होळीच्या सणानिमित्त सगळीकडे हर्षोल्हासित वातावरण असून, दरवर्षी मोठ्या उत्साहाने हा सण साजरा केला जातो. फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन केलं जातं. पौराणिक कथांमध्ये या सणाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे जाणून घेऊया होलिका दहनाच्या मुहूर्तापासून ते इतिहासापर्यंत सर्वकाही…
ADVERTISEMENT
होलिका दहनाचा शुभ मुहूर्त कोणता?
आज (१७ मार्च) होलिका दहन केलं जाणार आहे. यावर्षी होलिका दहनासाठी यंदा फक्त तासभरच शुभ मुहूर्त आहे. रात्री ९ वाजून १६ मिनिटांपासून ते १० वाजून १६ मिनिटांपर्यंत होलिका दहनासाठी शुभ मुहूर्त आहे. त्यानंतर उद्या धुळवड खेळली जाईल. दरम्यान, पौर्णिमा १७ मार्च रोजी रात्री १ वाजून २९ पासून सुरू झाली असून, १८ मार्च रोजी रात्री १२ वाजून ४७ मिनिटांपर्यंत असेल.
होलिका दहन पूजा साहित्य
एक वाटी पाणी, गाईच्या शेणापासून बनवलेल्या गोवऱ्या, अक्षदा, अगरबत्ती आणि धूप, फुलं, कच्चा सुती धागा, हळकुंडाचा तुकडा, मूगाची डाळ, गुलाल, नारळ आणि या हंगामातील नवं धान्य.
होळीची पूजा कशी करायची?
सर्व साहित्य एका ताटात घ्यावं. त्यानंतर ज्या ठिकाणी होळीची पूजा करायची आहे, ते ठिकाणी स्वच्छ करून घ्यावं. पूजा करताना उत्तर अथवा पूर्व दिशेला तोंड करून बसावं. गाईच्या गोवऱ्यांची होळी रचावी आणि प्रल्हादाची मूर्ती तयार करावी. त्यानंतर पूजेच्या ताटातील सर्व साहित्य होळीला वाहावं. त्यामध्ये मिठाई आणि फळांचाही नेवैद्य ठेवावा. नंतर नरसिंहाची पूजा करून शेवटी होळीला सात फेरे मारावे.
होळीची पौराणिक कथा काय?
राक्षसकुळात हिरण्यकश्यपू नावाचा राक्षस होता. तो स्वत:ला श्रेष्ठ समजायचा. देवांविषयी त्याला तिरस्कार होता. या हिरण्यकश्यपूला प्रल्हाद नावाचा मुलगा होता. (ज्याला भक्त प्रल्हाद म्हणून ओळखलं जातं). प्रल्हाद बालपणापासूनच विष्णूचा परमभक्त होता. प्रल्हाद नेहमी भगवान विष्णूचं नामस्मरण करायचा.
प्रल्हाद भगवान विष्णूचं नामस्मरण करतो हे हिरण्यकश्यपूला मान्य नव्हतं. त्यामुळे त्याने प्रल्हादाला यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्येकवेळी हिरण्यकश्यपूला अपयश आलं. अखेरीस हिरण्यकश्यपूने आपल्याच मुलगा असलेल्या प्रल्हादाला मारण्याचा निर्णय घेतला.
यासाठी हिरण्यकश्यपूने त्याच्या बहिणीची मदत घेतली. तिच नाव होलिका. ती राक्षसीप्रवृत्तीची आणि क्रूर होती. तिला अग्नीचे भय नव्हते. वरदान असल्याने तिला आगीमुळे काहीच होऊ शकत नव्हतं. हिरण्यकश्यपूने लाकडाची चिता रचली. त्यावर होलिकेला बसवलं आणि तिच्या मांडीवर प्रल्हादाला दिलं.
भक्त प्रल्हादाच्या नारायण भक्तीमुळे मात्र उलटंच घडलं. त्या आगीत होलिका जळून खाक झाली आणि विष्णू भक्त असल्यामुळे प्रल्हादाला काहीही झालं नाही. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून नृसिंह रूपाने हिरण्यकश्यपूचा वध केला. होलिकेचा जळून अंत झाला तो दिवस फाल्गुन शुद्ध पौर्णिमेचा होता. त्यामुळेच दरवर्षी या दिवशी होळी साजरी केली जाते.
ADVERTISEMENT