करीना कपूरच्या दुसऱ्या बाळाचं नाव अखेर समोर ठेवलं आहे. ते नाव जेह नसून जहांगीर असं आहे. त्यामुळे तैमूरचा भाऊ हा जहांगीर या नावाने ओळखला जाणार आहे. जहांगीर सैफअली खान असं करीनाच्या दुसऱ्या बाळाचं नाव असणार आहे. काही दिवसांपूर्वी एक वृत्त आलं होतं ज्यामध्ये करीनाने तिच्या बाळाचं नाव जेह असं ठेवल्याचं समोर आलं होतं मात्र आता करीनाच्या दुसऱ्या बाळाचं नाव हे जहांगीर असणार हे स्पष्ट झालं आहे.
ADVERTISEMENT
करीनाने तिच्या पुस्तकात छोट्या मुलाला जेह अशी हाक मारली आहे. मात्र तिच्या मुलाचं खरं नाव जेह नसून जहांगीर आहे. पुस्तकाच्या शेवटच्या पानात तिने तिच्या बाळाचा उल्लेख जहांगीर असा केला आहे.
करीनाने जेव्हा तिच्या पहिल्या मुलाचं नाव तैमूर ठेवलं तेव्हा ती आणि सैफ प्रचंड ट्रोल झाले होते. तैमूरला जेव्हा भाऊ झाला तेव्हा त्याचं नाव काय असणार याची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा झाली होती. आता जहांगीर हे नाव पुस्तकात असल्याने करीनाच्या दुसऱ्या मुलाचं नाव जहांगीर आहे हे स्पष्ट होतं आहे. मात्र अद्याप सैफ अली खान किंवा करीना कपूर यांनी याबाबतची कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
करीना कपूरच्या दुसऱ्या मुलाचं नाव जहांगीर आहे हे कळताच सोशल मीडियावर ट्रोलिंग सुरू झालं आहे. सैफिना म्हणजेच सैफ आणि करीना यांच्या दुसऱ्या बाळाचं नाव समजताच लोकांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. करीना आणि सैफ हे मुघल शासकांची टीम बनवणार आहेत का असाही प्रश्न सोशल मीडियावर विचारला जातो आहे. आधी तैमूर आता जहांगीर सगळ्या क्रूर शासकांची नावं ही जोडी आपल्या मुलांना का देत आहे? असाही प्रश्न विचारला जातो आहे.
एका युझरने लिहिलं आहे की करीनाच्या मुलाचं नाव खरंतर कलाम, इरफान, झाकीर असंही असू शकलं असतं. मग तरीही तैमूर आणि जहांगीर हीच नावं का निवडली? हिंदू धर्माला कमी लेखण्यासाठीच ही नावं ठेवण्यात आली आहेत. सैफ आणि करीना यांना काय मुघल शासकांची टीम तयार करायची आहे का? सैफ करीनाला जर तिसरा मुलगा झाला तर त्याचं नाव हे लोक औरंगजेब ठेवायलाही कमी करणार नाहीत असंही एका युजरने म्हटलं आहे.
जहांगीर कोण होता?
मुघल सम्राट अकबर याच्या मुलाचं नाव जहांगीर होतं. मुघल साम्राज्याचा तो चौथा सम्राट होता. त्याचं खरं नाव सलीम होतं. मात्र त्याची ओळख शहेनशाह जहांगीर अशी होती. जहांगीरने २२ वर्षे देशावर राज्य केलं. जहांगीर हा अत्यंत क्रूर शासक होता असंही म्हटलं जातं. जहांगीरने शिख गुरू अर्जन देव यांना मृत्यूदंड दिला होता.
तैमूर हे नाव ठेवल्यानंतरही ट्रोल झाली होती करीना
करीना सैफच्या पहिल्या बाळाचा म्हणजेच तैमूरचा जन्म 2016 मध्ये झाला. तैमूर हे नाव ठेवल्याने या दोघांवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. आपल्या देशावर हल्ला करणाऱ्या शासकाचं नाव कुणी आपल्या मुलावर कसं ठेवू शकतं? असं म्हणत करीनाला ट्रोल करण्यात आलं होतं. हे ट्रोलिंग इतक्या मोठ्या प्रमाणावर झालं की करीनाने नाव बदलण्याचाही विचार केला होता.
ADVERTISEMENT