जगात सहिष्णू फक्त हिंदूच; भारताचा अफगाणिस्तान कधीच होऊ शकत नाही -जावेद अख्तर

मुंबई तक

• 05:29 AM • 15 Sep 2021

‘जगात सगळ्यात सभ्य आणि सहिष्णू हिंदूच आहेत’, असं मत प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी मांडलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्या समर्थकांची तुलना तालिबानी समर्थकांसोबत केल्यानं जावेद अख्तर यांच्या विधानावरून वादंग निर्माण झालं होतं. याच मुद्द्यावर जावेद अख्तर यांनी सविस्तर भाष्य केलं आहे. जावेद अख्तर यांचा एक लेख दैनिक सामनामध्ये प्रसिद्ध […]

Mumbaitak
follow google news

‘जगात सगळ्यात सभ्य आणि सहिष्णू हिंदूच आहेत’, असं मत प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी मांडलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्या समर्थकांची तुलना तालिबानी समर्थकांसोबत केल्यानं जावेद अख्तर यांच्या विधानावरून वादंग निर्माण झालं होतं. याच मुद्द्यावर जावेद अख्तर यांनी सविस्तर भाष्य केलं आहे.

हे वाचलं का?

जावेद अख्तर यांचा एक लेख दैनिक सामनामध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. या लेखात त्यांनी हिंदू आणि उजव्या विचारांच्या संघटनाबद्दलची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्याचबरोबर धर्मांध मुस्लिमाविरोधातही भूमिका घेतल्याचं स्पष्ट केलं आहे. अनेक दाखले आणि संदर्भ देत जावेद अख्तर यांनी निर्माण झालेल्या वादाला उत्तर दिलं आहे.

जावेद अख्तर काय म्हणाले?

माझ्या टीकाकारांनी म्हटले आहे की, मी हिंदू धर्मातील कट्टर उजव्या विचारसरणीच्या लोकांवर टीका करत असताना मुस्लिमांमधील धर्मांधांच्या विरोधात मात्र कधीच ठामपणे भूमिका घेतलेली नाही. त्यांनी माझ्यावर, मी मुस्लिम समुदायातील तिहेरी तलाकबद्दल, पडदा पद्धतीविषयी किंवा इतर कोणत्याही प्रतिगामी प्रथांविषयी काहीही बोलत नाही, असा आरोप केला आहे. मला याचं अजिबात आश्चर्य वाटलेलं नाही की, गेल्या काही वर्षांत मी काय काय केले आहे याविषयी ते पूर्णपणे अनभिज्ञ आहेत. कारण मी काही इतकाही महत्त्वाचा माणूस नाही की मी काय करतोय किंवा काय करत होतो हे प्रत्येकाला माहिती असावं.

‘मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी दिला इशारा’

वस्तुस्थिती अशी आहे की, गेल्या दोन दशकांमध्ये धर्मांध मुस्लिमांपासून माझ्या जिवाला असलेल्या धोक्यांमुळे मला दोनवेळा पोलीस संरक्षण देण्यात आलं होतं. पहिलं, जेव्हा तिहेरी तलाकच्या मुद्द्यावर देशात फारशी चर्चा नव्हती तेव्हादेखील मी तिहेरी तलाकला जोरदार विरोध तर केला होताच, त्याशिवाय मुस्लिम फॉर सेक्युलर डेमोक्रेसी (एमएसडी) नावाच्या संस्थेसह हैदराबाद, अलाहाबाद, कानपूर आणि अलिगढ यांसारख्या भारतातील अनेक शहरांचा दौरा केला होता. अनेक सार्वजनिक व्यासपीठांवरून मी या प्रतिगामी पद्धतीच्या विरोधात बोललो आहे. या सगळ्यांचा परिणाम म्हणून मला जिवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या. मुंबईमधील एका उर्दू वृत्तपत्रात त्या ठळकपणे प्रसिद्ध झाल्या होत्या. ही 2007 मधील घटना आहे. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त ए. एन. रॉय यांनी त्यावेळी त्या वृत्तपत्राचे संपादक आणि प्रकाशक यांना प्रत्यक्ष बोलावून घेतलं आणि इशारा दिला की, जर नंतर कोणतेही हिंसक कृत्य घडले तर त्यासाठी मुंबई पोलीस या वृत्तपत्राला जबाबदार धरतील.

2010 मध्ये एका टीव्ही चॅनेलवर मौलाना कल्बे जवाद या एका प्रख्यात मुस्लिम धर्मगुरूशी मी पडदा पद्धतीच्या प्रतिगामी प्रथेवर वादविवाद केला होता. मौलाना त्यामुळे खूप नाराज झाले होते आणि काही दिवसांत लखनौमध्ये माझे पुतळे जाळण्यात आले आणि मला पुन्हा एकदा द्वेषपूर्ण मेल आणि जिवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या. पुन्हा मला मुंबई पोलिसांनी संरक्षण पुरवलं. म्हणूनच मी मुस्लिम कट्टरवाद्यांच्या विरोधात बोलत नाही हा माझ्यावरील आरोप पूर्णपणे निराधार आहे.

काहींनी माझ्यावर तालिबानचं गौरवीकरण केल्याचा आरोप केला आहे. यापेक्षा तथ्यहीन आणि हास्यास्पद काहीही असू शकत नाही आणि माझ्या मनात अशा मानसिकतेच्या लोकांबद्दल फक्त तिरस्कार आहे. या वादग्रस्त मुलाखतीच्या एका आठवडय़ापूर्वी 24 ऑगस्ट 2021 रोजी मी एक ट्वीट केलं होतं की, ‘मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या दोन सदस्यांनी रानटी तालिबाननं अफगाणिस्तानवर पुन्हा ताबा मिळविल्याबद्दल अत्यंत आनंद व्यक्त केला आहे हे धक्कादायक आहे. जरी बोर्डानं त्यापासून अंतर राखलं असलं तरी तेवढं पुरेसं नाही. बोर्डानं त्यांचं मत अत्यंत निःसंदिग्ध शब्दांत व्यक्त केलं पाहिजे.’

‘प्रत्येक समुदायाच्या उजव्या विचारसरणीच्या लोकांमध्ये विलक्षण साम्य’

मी येथे माझ्या या मतांचा पुनरुच्चार करतो आहे. कारण मला हिंदू उजव्या विचारसरणीच्या समर्थकांना मी मुस्लिम समुदायातील प्रतिगामी चालीरीती आणि प्रथांच्या विरोधात उभा राहत नाही या खोट्या सबबीमागे लपू द्यायचे नाही. त्यांनी माझ्यावर हिंदू धर्माचा आणि हिंदूंचा अपमान केल्याचाही आरोप केला आहे. यामध्ये एक कणभरही सत्य नाही. खरे तर नुकत्याच एका मुलाखतीत मी म्हटलं होतं की, ‘हिंदू हे जगातील सर्वात सभ्य आणि सहिष्णू बहुसंख्याक आहेत. याचा मी अनेक वेळा पुनरुच्चार केला आहे आणि हेदेखील ठामपणे बोललो आहे की, भारत कधीही अफगाणिस्तान होऊ शकत नाही. कारण भारतीय हे निसर्गतः कट्टरवादी नाहीत; नेमस्त असणं, मध्यममार्गी भूमिका घेणं हे त्यांच्या डीएनएमध्ये आहे. मग तुम्हाला प्रश्न पडेल की, इतक्या ठामपणे आणि स्पष्ट बोलूनही काही लोक माझ्यावर इतके नाराज का आहेत? याचं उत्तर असं आहे की, मी सर्वच धर्मांमधील कट्टर उजव्या विचारसरणीच्या लोकांचा, धर्मांधांचा, कडव्यांचा स्पष्टपणे निषेध केला आहे. प्रत्येक समुदायाच्या उजव्या विचारसरणीच्या लोकांमध्ये विलक्षण साम्य आहे, यावर मी जोर दिला आहे.

तालिबान आणि हिंदू उजव्या विचारसरणीच्या मानसिकतेत मला बरेच साम्य आढळते, याचादेखील माझ्या टीकाकारांना प्रचंड राग आला आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की, त्यांच्यात खरंच खूप साम्य आहे. तालिबान धर्मावर आधारित इस्लामिक सरकार स्थापन करत आहे. हिंदू उजव्या विचारसरणीला हिंदू राष्ट्र स्थापन करायचं आहे. तालिबानला स्त्रियांच्या हक्कांवर निर्बंध घालायचे आहेत आणि त्यांना उपेक्षित ठेवायचं आहे. हिंदू उजव्या विचारसरणीलाही स्त्रिया आणि मुलींना स्वातंत्र्य दिलेलं आवडत नाही, हे स्पष्ट केलं आहे. उत्तर प्रदेश, गुजरातपासून कर्नाटकपर्यंत अनेक राज्यांत रेस्टॉरंट, बागेत किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी एकत्र बसल्यामुळे तरुण-तरुणींना निर्दयपणे मारहाण करण्यात आली आहे. मुस्लिम धर्मांधांप्रमाणेच हिंदू उजव्या विचारसरणीलाही स्त्रियांचा स्वतःचा जीवनसाथी निवडण्याचा अधिकार मान्य नाही. अलीकडेच एका अत्यंत महत्त्वाच्या उजव्या विचारसरणीच्या नेत्यानं म्हटलं आहे की, स्त्रिया स्वतःच्या मर्जीनं आणि स्वतंत्रपणे जगण्यास सक्षम नाहीत. तालिबानप्रमाणेच हिंदू उजवी विचारसरणीही कोणत्याही मानवनिर्मित कायदा किंवा न्यायालयापेक्षा धर्म आणि आस्था या गोष्टी श्रेष्ठ असल्याचा दावा करते.

तालिबानला कोणतेही अल्पसंख्याक समुदाय अजिबात आवडत नाहीत; त्याचप्रमाणे हिंदू उजव्या विचारसरणीनेही अल्पसंख्याकांबद्दल त्यांच्या मनात कोणत्या प्रकारचे विचार आणि भावना आहेत. हे वेळोवेळी त्यांच्या भाषणांमधून आणि घोषणांमधून आणि जेव्हा जेव्हा त्यांना संधी मिळते तेव्हा त्यांच्या कृत्यांमधून स्पष्ट केलं आहे.

‘असे काही भारतीय लोक आहेत जे याला कडवा प्रतिकार करतात’

तालिबान आणि या कट्टर गटांमध्ये फरक एवढाच आहे की, तालिबानकडे आज अफगाणिस्तानात अनिर्बंध सत्ता आहे आणि त्यांना प्रश्न विचारणारे तिथे कोणीही नाही तर भारतात मात्र भारतीय संविधानाशी पूर्णपणे विसंगत असणाऱ्या तालिबानी विचारसरणीच्या या भारतीय आवृत्तीला मोठ्या प्रमाणात विरोध करत आहे. आपलं संविधान धर्म, समुदाय, जात किंवा लिंग या आधारावर भेदभाव करीत नाही. आपल्याकडे न्यायपालिका आणि प्रसारमाध्यमांसारख्या संस्थाही आहेत. या दोघांमधील फरकाचा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तालिबाननं अफगाणिस्तानात स्वतःचं लक्ष्य आता साध्य केलं आहे. हिंदू उजवी विचारसरणीदेखील भारतात तशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहे. सुदैवानं हा भारत देश आहे आणि असे काही भारतीय लोक आहेत जे याला कडवा प्रतिकार करीत आहेत.

माझ्या मुलाखतीत मी एम. एस. गोळवलकर यांना नाझी जर्मनीबद्दल आणि अल्पसंख्याकांना हाताळण्याच्या नाझींच्या पद्धतीबद्दल असलेल्या कौतुकाचा उल्लेख केल्यामुळेही काही लोक माझ्यावर नाराज आहेत. गोळवलकर 1940 ते 1973 पर्यंत संघ परिवाराचे सर्वेसर्वा होते. त्यांनी ‘वुई ऑर अवर नेशनहूड डिफाइंड’ आणि ‘अ बंच ऑफ थॉट्स’ ही दोन पुस्तकं लिहिली. ही पुस्तकं इंटरनेटवर सहज उपलब्ध आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये त्यांच्या समर्थकांनी यापैकी पहिलं पुस्तक गुरुजींनी लिहिलंच नाही, असं म्हणून हात झटकायचा प्रयत्न सुरू केला आहे. अशा प्रकारे नाकारण्याचं कारण म्हणजे कितीही वाईट धर्मांधदेखील आज या पुस्तकातील मजकुराचं समर्थन करण्यास धजावणार नाही. अनेक आवृत्त्या निघालेल्या या पुस्तकात एम. एस. गोळवलकर यांचं नाव तेव्हा चुकीनं छापले गेलं होतं, असं त्यांचे समर्थक आता म्हणतात.

‘वुई ऑर अवर नेशनहूड डिफाइंड’ हे पुस्तक पहिल्यांदा 1939 मध्ये प्रकाशित झालं होतं. गोळवलकर हे 1973 पर्यंत हयात होते. 1939 ते 1973 या काळात, म्हणजेच तब्बल 34 वर्षांत या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित झाल्या, पण गोळवलकर यांनी कधीही हे पुस्तक आपण लिहिलेलं नाही असं म्हणून ते नाकारलं नाही. म्हणून साहजिकच त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या लेखकत्वाला नकार देणं हे राजकीय स्वार्थाशिवाय दुसरं काही नाही. येथे मी त्यांच्या प्रत्येक पुस्तकातील एक उतारा उद्धृत करतो.

हात जोडून माफी मागा तोपर्यंत एकही चित्रपट चालू देणार नाही – Ram Kadam यांचा जावेद अख्तर यांना इशारा

‘वुई ऑर अवर नेशनहूड डिफाइंड’, पृष्ठ 34-35; पृष्ठ 47-48

”वंश आणि त्याची संस्कृती शुद्ध राखण्यासाठी सेमेटिक वंशाच्या लोकांना म्हणजेच ज्यू लोकांना देशातून हाकलून लावून जर्मनीनं जगाला धक्का दिला. यातून वंशाबद्दलचा सर्वोच्च अभिमान दिसून येतो. मुळातूनच वेगवेगळे असलेले वंश आणि संस्कृती हे एकजीव होऊन नांदणे कसे अशक्य आहे हेही जर्मनीनं दाखवून दिलं आहे. यातून आपल्या भारताने शिकलं पाहिजे आणि त्याचा फायदा करून घेतला पाहिजे…”

”भारतातील परकीय वंशांनी (ख्रिश्चन आणि मुस्लिमांनी) एकतर हिंदू संस्कृती आणि भाषा स्वीकारली पाहिजे. हिंदू धर्माचा आदर करायला आणि त्याची पूजा करायला शिकलं पाहिजे. हिंदू वंश आणि संस्कृतीचे म्हणजेच हिंदू राष्ट्राचे गुणगान करण्याव्यतिरिक्त इतर कशाचीही कल्पना केली नाही पाहिजे… आणि त्यांचं स्वतंत्र अस्तित्व गमावून हिंदू वंशात विलीन झालं पाहिजे अन्यथा ते हिंदू राष्ट्राच्या पूर्णपणे अधीन राहून, कशावरही दावा न करता, कोणतेही विशेषाधिकार न मिळता, कोणतीही प्राधान्याची वागणूक अजिबात न मिळता, इतकेच नव्हे तर नागरिकांचे हक्कदेखील न मिळता या देशात वास्तव्य करू शकतात.”

आरएसएस, विहिंप, बजरंग दलही तालिबानसारखेच;
गीतकार जावेद अख्तर यांचं विधान

‘अ बंच ऑफ थॉट्स, पृष्ठ 148-164, 237-238, भाग दोन, प्रकरण VI, हिंदू राष्ट्र, विभाग, राष्ट्र आणि त्यांच्या समस्या XVI अंतर्गत धोका, 1. मुस्लिम आणि… ख्रिश्चन.

‘आजही मुस्लिम, मग ते सरकारच्या उच्च पदांवर असोत किंवा बाहेर, राष्ट्रविरोधी परिषदांमध्ये उघडपणे भाग घेतात….’

‘…अनेक अग्रगण्य ख्रिस्ती मिशनऱ्यांनी अनेकदा स्पष्टपणे जाहीर केले आहे की, या देशाला ख्रिस्ताच्या साम्राज्याचा प्रांत बनविणे हे त्यांचे एकमेव उद्दिष्ट आहे.’

या परिच्छेदांचा अर्थ स्वयंस्पष्ट आहे. यावर मला खरंच आणखी काही भाष्य करण्याची गरज नाही.

होय, या मुलाखतीत मी संघ परिवारातील काही संघटनांसंदर्भात माझे आक्षेप व्यक्त केले आहेत. धर्म, जात आणि पंथाच्या आधारावर लोकांमध्ये फूट पाडणाऱ्या कोणत्याही विचारसरणीला माझा विरोध आहे आणि अशा प्रकारच्या कोणत्याही भेदभावाच्या विरोधात असलेल्या सर्वांच्या पाठीशी मी उभा राहिलो आहे. कदाचित म्हणूनच 2018 मध्ये हिंदुस्थानातील सर्वात आदरणीय मंदिरांपैकी एक असलेल्या वाराणसीच्या ‘संकटमोचन मंदिरा’ने मला आमंत्रित केले आणि त्याहूनही अभूतपूर्व म्हणजे, मला ‘शांतिदूत’ अशी उपाधी आणि ट्रॉफी देण्यात आली. मंदिराच्या आत भाषण देण्याचीही मला संधी देण्यात आली. माझ्यासारख्या नास्तिकासाठी हा अत्यंत दुर्मिळ सन्मान आहे.

‘जावेद अख्तर, आम्ही म्हणतोय ते बरोबर आहे ना?’; RSS वरील टीकेला शिवसेनेचं उत्तर

‘कुणी उद्धव ठाकरे यांच्या सरकारला तालिबानी कसे म्हणू शकते’

एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे, एकीकडे हिंदू उजव्या विचारसरणीचे समर्थक माझ्यावर इतके चिडलेले असताना त्यांच्याच एका प्रमुख राजकीय नेत्याने आपल्या महाराष्ट्र विकास आघाडी (मविआ) सरकारला ‘तालिबानी’ म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत उत्कृष्ट नेतृत्वाखाली ज्या तीन पक्षांच्या आघाडीचं महाराष्ट्रात सध्या सरकार स्थापन आहे त्यांच्यापैकी कोणत्याही पक्षाचा मी सदस्य नाही. आज महाराष्ट्रातील त्यांची लोकप्रियता प. बंगालमधील ममता बॅनर्जी आणि तामिळनाडूतील स्टॅलिन यांच्या तोडीची आहे. त्यांचे सर्वात कठोर टीकाकारही त्यांच्यावर कोणताही भेदभाव किंवा अन्याय करीत असल्याचा आरोप करू शकत नाहीत. असे असताना कुणीही उद्धव ठाकरे यांच्या सरकारला तालिबानी कसे व का म्हणू शकते हे मला तरी उमगलेले नाही.

    follow whatsapp