मी भ्रष्टाचार केलेला नाही, दोन मुलं काम करतात आणि माझी पत्नी शिक्षण संस्था सांभाळते. मी भ्रष्टाचार केल्याचं सिद्ध झालं तर राजकारणातून संन्यास घेईन असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केलं आहे. आचारा येथील जनआशीर्वाद यात्रेत नारायण राणेंनी केलं आहे. नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सध्या चांगलीच गाजते आहे. मंगळवारी संध्याकाळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर नारायण राणेंच्या विरोधात बुधवारी राज्यभरात शिवसेनेची आंदोलनं पाहण्यास मिळाली.
ADVERTISEMENT
बुधवारीच नारायण राणेंना अटकही करण्यात आली. त्याच रात्री जामिनावर त्यांची सुटकाही करण्यात आली. जनआशीर्वाद यात्रेत दोन दिवसांचा खंड पडला होता. ती आता शुक्रवारपासून पुन्हा सुरू झाली आहे. या यात्रेत नारायण राणे उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर सातत्याने टीका करत आहेत. आता आज त्यांनी मी भ्रष्टाचार केल्याचं सिद्ध झालं तर राजकारणातून संन्यास घेईन असं वक्तव्य केलं आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे हे त्यांच्या कारकिर्दीच्या सुरूवातीपासूनच आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. नारायण राणे 39 वर्षे शिवसेनेत होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये आणि त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला. आता त्यांना जुलै महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाली. यानंतर नारायण राणे हे जनआशीर्वाद यात्रेसाठी महाराष्ट्रात आले आहेत. महाराष्ट्रात भारती पवार, रावसाहेब दानवे, भागवत कराड यांच्याही जनआशीर्वाद यात्रा सुरू आहेत. मात्र नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेइतकी कुणाचीच जन आशीर्वाद यात्रा चर्चेत नाही.
Narayan Rane यांनी कुंडल्या काढल्या तर आम्ही संदूक उघडू, संजय राऊत यांचं प्रत्युत्तर
दररोज नारायण राणे विरूद्ध शिवसेना आणि उद्धव ठाकरे असा सामना आणि शाब्दिक प्रहार पाहण्यास मिळत आहेत. या सगळ्याला शिवसेनेकडूनही उत्तर देण्यात येतं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजच नारायण राणेंवर टीका केली. माझ्याकडे सगळ्यांच्या कुंडल्या आहेत असं वक्तव्य नारायण राणेंनी केलं होतं.
तसंच अटकनाट्यानंतर जी पत्रकार परिषद नारायण राणेंनी घेतली त्यातही मी सगळ्यांना पुरून उरलो आहे असं वक्तव्य नारायण राणेंनी केलं होतं. मात्र नारायण राणेंमुळे भाजप दहा पावलं मागे गेला आहे आणि त्यांच्याकडे कुंडल्या असल्या तर हरकत नाही आम्ही संदूक उघडली तर त्यांना पळता भुई थोडी होईल असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिलं आहे. आता आज भ्रष्टाचाराबद्दल राणे बोलले आहेत. राजकीय संन्यास घेण्याचीही भाषा त्यांनी केली आहे. यावर आता शिवसेना काय प्रतिक्रिया देणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT