राज्यातलं खोके सरकार हे अजूनही राजकारणातच अडकलं आहे, तसंच खरे मुख्यमंत्री कोण आहेत ते कळतच नाही अशी टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे. होर्डिंगच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केलं आहे की मला आता मळमळ व्हायला लागली आहे. दिवाळी संध्या या कार्यक्रमाला आदित्य ठाकरे यांची उपस्थिती होती. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना हे भाष्य केलं आहे.
ADVERTISEMENT
नेमकं काय म्हणाले आहेत आदित्य ठाकरे?
महाराष्ट्रातलं खोके सरकार अजूनही राजकारणातच अडकलं आहे. खरे मुख्यमंत्री कोण आहेत ते कळतच नाही. घटनाबाह्य सरकारने कामही करायचं असतं हे बहुदा यांना माहितही नाही. राज्यात फक्त राजकीय घोषणाबाजी सुरू आहे. मात्र जनतेचा आवाज कुठेही ऐकला जात नाही. असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.
सरकार स्थापन झाल्यानंतर ४० दिवसांनी मंत्र्यांची यादी जाहीर झाली होती. पालकमंत्री जाहीर होण्याआधी बंगल्याचं वाटप झालं होतं. हे सरकार घटनेच्या विरोधात आहे हे मान्य करायला पाहिजे. तसंच घटनाबाह्य सरकार निर्णय घेतं आहे हे दुर्दैवी आहे असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.
बॅनर्सवरूनही आदित्य ठाकरेंची एकनाथ शिंदे सरकारवर टीका
या सरकारला घोषणाबाजी सरकार, खोके सरकार अशी नावं मिळाली आहेत. पण यांना कोणतीही लाज वाटत नाही. आपण काम करणं गरजेचं आहे हे देखील हे सरकार विसरून गेलं आहे. राज्यातल्या प्रत्येक बस स्थानकावर शिंदे सरकारचे होर्डिंग्ज लागले आहत. या होर्डिंगसाठी पैसे कुठून आले? कुणी दिले? दिले नसतील तर नुकसान भरपाई कोण करणार? हे सरकार अनेक ठिकाणी बेकायदेशीर बॅनर लावतं आहे. महापालिकेकडून कुठलीही कारवाई केली जात नाही. एवढी राजकीय बॅनर्स झाली आहेत की मला आता मळमळू लागलं आहे असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.
सण उत्सवांपासून राजकारण बाजूला ठेवलं पाहिजे
सण आणि उत्सव सुरू असताना तरी किमान त्यात राजकारण आणू नये. मात्र सध्या सगळीकडे उधळपट्टी सुरू आहे. महागाईवर, रूपयांच्या पडत्या किंमतीवर, शेतकऱ्यांच्या नुकसानीवर, बेरोजगारीवर हे सरकार मौन बाळगून आहे. या प्रश्नांवर कुणीही बोलायला तयार नाही. फक्त घोषणा दिल्या जात आहे. दहीहंडीच्या वेळीही घोषणा दिल्या गेल्या आणि आश्वासनं देण्यात आली मात्र त्यातलं अंमलात काहीही आणलं गेलं नाही असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT