भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना पुणे महापालिकेत शिवसैनिकांकडून धक्काबुक्की झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचा माफिया सेना असा उल्लेख करत उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला होता. त्यानंतर सोमय्यांनी एक व्हिडीओ ट्वीट करत शिवसेनेवर आरोप केला आहे.
ADVERTISEMENT
भाजपचे नेते किरीट सोमय्या 5 फेब्रुवारी रोजी पुणे दौऱ्यावर होते. सोमय्या पुणे महापालिका आयुक्तांची भेट घेण्यासाठी गेले होते. यावेळी शिवसैनिकांनी सोमय्या यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. तसेच गोंधळ झाल्यानंतर सोमय्यांना धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना घडली.
या घटनेप्रकरणी शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, आज किरीट सोमय्यांनी एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना ‘5 फेब्रुवारी रोजी पुणे महानगरपालिका मुख्यालयात शिवसेनेचा मला मारण्याचा हेतू होता,’ असा आरोप सोमय्यांनी केला आहे.
सोमय्या यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये गदारोळ झाल्याचं दिसत आहे. सोमय्या गाडीतून जात असताना काही लोक त्यांच्या गाठीमागे धावत असल्याचं दिसत आहे. सोमय्यांची गाडी वळून आल्यानंतर एक व्यक्ती हातात दगड घेऊन सोमय्या बसलेल्या गाडीच्या दिशेनं धावताना दिसत आहे.
उद्धव ठाकरे यांच्यावर सोमय्यांनी काय केला होता आरोप?
सोमवारी (6 फेब्रुवारी) माध्यमांशी बोलताना सोमय्या म्हणाले होते की, ‘माफिया सेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी किरीट सोमय्यांना अडवण्यासाठी काल गुंडांना पाठवलं होतं. परत त्याच ठिकाणी जातोय. काल महापालिकेत माफिया सेनेनं जी गुंडगिरी केली, ती उद्धव ठाकरे यांच्या आदेशामुळे केली होती. मी जो घोटाळा बाहेर काढला. या प्रकरणाची पुणे महापालिका आणि पुणे पोलिसांकडे तक्रार देत आहे,’ असं सोमय्यांनी म्हटलं होतं.
गृहमंत्री काय म्हणाले आहेत?
‘पुण्यामध्ये जी घटना घडली आहे. त्या घटनेसंदर्भातील माहिती मी घेतली आहे. एका पक्षाचा कार्यक्रम सुरू असताना भाजपचे काही कार्यकर्ते त्याठिकाणी गेले. त्यावरून दोन्हींकडील कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर ही घटना घडली आहे. या घटनेची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश मी दिले आहेत. दोषी असणाऱ्यांवर कारवाई केली जाईल’, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं होतं.
ADVERTISEMENT