मान्सून माघारी परतल्यानंतर देशातील काही राज्यांना अवकाळी पाऊस झोडपून काढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून तामिळनाडूत पावसाने कहर केला असून, पुन्हा एकदा 21 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना यलो अलर्टचा इशारा देण्यात आला असून, नोव्हेंबर अखेरीस (29 व 30 नोव्हेंबर) काही जिल्ह्यांत वादळी वारे आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
तामिळनाडूबरोबर राज्यातील काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागातील वरिष्ठ वैज्ञानिक के.एस. होसाळीकर यांनी ट्वीट करून राज्यात 29 व 30 नोव्हेंबर रोजीच्या हवामानाची माहिती दिली.
कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याचा परिणाम राज्यातील कोकण किनारपट्टी आणि शेजारील जिल्ह्यांमध्ये दिसून येणार आहे. 29 नोव्हेंबर रोजी राज्यातील पुण्यासह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या जिल्ह्यांना यलो अलर्टही देण्यात आला आहे.
30 नोव्हेंबर रोजी राज्यातील पावसाची व्याप्ती वाढणार आहे. ठाणे, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत पाऊस होणार असल्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह आणि जोरदार वारे वाहणार असून, काही ठिकाणमी हलका पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
तामिळनाडू : 21 जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना सुटी
चेन्नईसह तामिळनाडूतील 21 जिल्ह्यांत 26 ते 29 नोव्हेंबर या कालावधीत अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज असून, हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. चेन्नईत गुरुवारीही संततधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे शाळा सुटी देण्यात आली. त्याचबरोबर हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर शुक्रवारी शाळा-महाविद्यालये बंदच ठेवण्यात आली.
तामिळनाडूबरोबरच पूर्व किनारपट्टीच्या प्रभाव क्षेत्रात येणाऱ्या आंध्र प्रदेश, यणम, रायलसीमा, दक्षिण कर्नाटक, केरळ, पुद्दुचेरीमध्येही मध्यम ते हलका पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे.
ADVERTISEMENT