Sangli रेड झोनमध्ये, कृष्णा नदीची पातळी तब्बल 54 फुटांच्याही वर

मुंबई तक

• 07:00 AM • 25 Jul 2021

स्वाती चिखलीकर, सांगली कोल्हापूरप्रमाणेच सांगली जिल्ह्यात देखील पुराची भीषण परिस्थिती पाहायला मिळत आहे. कारण कृष्णा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. सध्या कृष्णा नदीची पाणी पातळी 54.6 फुटावर पोहचली असून त्यामध्ये वाढच होत आहे. आतापर्यंत सांगली शहरातील 40 हून अधिक ठिकाणामध्ये पुराचं पाणी शिरलं आहे. दरम्यान, वाढत्या पाणी पातळीमुळे सांगली शहर आता रेड झोनमध्ये […]

Mumbaitak
follow google news

स्वाती चिखलीकर, सांगली

हे वाचलं का?

कोल्हापूरप्रमाणेच सांगली जिल्ह्यात देखील पुराची भीषण परिस्थिती पाहायला मिळत आहे. कारण कृष्णा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. सध्या कृष्णा नदीची पाणी पातळी 54.6 फुटावर पोहचली असून त्यामध्ये वाढच होत आहे.

आतापर्यंत सांगली शहरातील 40 हून अधिक ठिकाणामध्ये पुराचं पाणी शिरलं आहे. दरम्यान, वाढत्या पाणी पातळीमुळे सांगली शहर आता रेड झोनमध्ये दाखल झालं आहे.

एखाद्या भागात 40 फुटापर्यंत पाणी असल्यास तिथे येलो (Yellow)अलर्ट जारी केला जातो. जर पाण्याची पातळी 50 फुटापर्यंत पोहचली तर तिथे ऑरेंज (Orange) अलर्ट दिला जातो आणि पुराच्या पाण्याची पातळी ही 50 फुटांहून अधिक असेल तर तिथे रेड (Red) अलर्ट जारी केला जातो. त्यामुळेच आता सांगलीमध्ये सध्या रेड अलर्ट जारी केला गेला आहे.

कोयना धरणातील पाणी सोडण्याच्या योग्य नियोजनामुळे सांगलीचा पूर मर्यादित राहिला: लवकरच हा पूर ओसरायला लागेल: जलसंपदामंत्री जयंत पाटील

दरम्यान, असं असलं तरी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मात्र असा विश्वास व्यक्त केला आहे की, कोयना धरणातून पाणी सोडण्याच्या योग्य नियोजनामुळेच सांगलीचा पूर मर्यादित राहिला आहे आणि आता लवकरच हा पूर देखील काही तासात ओसरेल.

2019 मध्ये सव्वा चारशे मिलिमीटर पाऊस पडला असताना कोयनेतून सव्वा लाख क्यूसेक विसर्ग सुरु होता. तर यंदा सातशे मिलिमीटर पाऊस पडूनही फक्त 50 हजार क्यूसेक विसर्ग होता. त्यामुळे कोयना धरणातून पाणी सोडण्याच्या नियोजनामुळेच सांगलीचा पूर मर्यादित राहिला आणि आता तो देखील काही तासात ओसरेल असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

पुरामुळे सांगली जिल्ह्यातील सुमारे 1 लाख लोकांचे स्थलांतर

दरम्यान, सांगली जिल्ह्यात पूरस्थितीमुळे 22 हजार कुटुंबातील तब्बल 1 लाख लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलं आहे. तर 24 हजाराहून अधिक जनावरं देखील अन्य ठिकाणी हलविण्यात आली आहेत.

सांगली जिल्ह्यात पूरस्थितीमुळे तब्बल 94 गावे बाधित झाली आहेत. जिल्ह्यात 13 जनावरांची आणि 17 हजार 300 कोंबड्यांची जीवितहानी झाली आहे. तर सांगली 60 टक्के जलमय झाली आहे.

Kolhapur Flood: कोल्हापूर जिल्ह्यात पुराची स्थिती नेमकी कशी?

सांगली शहरात दुसऱ्या मजल्यावर अजून जे लोक अडकले आहेत त्यांना फूड पॅकेट, दूध आणि पाणी द्यावे अशी मागणी नागरिक करत आहेत. त्यामुळे अद्यापही सांगलीतील परिस्थिती चिंताजनकच आहे.

    follow whatsapp