जिल्ह्यातील पाचोरा शहरातील बाहेरपुरा भागात 5 वर्षांपूर्वीच बांधण्यात आलेली एक तीन मजली इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. ही घटना सोमवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
ADVERTISEMENT
भाडेकरूंनी खाली केली होती इमारत
पाचोरा शहरातील व्हीपी रस्त्यावर साजेदाबी शेख खलील यांच्या मालकीची हो इमारत होती. साजेदाबी या मुंबईत राहतात. त्यांनी पाचोरा येथे गुंतवणूक म्हणून ही तीन मजली इमारत बांधली होती. इमारतीला पावसामुळे तडे पडले होते. त्यामुळे इमारत एका दिशेने झुकून कधीही कोसळेल, अशा स्थितीत होती. खबरदारी म्हणून इमारतीतील भाडेकरूंनी इमारत रिकामी केली होती.
इमारती कोसळतानाचा व्हिडिओ व्हायरल
पाचोरा शहर व परिसरात सोमवारी सायंकाळपासूम रिमझिम पाऊस पडत होता. पावसामुळे रात्री 10 वाजेच्या सुमारास ही इमारत अचानक कोसळली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. इमारत धोकादायक असल्याने यापूर्वीच नगरपरिषदेने हा रस्ता बंद केला होता. परिसरातील आणि शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी काळजी घेतल्याने सुदैवाने हानी झाली नाही. इमारत कोसळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहे.
ADVERTISEMENT