर जी लक्षणे देत असतो ती लक्षणं आपण चुकीच्या औषधांच्या प्रभावामुळे आपण ओळखू शकत नाही.’

सर्व तज्ज्ञ आणि डॉक्टर एकमत आहेत की, कमी किंवा मध्यम लक्षणं असणाऱ्या कोरोना रूग्णांनी देखील शक्य तेवढं सतर्क असणे आवश्यक आहे. आपण जोपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह आहाता तोपर्यंत ऑक्सिमीटरने ऑक्सिजन पातळी सतत तपासत रहा. याशिवाय डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणतेही औषध घेणे टाळा. (Happy Hypoxia Silent killer of young corona patients)

    follow whatsapp