स्मिता शिंदे, जुन्नर: पुणे जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये मागील वर्षभरात मोठे वाद विकोपाला गेल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच काल (4 जानेवारी) दुपारी एका कार्यक्रमात पुन्हा एकदा असाच एक प्रत्यय आला आहे. जुन्नरचे आजी-माजी आमदार विकासकामांच्या श्रेयासाठी थेट एकमेकाला भिडले आणि मग ग्रामस्थांनाच मोठ्या प्रयत्नानंतर अखेर त्यांच्यात समेट घडवून आणावा लागला.
ADVERTISEMENT
जुन्नरमधील विकासकामांवर महाविकास आघाडीतील शिवसेनेचे माजी आमदार शरद सोनवणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके यांच्यातच भर कार्यक्रमात शाब्दिक चकमक उडाली असल्याचं पाहायला मिळालं.
यामुळे काही काळ त्या ठिकाणी तणावाचे वातावरण झाले होते. जुन्नर तालुक्यात उंब्रज नंबर 2 या ठिकाणी रस्त्याचे भूमीपूजन कार्यक्रमात आजी-माजी आमदार एकमेकांना भिडल्याचा हा धक्कादायक प्रकार आणि त्याचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालं आणि मग पुणे जिल्ह्यातील महाविकास आघाडीतली बिघाडी पुन्हा एकदा चर्चेत आली.
महाविकास आघाडीतील शिवसेनेचे माजी आमदार शरद सोनवणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके यांच्यामध्ये भर कार्यक्रमात शाब्दिक चकमक उडाली. एकमेकांना तू-तू, मैं-मै केल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते. त्यामुळे गावकर्यांची मोठी कोंडी झाली होती.
नेमकं वादाचं कारण काय?
उंब्रज नंबर 2 इथे रस्त्याचा भूमिपूजन कार्यक्रम होता. राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अतुल बेनके या ठिकाणी पोहचले. आपल्या प्रयत्नातून हा रस्ता होत आहे असं त्यांनी सांगितलं.
भूमीपूजनासाठी जे फ्लेक्स लावण्यात आले होते त्यावरही ठळकपणे हेच छापण्यात आलं होतं. त्यामुळे निमंत्रण नसतानाही माजी आमदार शरद सोनवणे (शिवसेना) हे कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहचले. दोघे शेजारी-शेजारी बसले.
यावेळी शरद सोनवणे यांनी अतुल बेनके यांच्या हाताला स्पर्श केला आणि विचारणा केली म्हणून बेनके संतापले. तुम्ही मला हात का लावला? असा जाब विचारताच सोनवणे पण संतापले आणि म्हणाले. ‘आपले कर्तुत्व किती? आपण बोलतो किती?’ असा टोमणा शरद सोनवणे आणि अतुल बेनके यांना लगावला.
यापूर्वीही झाला होता दोन्ही नेत्यांमध्ये वाद…
मागील काही महिन्यात तालुक्यातल्या औरंगपूर या ठिकाणी सुद्धा एका कार्यक्रमात या दोन्ही नेत्यांमध्ये वाद झाला होता. ग्रामपंचायत कार्यालयाच्या नव्या इमारतीचे उदघाटन शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले होते.
या कार्यक्रमात आमदार अतुल बेनके अनुपस्थित राहिले आणि नंतर स्वतंत्ररित्या पुन्हा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पुन्हा उदघाटन केले होते. यावरून सुद्धा आजी-माजी आमदारांमध्ये शाब्दिक युद्ध रंगले होते.
जुन्नरमध्ये महाविकास आघाडीत का होते सारखी बिघाडी?
पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे व शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्यातही मागच्या काही दिवसात सातत्याने वाद होताना दिसत आहे.
काही महिन्यांपूर्वी नारायणगाव बायपासच्या उद्घाटनप्रसंगी सुद्धा या दोघांमध्ये शाब्दिक युद्ध रंगले होते आणि एकाच रस्त्याचे दोनदा उद्घाटन या दोघांनी वेगवेगळ्या वेळी केले होते. यामुळे पुणे जिल्ह्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्व काही आलबेल आहे असं अजिबात नाही.
Shivsena-NCP मधला वाद पेटला ! कोल्हेंनी उंटाच्या पार्श्वभागाचा मुका घेण्याचा प्रयत्न करु नये – शिवाजीराव पाटील
राज्यात महाआघाडीचं सरकार आहे. मात्र, इथं दोन्ही पक्षांमधील नेत्यांमध्ये सातत्याने तू-तू , मैं-मैं होताना दिसत आहे. त्यातच नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या बैलगाडा शर्यती कोरोनाचे कारण सांगून बंद केल्याचं माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी थेट गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप केल्यानं पुणे जिल्ह्यातील शिवसेना-राष्ट्रवादी मध्ये सातत्याने वाद होताना दिसत आहे.
ADVERTISEMENT