बी. एस. येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी कोण बसणार? या प्रश्नाचा सस्पेन्स आता संपला आहे. बसवराज बोम्मई हे कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. भाजपच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. सोमवारीच बी. एस. येडियुरप्पा यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सोपवला. माझ्यावर कोणताही दबाव नाही, मी स्वेच्छेने राजीनामा देत आहे असं येडियुरप्पा यांनी सोमवारीच जाहीर केलं होतं. त्यानंतर कर्नाटकला नवा मुख्यमंत्री मिळणार हे स्पष्ट झालं मात्र नाव समजलं नव्हतं. अखेर आज भाजपच्या बैठकीत बसवराज बोम्मई यांचं नाव निश्चित झालं आहे. बसवराज बोम्मई यांची एकमुखाने निवड झाल्याचं माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनीच जाहीर केलं.
ADVERTISEMENT
कोण आहेत बसवराज बोम्मई?
येडियुरप्पांप्रमाणेच बसवराज बोम्मई हे लिंगायत समाजाचे नेते असून ते माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पांचेच जवळचे स्नेही मानले जातात. 61 वर्षीय बसवराज बोम्मई यांनी आत्तापर्यंत कर्नाटक सरकारमध्ये गृहविभाग, कायदे विभाग, सांस्कृतिक कार्यमंत्रीपद अशा अनेक महत्त्वाच्या पदांची जबाबदारी पार पाडली आहे. बसवराज बोम्मईंच्या नावावर शिक्कामोर्तब होण्यापूर्वी त्यांनी भाजपचे केंद्रीय निरीक्षक धर्मेंद्र प्रधान, जी. किशन रेड्डी आणि अर्जुन सिंह यांची बंगळुरूमध्ये भेट घेतली. एवढंच नाही तर बसवराज यांचं नाव निश्चित होण्यापूर्वी त्यांची पक्षाच्या 40 आमदारांनी देखील भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे.
बसवराज बोम्मई हे 2008 ला जनता दलातून भाजपमध्ये आले आहेत. यापूर्वी त्यांच्याकडे जलसंपदा मंत्रिपदही होतं. बसवराज हे इंजिनिअर असून त्यांनी टाटा ग्रुपमध्येही काही दिवस काम केलं आहे. येडियुरप्पा यांना राजीनामा द्यायाला सांगितल्यानंतर कर्नाटकमध्ये पुन्हा एकदा लिंगायत चेहराच मुख्यमंत्रीपदासाठी निवडून भाजपने संतुलन साधण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जातं आहे. भाजपचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री असलेले बसवराज हे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार मानले जात होते. त्याप्रमाणेच त्यांच्याच गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली आहे.
बी. एस. येडियुरप्पा यांनी सोमवारी राजीनामा दिला आणि त्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देखील आभार मानले. येडीयुरप्पा म्हणाले की, ‘आम्ही एकमताने बसवराज बोम्मई यांची भाजपा विधिमंडळ नेतेपदी निवड केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या पाठिंब्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालीच बसवराज बोम्मई कठोर मेहनत घेतील याबाबत माझ्या मनात शंका नाही’ असं येडियुरप्पा यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT