शिवसेना आणि भाजप यांच्यातली युती तुटल्यानंतर मनसेच्या रुपात भाजपला नवा जोडीदार मिळणार का अशा चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरु आहेत. मध्यंतरी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर चर्चांना उधाण आलं होतं. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या पंचायत समिती निवडणुकांमध्ये पालघरमध्ये काही जागांवर मनसे-भाजप युती झाली होती. त्यातच आज मनसेचे माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यामुळे पुन्हा चर्चांना सुरुवात झाली आहे.
ADVERTISEMENT
आपली आजची भेट ही व्यक्तिगत स्वरुपाची असली तरीही एखादी चांगली सुरुवात होणार असेल तर त्यात काय हरकत आहे? अशी प्रतिक्रीया बाळा नांदगावकर यांनी मुंबई तक शी बोलताना दिली. “मी माझ्या काही कामांसाठी फडणवीसांची वेळ मागितली होती. दोन राजकीय नेते हे एकत्र आल्यानंतर चर्चा होतातच. आमचीही काही विषयांवर चर्चा झाली. यापुढेही होईल. आज आम्ही साडेबारा वाजता भेटणार होतो. परंतू त्यांना काही कामानिमीत्त नवी मुंबईला जावं लागल्यामुळे ही भेट उशीरा झाली”, असं नांदगावकर म्हणाले.
“दोन राजकीय नेत्यांची भेट झाल्यानंतर राजकीय विषयावर चर्चा ही होणारच. यात वावगं काही नाही हे चांगलंच आहे. आजची माझी भेट ही व्यक्तिगत होती. माझ्या भेटीवेळी त्यांच्या कोअर कमिटीची बैठक असल्यामुळे तुम्हाला चर्चेला विषय मिळाला आहे. एखादी चांगली घटना घडत असेल किंवा सुरुवात होत असेल तर त्यात वाईट काहीच नाही. या भेटींचं स्वागत व्हायलाच हवं.”
भविष्यात भाजप-मनसे युतीबद्दल पक्षनेतृत्वच निर्णय घेईल. मध्यंतरी पुण्यात मनसे कार्यकर्त्यांकडून भाजपसोबत युती व्हावी अशी मागणी झाली होती. याबद्दल राज ठाकरे विचार करतील असंही बाळा नांदगावकर म्हणाले. भविष्यात राज ठाकरे आणि फडणवीस यांची भेट होणार का असा प्रश्न विचारला असता नांदगावकर यांनी, भेट होईल की नाही हे मला सांगता येणार नाही पण झालीच तर त्यातून काही चांगली सुरुवात होणार असेल हरकत काय आहे असं उत्तर दिलं. त्यामुळे आगामी काळात यासंबंधी काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT