शिवसेनेचे आमदार फुटले. बंडखोर आमदार शिंदे गटात सामील झाले, पण शिवसेनेविरोधात बंडखोरी करताना आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही आरोप केला. शिंदे गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेसवर होणाऱ्या आरोपांना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ‘मुंबई Tak’शी बोलताना दोन मुद्दे सांगत सविस्तर उत्तर दिलं.
ADVERTISEMENT
भाजपसोबत गेल्यास स्थिर सरकार देऊ शकतो, असं मत एनसीपीतील काही नेत्यांचं होतं. तर दुसरीकडे भाजपसोबत न जाण्याबद्दलची भूमिका काही नेत्यांची होती. आता दोन्ही मतांचे नेते एकत्र विचार करताहेत का आणि आता काय वाटतं?, असा प्रश्न जयंत पाटील यांना विचारण्यात आला होता.
जयंत पाटील म्हणाले, “बहुसंख्या आमदारांची अपेक्षा ही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशीच होती. कारण लोकांनी आम्हाला भाजपच्या विरोधात कौल दिलेला होता आणि मतदान केलेलं होतं. २०१९ मध्ये परिस्थिती बदलली. कोणत्याही परिस्थितीत भाजपचं सरकार येऊ नये म्हणून झालेली ती आघाडी होती. कोणत्याही अटींशिवाय आम्ही शिवसेनेला पाठिंबा दिला होता. शिवसेनेतून काही आमदार बाजूला जातील असं आम्हाला वाटलं नव्हतं. ते झालं. असं राजकारणात होत असतं. नव्या परिस्थितीत भाजपने शिवसेनेची मोडतोड करून जे बहुमत तयार केलेलं आहे. त्यामुळे हे किती दिवस एकत्र राहतात हे बघायचं”, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.
Jayant Patil :”एकनाथ शिंदे दोन-चार महिन्यांनी नितीश कुमारांसारखं करू शकतात, कारण…”
शिवसेनेच्या आमदारांनी मला जेवणं दिलं -जयंत पाटील
शिवसेनेतून फुटून शिंदे गटात गेलेल्या आमदारांनीही राष्ट्रवादी काँग्रेसवरही खापर फोडलंय? या आमदारांचा राष्ट्रवादीवर राग असण्याचं नेमकं कारण काय असावं? या प्रश्नाला उत्तर देताना जयंत पाटील म्हणाले, “दोन बाबी याच्यात आहेत. पहिली म्हणजे, मी राष्ट्रवादी संवाद यात्रा राज्यात केली. जिथे शिवसेनेचे आमदार आहेत. त्या मतदारसंघातही मी गेलो. शिवसेनेच्या बहुतेक आमदारांनी माझं स्वागत केलं. मला जेवण दिलं. काहींनी चहापानाला बोलावलं. आमच्या सभेला किंवा बैठकीलाही आले. ज्या जिल्ह्यात गेलो, त्या जिल्ह्यातील सर्वच पक्षाच्या आमदारांचे माझ्या खात्यासंदर्भातील प्रश्न आम्ही निकाली काढायचो.”
“त्यामुळे शिवसेना आमदारांसाठी हा तक्रारीचा मुद्दा नसेल. शिवसेनेच्या मतदारसंघात गेल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची तयारी करा हेच सांगितलं. कधीच कुठल्याच मतदारसंघात असं सांगितलं नाही की, इथे राष्ट्रवादी काँग्रेसचा निवडून येईल. नगरपालिका, जिल्हा परिषदा लढवा. विधानसभेला आपली आघाडी होणार आहे. आघाडी झाल्यानंतरची परिस्थिती बघून सांगू. आजच बोललो तर उगीच ती माणसं तिसऱ्या पक्षात जाऊ शकतात. त्या मर्यादा असतात”, असं जयंत पाटील म्हणाले.
उद्धव ठाकरे जो उमेदवार देतील, तो निवडून येईल; ‘मातोश्री’वरील भेटीनंतर जयंत पाटलांचं विधान
“दुसरी बाब म्हणजे निधी नाही असं ते आमदार म्हणाले, सर्व आमदारांना भरपूर पैसे मिळाले आहेत. ते चुकीची आणि खोटी बातमी सांगतात. प्रत्येकाला तीनशे, चारशे, पाचशे कोटी मिळालेले आहेत. त्यांना जिथे तीन-चार कोटी मिळायचे तिथे अजित पवारांनी दहा-पंधरा कोटींचा निधी दिला”, असा दावा जयंत पाटील यांनी केला.
‘शिवसेनेच्या आमदारांना खासगीत विचारा’; जयंत पाटलांचा पलटवार
“शेवटी रडीचा डाव करायचा असेल, तर काहीतरी कारण द्यावं लागतं. त्यामुळे हे सर्व आरोप करून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला. उलट राष्ट्रवादीने केली तितकी कामे शिवसेनेच्या आमदारांची कुणीच केली नसतील. आमच्याकडे असणाऱ्या सर्व खात्यांनी. खासगीत विचारलं तर ते सांगतील”, अशी भूमिका जयंत पाटील यांनी यावेळी मांडली.
ADVERTISEMENT