भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांना मागील आठवड्यात पुणे महापालिकेत शिवसैनिकांकडून धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर शुक्रवारी भाजपचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी किरीट सोमय्या यांच्या सत्काराचे आयोजन केले होतं.
ADVERTISEMENT
महापालिकेत करण्यात आलेल्या सत्कारावेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. तसेच काही वस्तूंचे नुकसान झाले. दरम्यान, पाचपेक्षा अधिक व्यक्ती जमल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह 300 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे महापालिकेत शिवसैनिकांकडून किरीट सोमय्यांना धक्काबुक्की, पायऱ्यांवर कोसळले सोमय्या
पुण्यात सध्या महापालिका निवडणुकीचे वेध लागले असून, राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापू लागलं आहे. एकेकाळी सोबत असणाऱ्या शिवसेना आणि भाजपत संघर्ष बघायला मिळत असून, गेल्या आठवड्यात भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांकडून धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना घडली होती. त्या घटनेनंतर भाजपकडून शिवसेने टीका केली जात आहे. दरम्यान, किरीट सोमय्या यांचा धक्काबुक्की करण्यात आलेल्या ठिकाणीच भाजपकडून सत्कार करण्यात आला.
सत्कारावेळी जमावबंदी आदेशाचं उल्लंघन करण्यात आल्याचं समोर आलं असून, या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शिवराज हाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरीट सोमय्यांना नवाब मलिक म्हणाले ‘भाजपची आयटम गर्ल’; सोमय्या काय म्हणाले होते?
पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे महापालिकेत दुपारच्या सुमारास भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि शहर अध्यक्ष जगदीश मुळीक तसेच त्यांच्या सोबत जवळपास 300 च्या आसपास लोक महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आले होते. त्यावेळी आम्ही त्यांना सांगितले की, तुमचा जमाव बेकायदेशीर आहे. तुम्ही येथून निघून जा. त्यांना अनेक वेळा सांगण्यात आले.
मात्र जमावाकडून मोठंमोठ्यानं घोषणाबाजी करण्यात आली. काही वेळाने जमावाने आतमध्ये प्रवेश केला. त्या दरम्यान काही साहित्याचे नुकसान देखील झाले आहे. त्याचबरोबर पाचपेक्षा अधिक नागरिकांनी एका जागेवर एकत्रित येऊ नये, या आदेशाचा देखील त्यांनी भंग केला. यामुळे भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह 300 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास करण्यात येत असल्याचे नारनवरे यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT