इस देश मैं दो भारत बसते हैं… एक इंडिया आणि एक सामान्य भारत.. झुंड हा सिनेमा त्या सामान्य भारताचं, सामान्य भारतीयांचं प्रतिनिधीत्व करतो.. ज्या सामान्य भारतीयांची स्वप्न,आशा,आकांक्षा,अपेक्षा पूर्ण होणं जवळपास शक्यच नसतं .. त्या सामान्य भारतीयांच्या स्वप्नांना जागं करणारा,बळ देणारा झुंड हा सिनेमा आहे..पिस्तुल्या,फँड्री,सैराटनंतर नागराज मंजुळे हा अवलिया दिग्दर्शक झुंडच्या माध्यमातून प्रेक्षकांची फक्त मनं जिंकत नाही तर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांनाच विचार करायला भाग पाडतो…
ADVERTISEMENT
झुंड सिनेमाची टॅगलाईनच या सिनेमाचं सार आहे. ये झुंड नही टीम है, ही टीम फक्त कलाकारांची नाहीये तर नागराजच्या मुशीत घडलेल्या त्या प्रत्येक टेक्निशियनची आहे. ज्यांनी या सिनेमाला सुंदर सजवलं आहे…ही एका सत्यकथेवर आधारित कहाणी आहे.. नागपूरचे फुटबॉल प्रशिक्षक विजयकुमार बारसे यांनी नागपूरच्या झोपडपट्टीतील मुलांसाठी सुरू केलेला स्लम सॉकर क्लबमुळे भारताला चांगले खेळाडूच मिळाले नाहीत. तर नरकयातनांच्या गर्तेत गेलेल्या या मुलांना एकप्रकारे खेळाच्या सांघिकभावनेने नवसंजीवीनी मिळाली..
झोपडपट्टीतील ट्रेनमधून कोळसा चोरणारी,नशा करणारी ,दारू पिणारी,भुरट्या चोऱ्या करून आपल्या गरीबीसाठी वाट्टेल ते करणाऱ्या मुलांचं भयाण सामान्य भारताचं विश्व दिसतं आणि दुसरीकडे त्याच झोपडपट्टीला लागून असलेलं सोफिस्टीकेटेड कॅटेगरीचं इंडियाचं चित्रण दिसतं. मात्र झुंड पाहिल्यानंतर आपण त्या भयाण सामान्य भारताशी रिलेट करतो.. त्यांच्याविषयी विचार करायला लागतो, जी खरी वास्तविकता आहे त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो हा या सिनेमाचा खरा युएसपी आहे…
नागराज मंजुळेने कथा,पटकथा,संवाद,दिग्दर्शन या सगळ्याच आघाड्यांवर कमाल केली आहे.. खऱ्या भारताचं चित्रण आपल्यासमोर ठेवून आपल्या डोळ्यात एक जळजळीत अंजन घालण्याचा प्रयत्न नागराजने केला आहे.. झुंड सिनेमात कलाकारांसोबत कॅमेराही बोलतो..कारण हाच कॅमेरा हे भयाण वास्तव टिपत असतो.. आणि प्रत्येक फ्रेम बाय फ्रेम आपण अस्वस्थ होत असतो.. फँड्री सिनेमात शेवटी नायक अगतिक होऊन कॅमेऱ्याच्या दिशेने दगड जोरात भिरकावतो,हे पाहून आपल्या प्रत्येकाचं मन सुन्न झालं होतं. झुंडमधल्या या मुलांचं विश्व पाहिल्यावर,त्यांची आयुष्यात प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी सुरू असलेल्या संघर्षाची कहाणी पाहून आपण सुन्नच होत असतो.. नागराजने झुंडमध्ये झुंडशाही, डिजीटल इंडिया, जातीपातीचं राजकारण, यावर संवादमयी हल्ला न चढवता आपल्या कॅमेऱ्यातून अश्या जागा टिपल्या आहेत. ज्या न बोलूनही आपल्याला खऱ्या वास्तवाचं दर्शन करून देतात.. आणि बँकग्राऊंडला संगीतकार अजय-अतुलची गाणी आणि बँकग्राऊंड स्कोर तितकाच आपल्याला अधिक खोलवर घेऊन जातो.
अमिताभ बच्चन हा सिनेमा निव्वळ जगले आहेत.. या वयातील त्यांची कामात झोकून देण्याची वृत्ती, प्रत्येक सीनमधली त्यांची देहबोली, संवाद कौशल्य यातून ते झुंड सिनेमाला खूप मोठं करून टाकतात.. प्रोफेसर बोराडे या फुटबॉल प्रशिक्षकाने दाखवलेली जिद्द आणि या मुलांसाठी उभं केलेलं फुटबॉलचं विशाल जग बच्चन साहेबांनी आपल्या अप्रतिम अदाकारीने सुंदर साकारलं आहे..या कलाकारांच्या टीममधला प्रत्येक आणि प्रत्येक कलाकार या सिनेमाचा नायक आहे.. यातील काही कलाकार हे नागपूरच्या त्याच झोपडपट्टीत लहानाचे मोठे झालेले आहेत..पण प्रत्येक कलाकाराने अगदी जीव ओतून काम केलंय याचं पूर्ण क्रेडिट जातं ते नागराज मंजुळे या एका नावाला…फँड्री,सैराट आणि आता झुंड नागराज मंजुळे आणि टीमने यशस्वी सिनेमांची हॅटट्रीक साधली आहे.. त्यामुळे झुंड या सिनेमाला मी देतोय साडेचार स्टार…झुंड हा एक सिनेमा नसून जगण्याचा एक खरा अनुभव आहे. जो अनुभव मोठ्या पडद्यावर घेण्यासाठी आपण झुंडीने नाही तर एक टीम होऊन थिएटरमध्ये जाणं अत्यंत गरजेचं आहे….
ADVERTISEMENT