नागपूर: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा पुतण्या तन्मय फडणवीस याने वयाची 45 वर्ष पूर्ण नसताना सुद्धा नागपुरातील कॅन्सर नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट येथे कोरोना प्रतिबंधक लस (Corona Vaccine) घेतली. यावेळचे फोटो त्याने इंस्टाग्राम आणि फेसबुकवर शेअर देखील केले आहेत. पण आता या संपूर्ण प्रकरणाला राजकीय वळण मिळालं आहे. ज्यानंतर तन्मयचे वडील अभिजीत फडणवीस (Abhijeet Fadnavis) यांनी ‘मुंबई तक’ला आपली प्रतिक्रिया दिली आहे.
ADVERTISEMENT
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर ‘मुंबई तक’ने नागपूरच्या नॅशनल कँसर इन्स्टिट्यूटचे CEO शैलेश जोगळेकर यांच्यासोबत वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो होऊ शकला नाही. परंतु तन्मय फडणवीसचे वडील अभिजीत फडणवीस (देवेंद्र फडणवीस यांचे चुलत बंधू) यांनी ‘मुंबई तक’ला फोनवर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते असं म्हणाले की, ‘मीडियाने तपास करावा की तन्मयने का लस घेतली?’ पण याबाबत त्यांनी इतर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
नेमकं प्रकरण काय?
तन्मय फडणवीस हा देवेंद्र फडणवीस यांच्या काकू म्हणजेच शोभा फडणवीस यांचा नातू आहे. तन्मयने लस घेतानाचा फोटो सोशल मीडियावर टाकताच देवेंद्र फडणवीस ट्रोल होऊ लागले. काँग्रेस पक्षाने त्यावर सोशल मीडियातून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
पुतण्या तन्मयने लस घेतल्याने काका देवेंद्र फडणवीस सोशल मीडियावर ट्रोल
काँग्रेसने काय प्रश्न विचारले आहेत?
-
तन्मय फडणवीस 45 वर्षांपेक्षा मोठा आहे का?
-
फ्रंटलाईन वर्कर आहे का?
-
आरोग्य कर्मचारी आहे का?
-
जर नसेल तर त्याला लस कशी काय दिली गेली?
-
भाजपकडे रेमडेसिवीरप्रमाणेच लसींचाही गुप्त साठा आहे का?
‘BIG News 1 मे पासून 18 वर्षांवरील सगळ्यांना कोरोना प्रतिबंधक लस घेता येणार’
नेमकं काय घडलं?
तन्मय फडणवीस यांचा लसीकरण करतानाचा फोटो हा त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर पोस्ट केला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना नेटकऱ्यांनी आणि काँग्रेस पक्षाने ट्विटर, फेसबुकवर चांगलेच ट्रोल केले. माजी मुख्यमंत्री यांच्या पुतण्याला जर सगळे नियम शिथील आहेत. मग नागपूर कॅन्सर इन्सस्टि्युटने 18 वर्षांवरील सगळ्यांचे लसीकरण करावे अशी मागणी होऊ लागली आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर तन्मय फडणवीस यांनी त्यांचे फोटो सोशल मीडियावरून डिलिट केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार तन्मय फडणवीस यांचं वय हे अंदाजे 22 ते 25 वर्षे असल्याची माहिती आहे. केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशांनुसार सध्या देशात 45 वर्षे आणि त्यापुढील नागरिकांना लस देण्यात येते आहे. अशात तन्मय फडणवीस यांनी लस कशी घेतली हा प्रश्न विचारला जातो आहे.
नागपूरच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट येथे देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे असलेले शैलेश जोगळेकर हे संचालक मंडळावर आहेत. त्यामुळे तर ही लस तन्मय फडणवीस यांना सहज मिळाली का? अशाही चर्चा रंगू लागल्या आहेत.
ADVERTISEMENT