उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव मौर्य यांच्या विरुद्ध निदर्शनं करणाऱ्या शेतकरी आंदोलनाला हिेंसेचं गालबोट लागलं. यात तब्बल 8 शेतकऱ्यांना प्राण गमवावे लागले असून, या घटनेचं संतप्त पडसाद उमटताना दिसत आहे. संतप्त कार्यकर्त्यांनी अखिलेश यादव यांच्या घरासमोर पोलिसांची गाडीच पेटवून दिली. तर भेटीसाठी निघालेल्या काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधीसह समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि शिवपाल यादव यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
3 ऑक्टोबर रोजी लखीमपूर खीरी येथे उफाळून आलेल्या हिंसाचाराचे पडसाद उत्तर प्रदेशात उमटले आहेत. आठ शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर किसान मोर्चा आक्रमक झाला असून, दुसरीकडे काँग्रेस, समाजवादी पार्टी, बसपा, शिरोमणी अकाली दलासह विरोधकांनी योगी सरकारला घेरलं आहे.
काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हे लखीमपूर खीरीच्या दिशेनं निघाले होते. मात्र, त्यांना रस्त्यातच ताब्यात घेण्यात आलं आहे. तर अखिलेश यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेण्यापूर्वी संतप्त कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन करत गौतमपल्ली पोलीस ठाण्यासमोर पोलिसांची गाडीच पेटवून दिली.
तत्पूर्वी सकाळी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेत नजरकैद केलं आहे. मात्र, प्रियंका गांधी यांना अटक करण्यात आली असल्याचं कांग्रेसनं म्हटलं आहे. त्यावरून उत्तर प्रदेश काँग्रेस आक्रमक झाली आहे. दुसरीकडे काँग्रेसचे पंजाब आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री लखीमपूर खीरीला भेट देणार होते. मात्र, त्यांची विमान उतरवण्यास नकार देण्यात आला आहे.
भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी या घटनेसंदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिलं आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना निर्दयीपणे चिरडण्याच्या घटनेमुळे देशवासीयांमध्ये रोष आहे. एक दिवस आधी अहिेंसेचे पुजारी महात्मा गांधींची जयंती झाली आणि दुसऱ्याच दिवशी ज्याप्रकारे अन्नदात्याची हत्या करण्यात आली ती सभ्य समाजात अक्षम्य आहे, असं म्हणत घटनेची सीबीआय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
केंद्रीय मंत्र्याच्या मुलावर गंभीर आरोप
लखीमपूर खीरी परिसरात झालेली हिंसा आणि शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर उत्तर प्रदेशातील राजकारण पेटलं आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्री टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा टेनी याने गाडीखाली शेतकऱ्यांना चिरडल्याचा दावा किसान मोर्चाने केला आहे. तर केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.
लखीमपूर खीरीमध्ये झालेल्या घटनेनंतर काँग्रेस, समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, शेजारील पंजाबमधील शिरोमणी अकाली दल यांच्यासह विरोधी बाकांवरील पक्षांनी योगी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याचं बघायला मिळत आहे.
लखीमपूर खीरी हिंसा : प्रियंका गांधी नजरकैदेत; सरकारकडून विरोधकांची नाकेबंदी
शेतकऱ्यांच्या मृतदेहासह आंदोलन…
लखीमपूर खीरीमध्ये मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या मृतदेह समोर ठेवून किसान मोर्चानं आंदोलन सुरु केलं आहे. शेतकऱ्यांशी चर्चा केली जात आहे. लखनऊचे पोलीस महानिरीक्षक लक्ष्मी सिंह हे मयत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांशी चर्चा करत असल्याची माहिती समोर आली आहे. या ठिकाणी शेतकरी नेते राकेश टिकैत हे देखील उपस्थित आहेत.
ADVERTISEMENT