प्रवीण ठाकरे, नाशिक प्रतिनिधी
ADVERTISEMENT
उत्तर प्रदेशात गाजत असलेल्या लव्ह जिहादचं लोण आता महाराष्ट्रात येऊन पोहचलं आहे. नाशिकमध्ये हिंदु मुलगी आणि मुसलमान मुलाचा होणारा विवाह लव्ह जिहादचं कारण देऊन रद्द करण्यात आला आहे. १८ तारखेला होणाऱ्या या विवाहसोहळ्याची आमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर स्थानिक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी या प्रकरणी हस्तक्षेप करत हा विवाह सोहळा रद्द केला आहे.
या विवाह सोहळ्याची आमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होऊन त्याला लव्ह जिहादचं रुप देण्यात आलं. ज्यामुळे मुलीच्या घरच्यांना याचा चांगलाच त्रास सहन करावा लागला. परस्पर सहमतीने या लग्नाचा निर्णय घेतल्यानंतरही अशा पद्धतीने त्रास झाल्यामुळे मुलीच्या घरच्यांनी हा विवाह सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे पुरोगामी राज्याचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात परस्पर सहमतीने होणारा आंतरधर्मीय विवाह सोहळा रद्द करण्यात आल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
नाशिक येथे राहणाऱ्या प्रसाद आडगावकर यांची २८ वर्षीय दिव्यांग मुलीचा विवाह तिच्यासोबतच शिकणाऱ्या मुस्लीम तरुणाशी ठरला होता. दोन्ही परिवाराची या विवाह सोहळ्याला परवानगी होती. तसेच या प्रकरणात कोणताही धर्म परिवर्तनाचा दबाव नव्हता. दोघेही परिवार लग्नासाठी तयार असल्यामुळे १८ तारखेला हा विवाह सोहळा ठरवण्यात आला.
मे महिन्यात या दोघांचाही कोर्टात नोंदणीकृत विवाह झाला होता. परंतू मुलीच्या घरच्यांना आपल्या मुलीचा विवाह हा रिती-रिवाजानुसार करायचा होता. परंतू या लग्नाची आमंत्रण पत्रिका समोर आल्यानंतर सोशल मीडियावर लव्ह जिहादचा मुद्दा चांगलाच गाजायला सुरुवात झाली.
सोशल मीडियावर या लग्नाला विरोध व्हायला सुरुवात झाल्यानंतरही मुलीचे वडील आपल्या भूमिकेवर ठाम होते. “माझी मुलगी दिव्यांग असल्यामुळे तिला लग्नासाठी योग्य उमेदवार मिळत नव्हता. माझ्या समाजात ही गोष्ट सर्वांना माहिती होती. मुलीने तिचा मित्र असलेल्या आसिफ खानसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. या प्रकरणात कोणावरही धर्मांतराचा दबाव नव्हता. त्यामुळे दोन्ही परिवारांच्या सहमतीने हा विवाहसोहळा निश्चीत करण्यात आला होता.” मुलीचे वडील प्रसाद आडगावकर यांनी माहिती दिली.
परंतू सोशल मीडियावर या विवाह सोहळ्याची माहिती व्हायरल झाल्यामुळे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी लव्ह जिहादचा मुद्दा उपस्थित केला. हा प्रकार आताच थांबला नाही तर भविष्यात असे प्रकार वाढत जातील अशा आशयाच्या पोस्ट काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी फेसबूकवर लिहायला सुरुवात केली. यानंतर वाढता दबाव लक्षात घेता मुलीच्या वडीलांनी हा विवाह सोहळा रद्द केला आहे. त्यानंतर मुलीच्या वडीलांना सुवर्णकार संस्थेला पत्र लिहून हा विवाहसोहळा रद्द करत असल्याची हमी द्यावी लागली आहे. त्यामुळे परस्पर सहमतीने ठरवण्यात आलेलं लग्न दबावामुळे रद्द झाल्यामुळे चर्चेला सुरुवात झाली आहे.
ADVERTISEMENT