मुंबई: अभिनेत्री केतकी चितळे आणि वाद हे आता समीकरण बनलंय. आता ज्या प्रकारे शरद पवारांवरील वादग्रस्त पोस्टमुळे ती अडचणीत आली आहे तशीच या आधीही आपल्या वादग्रस्त पोस्टमुळे तिच्या विरोधात गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यामुळे तुझं माझं ब्रेकअप, आंबट गोड या मालिकांमुळे आपल्या घरात पोहोचलेली ही केतकी चितळे असं काय वागली ज्यामुळे आता तिची ओळख कॉट्रोवर्सी क्वीन अशी झाली आहे तेच आपण आता जाणून घेऊया.
ADVERTISEMENT
केतकी तुझं माझं ब्रेकअप या सिरियलमध्ये दिसली त्याशिवाय एक हिंदी मालिकाही तिने केली. पण नंतर ती फारशी सिल्वर स्क्रिनवर दिसली नाही. त्यानंतर ती चर्चेत आली ती केवळ तिच्या वादग्रस्त पोस्ट्समुळे.
सगळ्या पहिली पोस्ट ज्यामुळे ती चर्चेत आली ती होती एपिलेप्सी या तिला झालेल्या आजारावरची. या आजारामुळे आपल्याला सिरियलमधून काढून टाकलंय असा आरोप केतकीने केलेला, तिच्या त्या आरोपाची तेव्हा प्रचंड चर्चा झालेली. त्यानंतर तिने सातत्याने आपल्या आजाराबाबत माहिती देणाऱ्या पोस्ट करायला सुरूवात केली.
आपल्या सोशल मिडिया हँडलचं नावही तिने एपिलेप्सी वॉरियर क्वीन असं ठेवलं.. Accepy Epilepsy असं आव्हान आपल्या पोस्टमधून ती करताना दिसली.
त्यानंतर तिला अडचणीत आणणारी पोस्ट होती छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची. 11 जुलै 2020 ला ही पोस्ट तिने केलेली. त्यात तिने छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला होता. केतकीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, ‘शिवाजी, फक्त एवढे ऐकले की आम्ही उगाच पेटून उठणार. मजकूर आम्हाला तसाही कधी कळतच नाही, कारण तेवढी आमची बुद्धीमत्ता मुळातच नाही. मग 3 वर्षाच्या मुलाची बौद्धिक पातळी असलेले स्वघोषित मावळे, शिवाजी हा एक शब्द ओळखतात आणि महाराजांच्या शिकवणीला फाट्यावर मारून, महाराजांच्या नावावर राजकारण करायचा पोकळ विनोद सुरू करतात.’
‘बरं, अशा वागण्यानी आपण आपली लायकी दाखवून देतोय हे त्यांच्या लक्षात येत नाहीच. अर्थात हे कळण्यासाठीही नखाएवढी अक्कल लागतेच म्हणा! तसेच आम्ही फक्त भांडण करण्यासाठी महाराज, बाबासाहेब, फुले यांची नावे घेणार, त्यांनी लिहिलेल्या साहित्याचा अभ्यास कोण करणार!! सुधारणा करा बाळांनो, शिका.’
दरम्यान, स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआने छत्रपती शिवाजी महाराज आणि अरबी समुद्रातल्या स्मारकावर भाष्य केलं होतं. त्याच दरम्यान केतकीची पोस्ट आल्याने तर तिच्या पोस्टचे पडसाद आणखीनच मोठे पडले. तिला प्रचंड ट्रोल केलं गेलं होतं.
त्यानंतर तिने एक अशीच वादग्रस्त पोस्ट केलेली, त्यामुळे तिच्या विरोधात अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता. 1 मार्च 2020 ला तिने ही पोस्ट लिहिली होती. या पोस्टमध्ये केतकीने नवबौद्ध 6 डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनाला येतात असा आरोप केला होता.
त्या पोस्टमध्ये ती म्हणालेली की, ‘आम्ही फक्त हिंदू,असा शब्द उद्गारला, तर घोर पापी, कट्टरवादी!? पण अर्थात चूक कुणा दुसऱ्यांची नाही, तर आमचीच आहे. आम्ही स्वतःच्यातच भांडण्यात इतके बिझी आहोत, आम्हाला आमच्यातच फूट पाडणारे नेते आवडतात आणि आम्ही त्यांना ती फूट पाडू देतो, की स्वतःचा धर्म आम्ही विसरतो.’ असे म्हणून सर्व भारतीय एक आहेत युनिफॉर्म सिवील लॉ असा हॅशटॅग दिला होता.
शरद पवारांच्या ‘त्या’ पोस्टबाबत केतकी चितळेचं कोर्टात मोठं विधान, म्हणाली..
त्यानंतर ती अडचणीत आलेली ती हिंदी राष्ट्रभाषा आहे, उगाच मराठीचा झेंडा लावू नका या बोलण्यामुळे. केतकीने एक फेसबुक लाईव्ह केले होते. या लाईव्हमध्ये तिने आधी सांगितले की मी हिंदी आणि इंग्रजीत बोलणार आहे. ‘हिंदी ही राष्ट्रीय भाषा आहे तर उगाच मराठीचे झेंडे लावू नका.’ असे केतकीने म्हटले होते.
तेव्हा अनेकांनी केतकीला हिंदी ही राष्ट्रभाषा नाही तसेच महाराष्ट्र ही राजभाषा आहे असे सांगितले. इतकेच नाही तर अतिशय वाईट शब्दात केतकीला ट्रोल करण्यात आले होते. तिच्या हिंदीवरील भूमिकेमुळे वाद निर्माण झाला होता. केतकीचा फोन नंबर व्हायरल झाला आणि अनेकांनी तिला अश्लील भाषेत धमकी दिली होती. त्याचे कॉल रेकॉर्डिंगही व्हायरल झाले होते.
मधल्या काळात ती बिग बॉस मराठी सीझन 3मध्ये येणार अशीही चर्चा होती. म्हणूनही ती चर्चेत आलेली. मात्र, नंतर तिनेच एका वृत्तपत्राला माहिती देत ही अफवा असल्याचं सांगितलेलं. त्यानंतर आता शरद पवारांबाबतच्या वादग्रस्त पोस्टमुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे. राज ठाकरे, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, जितेंद्र आव्हाड, अमोल कोल्हे अशा अनेकांनी तिच्यावर जाहीर टीका केली आहे. आता तर कोर्टाने तिला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी देखील सुनावली आहे.
ADVERTISEMENT