महापुरूषांना जात नसते, म्हणूनच त्यांच्या जयंत्या सर्व जातींनी एकत्र येवून साजऱ्या केल्या पाहिजेत, अशी संकल्पना महात्मा फुले यांच्या जयंती दिनी मांडण्यात आली होती. परभणी जिल्ह्यातील गंगाखेडच्या संत सावता माळी मंदिरात ही संकल्पना आज प्रत्यक्षात राबवण्यात आली. साईसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंद यादव व त्यांच्या कुटुंबियांनी याकामात पुढाकार घेत, द्वादशीची पंगत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि महावीर जयंती हे तिन्ही प्रसंग एकाच छताखाली आयोजित केले.
ADVERTISEMENT
गंगाखेड येथील श्री संत सावता माळी मंदिरात यादव कुटुंबियांच्या वतीने प्रतिवर्षी द्वादशी निमित्त भोजन पंगत केली जाते. यावर्षी द्वादशीच्या दिवशीच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व भगवान महावीर यांच्या जयंतीचा योग जुळून आला आहे. यादव कुटुंबियांनी हे तीन्ही ऊपक्रम एकाच छताखाली साजरे करण्याचा निर्धार केला. येथील संत सावता माळी मंदिरात सकाळी आठ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान महावीर यांच्या प्रतिमांचे पुजन करण्यात आले. त्यांच्या अभिवादनानंतर लगेचच द्वादशी पंगत सुरू करण्यात आली. यावेळी ‘बोला पुंडलीका’ च्या गजरासह डॉ आंबेडकर व भगवान महावीर यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. महापुरूषांचे विचार आणि त्यांच्या चारीत्र्यावर प्रकाश टाकणारी मनोगते व्यक्त करण्यात आली.
महामानवाला यथार्थ आदरांजली, 2 हजार 51 वह्यांनी साकारलं सिम्बॉल ऑफ नॉलेज
गंगाखेड बाजार समितीचे माजी सभापती बाळकाका चौधरी आणि शहरातील इतर मान्यवरांनी या कार्यक्रमाला ऊपस्थिती लावली होती. या कार्यक्रमानंतर दुपारी दोन वाजेपर्यंत द्वादशी पंगत सुरू होती. या अनोख्या उपक्रमाची गंगाखेडमध्ये दिवसभर चर्चा सुरु होती.
ADVERTISEMENT