मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषा दिनी लतादीदींचे आभार मानले आहेत. मी तुमचा ऋणी आहे लतादीदी या शब्दांमध्ये त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. याला कारण ठरलं आहे तो म्हणजे लता मंगेशकर यांनी ट्विट केलेला एक फोटो. राज ठाकरे यांनी ट्विट करून लतादीदींचं ऋण व्यक्त केलं आहे.
ADVERTISEMENT
काय म्हणाले आहेत राज ठाकरे?
“मराठीपणाची ओळख ठसवायची असेल तर प्रत्येकाने मराठी स्वाक्षरी करायला हवी या आवाहनावर लतादीदींनी मराठीत स्वाक्षरी करून पाठवली आणि सोबत कुसुमाग्रजांसोबतचा फोटोही.. दीदी मी खरंच तुमचा ऋणी आहे.” असं म्हणत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लतादीदींचे आभार मानले आहेत. एवढंच नाही तर या फोटोशेजारी असलेलं ज्ञानेश्वरांचं चित्र हे उषा मंगेशकर यांनी रेखाटलं असल्याचीही माहिती राज ठाकरेंनी दिली आहे.
मराठी भाषा दिवसाबद्दल काय आहेत राज ठाकरे यांचे विचार?
२७ फेब्रुवारी हा दिवस आपण सगळेजण मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा करतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यास सुरूवात केल्यानंतर आपल्या मराठी भाषेचा गौरव करणारा हा दिवस सगळ्यांच्या लक्षात राहू लागला. आपली मराठी भाषा ही इतकी लेचीपेची अजिबात नाही की जिच्यासाठी आसवं गाळत बसावी. ही भाषा कोणाकोणाच्या मुखातून निघाली आहे याचा विचार केला तर ही भाषा किती सशक्त आहे हे तुमच्या लक्षात येईल. हिंदवी स्वराजाच्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुखी असलेली ही भाषा, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम ते समर्थ रामदास स्वामींच्या मुखी असलेली ही भाषा. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ म्हणत भारतीयांच्या मनात स्वराज्याचं बीज रोवणाऱ्या लोकमान्य टिळकांची ही भाषा, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुखी असलेली ही भाषा, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकराची ही मातृभाषा, प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे, इतकंच काय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेगडेवार असोत की भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक श्रीपाद अमृत डांगेंची पण ही मातृभाषा. लता दीदींच्या आणि आशाताईंच्या गोड गळ्यातून पहिले शब्द जे निघाले ते याच भाषेतले आणि १८४३ पासून आजपर्यंत अव्याहतपणे ज्या रंगभूमीने जागतिक रंगभूमीलादेखील दखल घ्यायला लावली ती देखील माराठी भाषिक रंगभूमीच. भारत व्यापून टाकणारं कार्य करणारी ८ भारतरत्नही ह्या मराठी भूमीतीलच.
असं म्हणत मराठीतून स्वाक्षरी करा असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे. मराठी भाषा दिनाच्या एक दिवस आधी ट्विट केलेल्या पत्रात राज ठाकरेंनी हे विचार मांडले आहेत. आता आज लता मंगेशकर यांनी त्यांना मराठीत स्वाक्षरी करून जो फोटो पाठवला त्याबद्दल राज ठाकरेंनी लतादीदी मी तुमचा ऋणी आहे असं म्हटलं आहे.
ADVERTISEMENT