बारामती: पुणे (Pune) जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यात दौंडज परिसरात रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीसाठी केलेल्या खोदकामामुळे रेल्वे (Railway) रुळाचा भराव खचला. मात्र, देखरेख करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे रेल्वेचा मोठा अपघात टळला.
ADVERTISEMENT
दौंडज ते जेजुरीदरम्यान रेल्वे स्टेशनजवळ एका ठिकाणी पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी लोहमार्गाखाली खोदकाम करुन सिमेंटचे पाईप बसविण्यात आले होते. या रेल्वे लाईनवरुन रेल्वे कर्मचारी विनायक पाटील हे लोहमार्गाची तपासणी करीत जात असताना दौंडज रेल्वे स्थानकानजिक लोहमार्गाखालील मातीचा भराव खचल्याचे त्यांच्या लक्षात आले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी तात्काळ दौंडज स्थानक प्रमुखास संपूर्ण प्रकार कळविला. त्यानंतर वेगाने सूत्र फिरली आणि या मार्गावरील रेल्वे वाहतूक तात्काळ थांबविण्यात आली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे.
रेल्वेमार्गाच्या रूंदीकरणा दरम्यान जुनी पाइपलाइन तोडून त्याठिकाणी सिमेंटचे पाईप टाकून बुजविण्यात आले होते. मात्र, काल (9 एप्रिल) सकाळी साडेअकरा वाजता रेल्वे कर्मचारी विनायक पाटील हे रेल्वे रूळाची तपासणी करीत असताना त्यांना रुळाखालील भराव खचल्याचे दिसून आले. त्यांनी हा प्रकार दौंडज रेल्वे स्थानकप्रमुख यांच्या निदर्शनास आणून दिला.
जिवाची बाजी लावून रूळावरच्या मुलाचे प्राण वाचवणाऱ्या मयुर शेळकेंचा रेल्वे मंत्रालयाकडून सन्मान
रेल्वेच्या घोरपडी विभागाचे वरिष्ठ विभागीय अभियंता विजय कापगते यांना याबाबत माहिती देण्यात आली. दरम्यान कापगते यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन तेथील नेमकी परिस्थिती काय आहे हे जाणून घेतलं. त्यानंतर दोन्ही बाजूने येणाऱ्या रेल्वे गाड्या वाल्हे व जेजुरी स्थानकामध्ये थांबविण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक दिवसभर बंद ठेवण्यात आली होती.
त्यानंतर युद्धपातळीवर पोकलेन, जेसीबी व कामगारांच्या मदतीने घटनास्थळावरील लोहमार्गाखालील जी बाजू खचली होती तिथं भराव करुन मजबुतीकरण करण्यात आलं. अखेर अथक प्रयत्नांनंतर सायंकाळी सव्वा पाच वाजता या मार्गावरुन मुंबईकडे जाणारी पहिली प्रवासी रेल्वे गाडी मार्गस्थ करण्यात आली. मात्र, वेळीच भराव खचल्याची बाब लक्षात आली नसती तर होता अपघात घडण्याची दाट शक्यता होती. पण रेल्वे कर्मचारी विनायक पाटील यांनी दाखवलेली समयसूचकता ही खूपच महत्त्वाची ठरली ज्यामुळे आज शकडो प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. त्यामुळे विनायक पाटील यांचं सध्या बरंच कौतुक केलं जात आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मयूर शेळके या रेल्वे कर्मचाऱ्याने आपल्या प्राणांची बाजी लावत एका चिमुकल्याचा जीव वाचवला होता. त्यामुळे रेल्वे कर्मचारी हे सतत जागरुक असल्याचं त्यावेळी देखील पाहायला मिळालं होतं.
ADVERTISEMENT