सतिश उकेंना ६ एप्रिलपर्यंत ईडी कोठडी,फडणवीसांच्या भावांनी धमकावल्याचं म्हणत उके कोर्टात रडले

विद्या

• 01:47 PM • 01 Apr 2022

नागपूरमधील वकील सतिश उके आणि त्यांच्या भावाला ईडीने गुरुवारी अटक केल्यानंतर संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली होती. सतिश उके हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील असून ते भाजप नेत्यांविरुद्ध भूमिकेसाठीही ओळखले जातात. बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन खरेदी प्रकरणात नागपूरच्या आर्थिक गुन्हे शाखेत दाखल असलेल्या गुन्ह्याची दखल घेत ईडीने ही कारवाई केली आहे. दरम्यान सतिश उके […]

Mumbaitak
follow google news

नागपूरमधील वकील सतिश उके आणि त्यांच्या भावाला ईडीने गुरुवारी अटक केल्यानंतर संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली होती. सतिश उके हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील असून ते भाजप नेत्यांविरुद्ध भूमिकेसाठीही ओळखले जातात. बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन खरेदी प्रकरणात नागपूरच्या आर्थिक गुन्हे शाखेत दाखल असलेल्या गुन्ह्याची दखल घेत ईडीने ही कारवाई केली आहे.

हे वाचलं का?

दरम्यान सतिश उके आणि त्यांच्या भावाला ईडीने आज मुंबईत PMLA कोर्टासमोर सादर केलं. दिवसभर चाललेल्या युक्तीवादानंतर कोर्टाने सतिश उके आणि त्यांच्या भावाला ६ एप्रिलपर्यंत ईडी कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

आज झालेल्या सुनावणीमध्ये सतिश उके यांनी स्वतः आपली बाजू मांडत फडणवीसांच्या भावांनी मला धमकावल्याचं कोर्टाला सांगितलं. इतकच नव्हे तर या सुनावणीदरम्यान उके कोर्टात रडले देखील. उके बंधूंना न्यायालयासमोर हजर केल्यानंतर ईडीकडून या प्रकरणाची माहिती न्यायालयात देण्यात आली. नागपूरमधील जमीन गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेत दोन गुन्हे नोंदवले गेले आहेत. खैरूनिसा शेख या महिलेच्या पतीचा मृत्यू झाल्यावर त्या महिलेवर दबाव टाकून महिलेच्या पतीने उकेंशी व्यवहार केला हे मान्य करण्यास सांगितले. यांसह विविध प्रकरणात आरोपीची कोठडी मिळून तपासाची गरज असल्याचा युक्तीवाद ईडीच्या वकीलांनी न्यायालयात केला.

सतिश उके यांच्याकडून नंतर वकील रवी जाधव यांनी कोर्टासमोर बाजू मांडली. यावेळी त्यांनी ईडीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. उके हे व्यवसायाने वकील आहेत. अटकेनंतर उकेंना २४ तासात कोर्टात हजार करणे गरजेचे असताना ईडीने तसे केले नाही. जी कायदेशीर प्रक्रिया आहे ते ईडीचे अधिकारी पाळत नाहीत. अटकेचा मेमोही अद्याप दिलेला नसल्याचा युक्तीवाद जाधव यांनी केला.

कोर्टासमोर आपली बाजू मांडताना सतिश उके यांनी, “घरात मी झोपेत असताना बेडरूम मध्ये सीआरपीएफचे जवान AK 47 बंदूक घेऊन आले. माझे वडील आजारी आहेत. मी आधी आर्किटेक्ट होतो नंतर कायद्याचं शिक्षण घेऊन २००७ साली वकिली सुरू केली. मी फडणवीस आणि गडकरी यांच्या विरोधात खटले लढले आहे. माझ्यावर लोया यांच्या केस मध्ये दबाव टाकला गेला. मला फडणवीस यांच्या भावाकडून धमकावण्यात आलं होतं”, असं कोर्टाला सांगितलं. यावेळी युक्तीवाद करताना उके यांना न्यायालयात रडू कोसळले.

काही दिवसांपूर्वी उके यांच्यावर एका ६० वर्षीय वृध्देने आपल्याला धमकावरून जमीन बळकावल्याचा आरोप केला होता. उके यांनी दीड एक जमीन स्वत:च्या व भावाच्या नावावर केल्याचा आरोप वृध्देनं केला होता. काही वर्षांपूर्वी ही घटना घडली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी उके यांना ताब्यात घेतलं होते. त्यांच्या चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आता ईडीने त्यांना अटक केली आहे.

    follow whatsapp