कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात भारतीय चलनाच्या बनावट नोटा वटवण्यासाठी आलेल्या तीन तरुणांना कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी सापळा रचत अटक केली आहे. रजनीशकुमार चौधरी, हर्षद खान, अर्जुन कुशवाह अशी या तीन आरोपींची नावे आहेत. या तिघांकडून 39 हजार 500 रुपयांच्या बनावट नोटा आणि नोटा बनवण्याचं साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.
ADVERTISEMENT
विशेष म्हणजे हे तिन्ही आरोपी 19 वर्षांचे आहेत. यामधील रजनीशकुमार हा मुख्य आरोपी असून तो एडिटिंग आणि प्रिंटींग मध्ये निष्णात होता. तो हर्षद व अर्जुनच्या मदतीने या नोटा बनवत होता आणि त्या चलनात वटवत होता. तीन महिन्यापासून त्यांनी हे काम सुरू केलं होतं. या कालावधीत त्यांनी किती नोटा बनवल्या, चलनात आणल्या त्यांचा आणखी कुणी साथीदार आहे का ? याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही तरुण बनावट चलनी नोटा वटवण्यासाठी कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात येणार असल्याची माहिती महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी या परिसरात सापळा रचला. यावेळी या परिसरात वावरणाऱ्या तीन तरुणांचा संशय आल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे भारतीय चलनातील 50, 100 , 200 रूपये दराच्या एकुण 25 हजाराच्या बनावट नोटा मिळून आल्या. पोलिसांनी या तिघा तरुणाविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे.
पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी रजनीश कुमार याच्या घरावर छापा टाकत त्याच्या घरातून 500, 200 ,100, 50 रुपये किमतीच्या 14 हजार 500 रुपये बनावट नोटा तसेच नोटा बनवण्यासाठी लागणारे कलर प्रिंटर ,कलरचे डब्बे, बाटल्या , लिक्विड डबे , वॉटर मार्क पेपर त्यावर महात्मा गांधी यांचा फोटो कागदाचे रिम असा मुद्देमाल जप्त केला आहे.
ADVERTISEMENT