1 जूननंतरही महाराष्ट्रात लॉकडाऊन कायम राहणार आहे मात्र काही प्रमाणात निर्बंध शिथील होतील असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरूवारीच स्पष्ट केलं. लॉकडाऊन ते अनलॉकच्या प्रक्रिया यादृष्टीने हे पहिलं पाऊल आहे. पहिल्या लाटेच्या वेळी जशा गोष्टी हळूहळू उघडल्या गेल्या त्याचप्रमाणे आताही सरकार आस्ते कदम टाकताना दिसत आहे. लॉकडाऊन संपणार नसला तरीही काही प्रमाणात अनलॉक सुरू होईल. काही निर्बंध जरूर शिथील केले जातील अशात मुंबई अनलॉकसाठी तयार आहे का? हा प्रश्न विचारला जातो आहे याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे मुंबईत गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने कमी झालेली कोरोना रूग्णांची संख्या. मुंबईत रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 94 टक्के इतके झाले आहे तर डबलिंग रेट हा 348 दिवसांवर गेला आहे.
ADVERTISEMENT
कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी नुकतंच असं सांगितलं होतं की ज्या ठिकाणी टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांपेक्षा खाली आला आहे त्या ठिकाणी काही निर्बंध शिथील केले जातील. मात्र ज्या जिल्ह्यांमध्ये TPT हा 5 टक्के किंवा 10 टक्क्यांपेक्षा कमी किंवा पाच टक्क्यांपेक्षाही कमी आहे तिथे काही निर्बंध शिथील केले जातील. ज्या ठिकाणी 12 ते 14 टक्के TPT आहे तिथे इतक्यात निर्बंध शिथील करता येणार नाही. याबाबत आता मुख्यमंत्री, आरोग्य मंत्रालय आणि टास्क फोर्स निर्णय घेईल. मात्र मुंबई तकने यासंदर्भात काही आरोग्य विषयक तज्ज्ञांशी संवाद साधला. मुंबई अनलॉकसाठी तयार आहे का? याची त्यांनी काय उत्तरं दिली आहेत? जाणून घेऊ.
महाराष्ट्रातला Lockdown कायम राहणार आहे पण.. जाणून घ्या काय म्हणाले राजेश टोपे?
हिंदुजा रूग्णालयाचे डॉ. लॅन्सलॉट पिंटो यांनी काय म्हटलं आहे?
डॉ. पिंटो हे फुफ्फुसांच्या आजारांविषयीचे तज्ज्ञ डॉक्टर आहेत. अनलॉकबाबत जेव्हा आम्ही त्यांना विचारलं तेव्हा ते म्हणाले की गर्दी करणं टाळणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. गर्दी केली गेली तर कोरोना वाढू शकतो. एवढंच नाही तर जे घरात राहात आहेत त्यांनीही योग्य अंतर ठेवलं पाहिजे. अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर टप्प्या टप्प्याने गोष्टी उघडण्यात येतात हे योग्य आहेच. मात्र जेव्हा ऑफिसेस, जिम, रेस्तराँ, मंगल कार्यालयं उघडली जातील तेव्हा तिथे गर्दी होणं टाळलं पाहिजे. योग्य अंतर ठेवूनच व्यवहार होतील यावर भर दिला पाहिजे म्हणजे अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल आणि कोरोनाही पसरणार नाही.
लोकल ट्रेन सुरू झाल्या तर काय होईल असा प्रश्न विचारला असता डॉ. पिंटो म्हणाले की गर्दी होणार नाही याची खबरादारी घेऊनच लोकल ट्रेन सगळ्यांसाठी सुरू केल्या पाहिजेत. ज्या ट्रेन्समध्ये एसी कोच आहेत त्यांचं व्हेंटिलेशन योग्य पद्धतीने होतंय ना? हे देखील पाहिलं पाहिजे. तसंच लवकरात लवकर अनेकांचं लसीकरण झालं पाहिजे. लस हे आपल्या सुरक्षा कवचासारखं काम करते. त्यामुळे लसीकरण मोठ्याप्रमाणावर झालं पाहिजे. ट्रेनमधून प्रवास करतानाही लोकांनी ही काळजी घेतली पाहिजे की गर्दी कमी होईल, मास्क वापरणं हे आवश्यकच असणार आहे.
Maharashtra Lockdown : महाराष्ट्रामध्ये 1 जूनपासून काय होणार अनलॉक?
डॉ. प्रशांत बोराडे यांनी काय म्हटलं आहे?
ग्लोबल हॉस्पिटलचे वरिष्ठ कन्सल्टंट डॉ. प्रशांत बोराडे यांनाही आम्ही हाच प्रश्न विचारला की मुंबई अनलॉकसाठी तयार आहे का? यावर ते म्हणाले की होय मुंबई आता अनलॉकसाठी तयार आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतल्या केसेस कमी होत आहेत. मात्र गर्दी होणं हे टाळलं जाणं आवश्यक आहे. तसंच सरकार हळूहळू सगळ्या गोष्टी सुरू करणार आहे ही बाब योग्यच आहे. यावेळी त्यांनी जनजागृतीही केली पाहिजे आणि लोकांनीही आपली जबाबदारी आणि सामाजिक भान ओळखून वागलं पाहिजे. एवढंच नाही तर 80 टक्के मुंबईकरांचं लसीकरण वेगाने पूर्ण केलं गेलं पाहिजे अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जर योग्य काळजी घेतली नाही तर तिसरी लाट येऊ शकते. ती टाळायची असेल तर लसीकरण आणि गर्दी टाळणं हे दोन मुख्य उपाय आहेत असंही डॉ. बोराडे यांनी स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT