भाजपचे दोन मंत्री फक्त खिशात कात्री घेऊन फिरतात, इम्तियाज जलील यांचा रोख कुणाकडे?

मुंबई तक

• 01:28 PM • 30 Aug 2022

औरंगाबाद: औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी जिल्ह्यातील दोन मंत्र्यांवर टीका केली आहे. हे दोन मंत्री खिशात कात्री घेऊन फिरतात आणि उद्घाटन कार्यक्रम दिसला की रिबिन कापतात, भाषण करतात त्यांना एवढंच काम असल्याची खोचक टीका खा. जलील यांनी केली आहे. जलील यांनी आज औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेतली. खा. जलील यांनी नाव घेतलेले भाजपचे दोन मंत्री म्हणजेच […]

Mumbaitak
follow google news

औरंगाबाद: औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी जिल्ह्यातील दोन मंत्र्यांवर टीका केली आहे. हे दोन मंत्री खिशात कात्री घेऊन फिरतात आणि उद्घाटन कार्यक्रम दिसला की रिबिन कापतात, भाषण करतात त्यांना एवढंच काम असल्याची खोचक टीका खा. जलील यांनी केली आहे. जलील यांनी आज औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेतली. खा. जलील यांनी नाव घेतलेले भाजपचे दोन मंत्री म्हणजेच केंद्रीय अर्थ राज्य मंत्री भागवत कराड आणि रावसाहेब दानवे आहेत.

हे वाचलं का?

भाजपच्या दोन मंत्र्यांबद्दल काय म्हणाले इम्तियाज जलील?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अल्पसंख्यांकांसाठी घोषित केलेल्या योजना फक्त कागदावर आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात त्याचा लाभ कुणाला मिळालाय, याचा पत्ता नाहीये. या योजनांची येथे अंमलबजावणी होतेय की नाही, हे कुणालाच माहिती नाही. मग भाजपाचे हे मंत्री काय करत आहेत? असा प्रश्न खा. जलील यांनी विचारला आहे.

पुढे ते म्हणाले ”भाजपचे हे मंत्री योजनांची अंमलबजावणी करत नाहीत. फक्त खिशात कात्री घेऊन फिरतात. कुठे उद्घाटनाचा कार्यक्रम दिसला की लगेच रिबिन कापतात, भाषण करतात. मी म्हणतो तुम्ही भाषणं करा काही अडचण नाहीये, फक्त या योजनांची अंमलबजावणी होतीये की नाही याची चौकशी करा. पंतप्रधानांनी दिल्लीतून एखादी योजना जाहीर केली तर ती इथे राबवली गेलीच पाहिजे. जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा बैठक घेतली पाहिजे. ते बिझी असतील तर दुसऱ्या अधिकाऱ्यांनी बैठक घेतली पाहिजे” अशी इच्छा जलील यांनी व्यक्त केली.

अल्पसंख्यांकांच्या योजना फक्त कागदावरच

खा. जलील यांनी बोलताना आणखी एक गंभीर आरोप केला आहे. ”पंतप्रधान नरेंद्र मोदी योजना जाहीर करतात, त्याची जाहिरात करतात परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही. अल्पसंख्यांकांमध्ये मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, पारशी आणि जैन समाजाचे लोक येतात. अल्पसंख्यांकांसाठी पंतप्रधानांनी १५ सुत्री कार्यक्रम हाती घेतलेला आहे. दर तीन महिन्यांनी या योजनांचा आढावा घेतला पाहिजे.

मात्र औरंगाबादध्ये चार वर्षानंतर बैठक झाली, अजून समिती नाहीये. अधिकाऱ्यांजवळ आकडेवारी नाही. या योजनांचा लाभ कुणाला मिळाला याची माहिती कोणालाच नाही. मोदीजी तुम्ही एखादी योजना आणता परंतु त्याचा लाभ कोणाला मिळतो? असा सवाल यावेळी जलील यांनी विचारला.

    follow whatsapp