चित्रपटगृहात जाऊन शो बंद केल्याच्या प्रकरणात आमदार जितेंद्र आव्हाड जामीनावर बाहेर आले. मात्र, त्यानंतर काही तासांतच त्यांच्याविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल झाला. जितेंद्र आव्हाड यांनी विनयभंग केल्याची तक्रार महिलेनं केलीये. यावरून वादविवाद सुरू झालेले असताना त्या घटनेचा व्हिडीओही समोर आलाय.
ADVERTISEMENT
कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या कळवा-खाडी पुलाचं उद्धघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी (13 नोव्हेबर) झालं. या कार्यक्रमाला खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार जितेंद्र आव्हाडही उपस्थित होते. याच कार्यक्रमात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप एका महिलेनं केलाय.
भाजपच्या महिला मोर्चा आघाडीच्या उपाध्यक्षा असलेल्या रिदा अजगर रशीद यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात तशी तक्रार दिली. मिळालेल्या तक्रारीवरून मुंब्रा पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय. यावरून ठाण्यातलं राजकारण तापलेलं असताना तो व्हिडीओ समोर आलाय.
ज्या कार्यक्रमात जितेंद्र आव्हाडांनी आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप रिदा रशीद यांनी केलाय. त्या कार्यक्रमातला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यात आमदार जितेंद्र आव्हाड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निरोप घेऊन पुढे जाताना दिसत आहेत. त्याचवेळी समोरून रिदा रशीद येतात. रिदा रशीद यांना बाजूला करून जितेंद्र आव्हाड पुढे जाताना दिसत आहेत.
जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी रुता सामंत संतापल्या
विनयभंगाच्या गुन्ह्यावरून जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी रुता सामंत यांनी संताप व्यक्त केलाय. रुता सामंथ यांनी ट्विट करत म्हटलंय की, “ज्या महिलेनं ही तक्रार दाखल केली आहे. त्यांच्याकडे मोटिव्ह आहे. छट पुजेवरून झालेल्या बाचाबाचीत रिदा रशीद यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असून, त्या जामीनावर आहेत.”
“राष्ट्रवादी काँग्रेस व आव्हाडांविरोधात आक्षेपार्ह बोलल्या आहेत. अंगावर धडकणाऱ्या व्यक्तीला बाजूला करणं गुन्हा असेल, तर बाजारात, ट्रेनमध्ये, रेल्वे पुलावर, गर्दीमध्ये रोज शेकड्यांनी ‘विनयभंग’ होत असतील”, अशा शब्दात रुता सामंत यांनी संताप व्यक्त केलाय.
“रिदा रशीद या राजकारणी महत्वाकांक्षा बाळगतात. आणि काल रात्री त्या कुणाला तरी भेटल्या. त्यांच्यावर पण अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. जे काही घडलं ती spontaneous reaction (स्वाभाविक प्रतिक्रिया) होती. त्याला विनयभंग म्हणता येत नाही”, असंही रुता सामंत यांनी म्हटलंय.
ADVERTISEMENT