अंबानींच्या घराजवळील संशयित कारबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर

मुंबई तक

• 02:39 AM • 26 Feb 2021

मुंबई: प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटेलिया या निवासस्थानाबाहेर एक कारमध्ये जिलेटिनच्या तब्बल 20 कांड्या सापडल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. पण याबाबत आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे संशयित स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटिनच्या कांड्यांसोबत अनेक नंबर प्लेट देखील मिळाल्या आहेत. यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यातील काही नंबर प्लेट या मुकेश […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटेलिया या निवासस्थानाबाहेर एक कारमध्ये जिलेटिनच्या तब्बल 20 कांड्या सापडल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. पण याबाबत आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे संशयित स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटिनच्या कांड्यांसोबत अनेक नंबर प्लेट देखील मिळाल्या आहेत. यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यातील काही नंबर प्लेट या मुकेश अंबानी यांच्या सुरक्षा ताफ्यात असणाऱ्या गाड्यांशी मिळत्या-जुळत्या आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाचं गांभीर्य आणखी वाढलं आहे. त्यामुळे आता मुंबई पोलीस आणि एटीएस याप्रकरणी दहशतवादाच्या अँगलने तपासणी करत आहे.

हे वाचलं का?

अँटेलियासमोर एक कार संशयित पद्धतीने पार्क केल्याची माहिती जेव्हा मुंबई पोलिसांना मिळाली तेव्हा त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी डॉग स्क्वॉड, बॉम्बनाशक पथक यांना देखील पाचारण करण्यात आलं होतं. याचवेळी संशयित कारमधून जिलेटीनच्या कांड्या आणि काही नंबर प्लेट सापडल्या होत्या. अनेक नंबर प्लेट या कारमधून सापडल्याने सुरक्षा एजन्सींमध्ये देखील खळबळ माजली आहे.

दरम्यान, कारमध्ये फक्त जिलेटिनच्या कांड्याच सापडल्या होत्या. त्यामध्ये डिटोनेटर किंवा स्फोट घडवून आणणारे इतर साहित्य अद्याप सापडलेलं नाही. त्यामुळे फक्त जिलेटनची कांड्या ठेवणाऱ्यांचा नेमका हेतू काय होता याबाबत अद्याप काहीही माहिती मिळू शकलेली नाही.

तपास अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीनंतर आता असा खुलासा करण्यात आला आहे की, बुधवारी रात्री 1 वाजेच्या सुमारास ही स्कॉर्पियो कार अँटेलियाच्या बाहेरील बाजूस उभी करण्यात आली होती. यावेळी या कारसोबत एक इनोव्हा कार देखील होती. स्कॉर्पियो तिथूनच उभी करुन त्यातील ड्रायव्हर हा नंतर इनोव्हामध्ये निघून गेला होता.

ही बातमी पाहिली का?: मुकेश अंबानींच्या घराजवळ संशयित कार आढळल्याने खळबळ

जेव्हा एक संशयितरित्या अँटेलियाच्या बाहेर उभी असल्याचं तेथील सुरक्षा रक्षकांनी पाहिलं त्यावेळी त्यांनी तात्काळ याविषयीची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. दरम्यान, या घटनेनंतर अंबानी यांच्या घराजवळील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. आता इथे मुंबई पोलिसांसह पोलीस कमांडो देखील तैनात करण्यात आले आहेत. सध्या मुंबई क्राईम ब्रांच या प्रकरणी अधिक तपास करत आहे. दुसरीकडे एटीएसचे अधिकारी देखील याचा दहशतवाद्यांशी निगडीत तपास करीत आहेत.

जिलेटिन स्टिक्स असलेली ही कार या ठिकाणी कुणी ठेवली? त्यामागचा उद्देश काय? मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर ही कार का लावण्यात आली? या आणि अशा सगळ्या प्रश्नांचा तपास मुंबई पोलिसांकडून केला जातो आहे. जिलेटिन स्टिक्स असलेली कार मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडणं हे धोक्याचं मानलं जातं आहे. घटनास्थळी पुढील तपास सुरू आहे. बॉम्ब शोधक पथकही या ठिकाणी दाखल झाली आहे.

मुंबईत मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्कॉर्पिओ कार सापडली आहे. या स्कॉर्पिओ कार आणि त्यात आढळलेल्या जिलेटीनच्या कांड्यांबाबतची चौकशी मुंबई क्राईम ब्रांच करते आहे. लवकरच यातलं सत्य बाहेर येईल असं महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp