कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन प्रचारसभा घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं. त्याचबरोबर कोल्हापुरातील भगवा संपणार नाही. हिंदुत्व संपवू देऊ नका, असं आवाहन केलं. मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वेगळाच अर्थ सांगितला.
ADVERTISEMENT
माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी ऐकवलेला किस्सा सांगत मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर भाष्य केलं.
“एक जागा जिंकल्याने महाराष्ट्रात लगेच सत्तांतर होणार नाहीये. आमचा आटापिटा असा सुरू आहे की, कोल्हापूरची हिंदुत्वावादी जागा कायमची हिंदूत्व न मानणाऱ्या काँग्रेसच्या ताब्यात जाऊ नये. २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये शिवसेनेला साधारणतः ७० हजारांच्या आसपास मतं पडली. याच्यातील भाजपचा वाटा सोडून देऊ. पण त्यातील जी काही ३०-३५ हजार शिवसेनेची मतं, जी हिंदुत्ववादी आहेत. त्यांना जर काँग्रेसला मतदान करण्याची सवय लावली आणि २०२४ जर शिवसेना वेगळी लढली किंवा शिवसेना-भाजप एकत्र लढली, तर त्यावेळी काँग्रेसकडे गेलेलं मतदान तुम्हाला परत आणता येणार नाही,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
“इथे बंटी पाटलांची (सतेज पाटील) परंपरा आहे. ते तुमचा पुर्ण तंबूच उखडून घेऊन जातात. त्यामुळे शिवसेनेनं याचा विचार केला पाहिजे. मला पूर्वीचा किस्सा आठवतो. जयंत पाटलांनी मला सांगितला होता. एका निवडणुकीत ज्यावेळी वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते. त्यावेळी काँग्रेसचा उमेदवार आम्हाला मान्य नव्हता. आम्ही एक अपक्ष उमेदवार उभा केला आणि त्याला निवडणूक चिन्ह दिलं सिंह. त्यावेळी वसंतदादा काँग्रेसला मतदान करा म्हणून प्रचार करत घरोघरी जात होते आणि त्यांच्या हातामध्ये एक काठी होती आणि त्या काठीला सिंह होता. त्यामुळे ते काठी सतत हलवायचे. ते काँग्रेसला मतदान करा म्हणायचे काठी हलवताना सिंह दिसायचा. त्यामुळे आज मुख्यमंत्र्यांनी भाषणात हिंदुत्व पुसरलं जाणार नाही, असं म्हटलं आहे. यातून समजणाऱ्या जे समजायचं ते समजून गेलं आहे,” असं सांगत चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील वेगळाच अर्थ विशद केला.
“उद्धवजींनी सगळ्यांना आवाहन केलं आहे की, इथला भगवा पुसू नका. भगव्याला मतदान करा. त्यामुळे शिवसैनिकांनी ठरवायचं आहे की, भगवा म्हणजे काँग्रेस की भाजप. आपापसातील भांडणं चालू ठेवू, पण कोल्हापुरची जागा कायमची हिंदुत्ववादी मंडळींच्या हातून जाणार आहे.”
“मुख्यमंत्री ज्या प्रयोगाबद्दल बोलले ना, प्रयोगाबद्दल आताच सांगतो. कोल्हापुरातील करवीरची जागा चंद्रदीप नरके लढवायचे, ती आता पी.एन. पाटील किंवा त्यांचा मुलगा लढवेल. आता हातकंणगलेतील जागा. तिथे डॉ. सुजित मिणचेकर हारले. ती जागा आता राजूबाबा आवळे घेतील. त्यामुळे असं एक-एक जागा घेतील,” असंही पाटील म्हणाले.
महाराष्ट्रात ज्या जागांवर शिवसेना पराभूत झाली, पण परंपरागत त्या जागा शिवसेनेच्या आहेत. त्या काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेला देणार आहेत का? महाराष्ट्रातील नव्या प्रयोगात महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद टिकवताना अशा प्रकारे विजय शिवतारेंचा बळी, राजेश क्षीरसागराचा बळी, चंद्रदीप नरकेंचा बळी, असं करणार आहात का?,” असा प्रश्न पाटलांनी उपस्थित केला.
“माझ्या दृष्टीने आनंदाची एकच गोष्ट आहे की, मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांना भगवा संपवू देऊ नका म्हटलं आहे. त्यामुळे तो भगवा काँग्रेस नाही, हे सर्वसामान्य हिंदूंना कळतं. वसंतदादांच्या काठीसारखंच आहे. कारण त्यावेळी काँग्रेसचा उमेदवार पडला आणि सिंह चिन्ह असलेला अपक्ष उमेदवार विजयी झाला. तशीच काठी उद्धव ठाकरेंनी हलवली आहे. हिंदूत्व संपवू नका, हिंदूत्व पुसलं जाणार नाही म्हणजेच भाजपला मतदान करा,” असं सांगत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा वेगळाच अर्थ सांगितला.
ADVERTISEMENT